Sugarcane Fertilizers Management : आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन

Integrated Nutrient Management : जमिनीची अन्नद्रव्याची गरज ही फक्त रासायनिक, सेंद्रिय अथवा जिवाणू खते यापैकी कोणत्याही एका प्रकारच्या खताचा वापर करून पूर्ण करणे शक्य नाही. त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
Sugarcane Fertilizers
Sugarcane FertilizersAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Farming :

डॉ. प्रीती देशमुख, जे. पी. खराडे

भाग : १

ऊस लागवडीचे आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू असे मुख्य तीन हंगाम आहेत. प्रत्येक हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा वेगळा असतो. ऊस उत्पादन अधिक मिळविण्याच्या दृष्टीने हंगामनिहाय ऊस जातींची निवड आणि खतांचा वापर महत्त्वाचे आहे. आडसाली हंगामातील उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत केली जाते. आडसाली हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा १६ ते १८ महिन्याचा असतो. एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्षे राहते. या तिन्ही वर्षी अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक असते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक या तिन्ही खतांचा समतोल वापर करावा.

रासायनिक खतांचा वापर

ऊस शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये खतांची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि देण्याची योग्य पद्धत इत्यादी बाबींचा समावेश होतो. आडसाली ऊस पिकास हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश देण्याची शिफारस आहे.

को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. त्यामुळे या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ (टक्के) जास्त मात्रा द्यावी. मात्र या मात्रा बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनानंतर त्यावेळी असलेले हवामान, जमिनीची सुपीकता, उसाच्या जाती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ठरविण्यात आलेल्या होत्या. परंतु, बदलते हवामान, जमिनीचा कमी होत असलेला कस आणि नवनवीन ऊस जाती इत्यादी बाबींनुसार उसासाठी रासायनिक खतमात्रेची शिफारस करण्यात आली असली तरी माती परीक्षण अहवालानुसार खतमात्रेत योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. माती परीक्षणामध्ये जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थितीची माहिती मिळते. व त्यानुसार रासायनिक खतमात्रा ठरविणे सोयीस्कर होते.

Sugarcane Fertilizers
Sugarcane Crop Management : पूरपरिस्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

ऊस पीक वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत खतमात्रा देतेवेळी नत्रयुक्त खते चार हप्त्यात विभागून द्यावीत. जमीन हलकी असेल तर नत्रयुक्त खते ५ ते ६ वेळा विभागून द्यावीत. उगवण ते फुटवे येण्याच्या अवस्थेपर्यंत ऊस पिकास नत्रयुक्त खताची गरज फार कमी असते. लागवडीपूर्वी उगवणीसाठी १० टक्के नत्रयुक्त खते, मुळे व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाशयुक्त खते प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्रयुक्त खताची गरज असते, म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्रयुक्त खते ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्रयुक्त खताचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा.

जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस (१२० दिवसांनी) नत्र ४० टक्के शेवटचा हप्ता, स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे. लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत सर्व हप्ते पूर्ण करावेत.

sakal
Sugarcane Fertilizers
Sugarcane Varieties : ऊस वाणांचा ऱ्हास: कारणे आणि उपाययोजना

सेंद्रिय खत व्यवस्थापन

सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचे आहेत. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी ऊस पीक उत्तम आहे. कारण, एक हेक्टर क्षेत्रातून साधारण ८ ते १० टन पाचट जमिनीत मिसळता येते. मात्र बहुतांश शेतकरी ऊस निघाल्यानंतर उरलेले पाचट जाळून टाकतात. पाचट जाळताना जमिनीच्या अगदी वरच्या थरात (सेंद्रिय थर) असणारे सेंद्रिय पदार्थही जळून जातात. याच पाचटाचे सरीत आच्छादन करून शास्त्रीय पद्धतीने कुजविले असता त्यापासून ४ ते ५ टन चांगल्या प्रतिचे कंपोस्ट उपलब्ध होऊ शकते.

हे कुजवून त्याचे उत्तम प्रतिचे सेंद्रिय खत तयार होते. या सेंद्रिय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखण्यास मदत होते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते. रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकम्पोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंड अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.

सेंद्रिय खते आणि त्यांचे प्रति हेक्टरी प्रमाण

sakal

हिरवळीचे आंतरपीक

आडसाली हंगामामध्ये ताग किंवा धैंचा घेऊन ऊस लागवड करणे शक्य होत नाही. अशा वेळी ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेऊ शकतो. ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वापसा आल्यानंतर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतरपीक घेऊन बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे. हिरवळीच्या खतांचा वापर करून २७ ते ४० टक्के पर्यंत सेंद्रिय खतांची गरज भागवता येते.

आडसाली उसाचे एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्षे राहते. या कालावधीत सेंद्रिय खते आणि हिरवळीची खते यांचा नियोजनबद्ध वापर केल्यास निश्चितच जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढण्यास मदत होते.

०२०- २६९०२२७८

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com