
Climate Change Effect in Mango : यंदाच्या वर्षीचा आंबा हंगाम आता वेग घेऊ लागला आहे. पुणे बाजार समितीत हापूस आंब्याच्या आवकेला जानेवारीमध्ये थोडीफार सुरुवात होते. मात्र मुख्य हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होतो. अक्षय तृतीया या सणापासून हंगामाची खरी सुरुवात होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र या वर्षी कोकणातील हापूस आंब्याला हवामान बदलांचे ग्रहण लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस तर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये थंडीचा कालावधी कमी राहिल्याचे पाहायला मिळाले. मोहर लागण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहर काही प्रमाणात गळाला.
टिकलेल्या मोहराच्या पहिल्या टप्प्यात बाजारात आंब्याची आवक नियमित सुरू झाली. मार्च महिन्यात ती अपेक्षेएवढी होती. फेब्रुवारीत दिवसा तापमान अधिक असायचे. रात्री तापमानात घट व्हायची. त्यामुळे दुसऱ्या बहरात झाडांना पालवी जास्त येऊन मोहोर कमी आला.
अलीकडील दिवसांतही ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व गारपीट हे प्रकार घडले. आंब्याचे केवळ १५ टक्केच उत्पादन मिळेल असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. परिणामी, अक्षय तृतीयेच्या सणाला बाजारपेठेत मागील वर्षीच्या तुलनेत आंबा कमी उपलब्ध झाला आहे.
दरवर्षी पुणे बाजार समितीमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कोकणातून आठ ते दहा हजार पेट्यांची आवक होते. यंदा दररोज एक हजार पेटीपर्यंत आवक असून, किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचे दरही चढेच आहेत अशी माहिती कोकण आंब्याचे प्रमुख अडतदार व श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे सचिव करण जाधव यांनी दिली.
दरवर्षी एप्रिलमध्ये हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर होते. दरही सामान्यांच्या आवाक्यात येतात. अनेक छोटे बागायतदार पुणे, मुंबईतील बाजारात आंबे विक्रीस पाठवितात.
मात्र गेल्या तीन दशकांत यंदा एप्रिलमध्ये प्रथमच कोकणातील जयगड, देवगड, शिरगाव, पावस, जैतापूर परिसरांतून होणारी आवक कमी झाल्याचे निरीक्षण आंबा व्यापारी नितीन कुंजीर यांनी नोंदविले.
हंगामात कोकणात मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने नेपाळी कामगार येतात. यंदा मात्र बागायतदारांकडून हिशेब पूर्ण करून ते गावी परतल्याचे आंबा उत्पादक सांगतात.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मार्केट यार्ड मध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवात गुरूवार (ता.२१) पर्यंत सुमारे ६५ हजार डझन आंबा विक्री झाली. त्यातून सुमारे साडेचार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सव व्यवस्थापक मंगेश कदम यांनी दिली.
सध्याचे दर
-किरकोळ बाजार- ८०० ते १३०० रुपये (प्रति डझन) घाऊक बाजार दर
-चार ते सहा डझन पेटी- अडीच हजार ते चार हजार रु.
-पाच ते दहा डझन पेटी- साडेतीन हजार ते सहा हजार रु.
कर्नाटक आंब्याचे दर
कर्नाटक हापूस- ३०० ते ६०० रु. प्रति डझन, १०० ते १४० रुपये प्रति किलो.
पायरी - ३०० ते ४०० रुपये प्रति डझन, ५० ते ७० रुपये प्रति किलो
प्रति किलो दर
लालबाग - ४० ते ६० रु.
बदाम आणि बैंगनपल्ली- ४० ते ६० रु.
तोतापुरी - २५ ते ३० रुपये किलो
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.