
Mango Season Ratnagiri : कोकण कृषी विद्यापीठाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिकासंदर्भात तयार केलेल्या अहवालानुसार बदलत्या हवामानाच्या (Climate Change) विपरीत परिणामामुळे झाडांवर कैरी टिकून न राहता फळगळ होऊन नुकसान (Crop Damage) झाले. यामुळे वर्ष २०२३ च्या आंबा फळ काढणी हंगामात उत्पादकता प्रति हेक्टरी सरासरी ३ टन ऐवजी ६०० ते ७०० किलोच येण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १२ एप्रिलला अल्पबचत सभागृहात आंबा बागायतदारांबरोबर बैठक झाली. त्या वेळी कोकण कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बदलत्या हवामानामुळे आंबा पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सूचित केले; परंतु पंचनामे व सर्व्हेक्षण करताना मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
त्यासाठी कृषी विद्यापीठाला अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हवामान व पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांनी मांडलेल्या आंबा पिकाच्या अडीअडचणींवर आधारित अहवाल तयार केला. तो जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या कार्यालयाला सादर केला आहे.
जिल्ह्यात आंबा पीक क्षेत्र ६६ हजार हेक्टर असून प्रत्येक वर्षी ६० टक्के पीक येते. सर्वसाधारणपणे सरासरी ३ टन प्रति हेक्टर उत्पादकता आहे. ‘फयान’ चक्रीवादळापासून म्हणजेच २०१० पासून ऋतुचक्र बदलले आहे.
२०२२-२३ या हंगामात ऑक्टोबरमध्ये ८ दिवसांत १३९ मिलिमीटर पाऊस पडला. त्या वेळी ऑक्टोबर हीटचा आंबा झाडांना ताण बसला नाही. परिणामी, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सर्व झाडांना ६० टक्के पालवी आली.
जमिनीत भरपूर ओलावा, उशिराच्या पावसामुळे आणि थंडीच्या अभाव नोव्हेंबर २०२२ मध्ये केवळ आठ दिवस थंडी यामुळे समुद्राजवळच्या केवळ काही बागांमध्ये ५ टक्के मोहर आला. त्यात संयुक्त फुले ५ ते ६ टक्के होती.
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आलेल्या पालवीमुळे डिसेंबर-जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीची साथ न दिल्याने पालवी लवकर जून झाली नाही. मोहराचा दुसरा व तिसरा बहर आलाच नाही. आंबा झाडांना फेब्रुवारी २०२३ मध्ये ३० ते ४० टक्के मोहोर आला.
याच वेळेस हवामानातील बदलही मोठा होता. दिवसाचे तापमान ३६ ते ४० अंश, तर रात्रीचे तापमान १२ ते १६ अंश होते. हवेतील दिवसाची आर्द्रता २४ ते ३० टक्के एवढी घटली. त्यामुळे ताण वाढून मोहरी, वाटाणा, गोटी एवढ्या आकाराची कैरी गळून पडली.
जिल्ह्यातील तालुकानिहाय तापमानाची सरासरी महावेध डेटा नुसार नोंद तपासली असता रात्रीचे १७ अंश सेल्सिअसपेक्षा कमीचे तापमान केवळ ५८ दिवस होते. १८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तर जास्तीचे तापमान फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत ४८ दिवस होते.
जे फळधारणा व फळ वाढीसाठीपूरक आणि पोषकही नाही. फेब्रुवारीतील उष्णतेच्या लाटेमध्ये तुडतुडा आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढला. फवारलेली कीटकनाशके प्रभावी किंवा उपयोगी ठरली नाहीत.
बदलत्या हवामानाच्या विपरीत परिणामामुळे झाडांवर कैरी टिकून न राहता फळगळ होऊन पडून नुकसान झाले. त्यामुळे २०२३ च्या आंबा फळ काढणी हंगामात उत्पादकता सरासरी ३ टन प्रति हेक्टरऐवजी ०.६ ते ०.७ टन प्रति हेक्टर एवढीच राहण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.