Pune News : उजनी धरणासाठी शेतकऱ्यांनी घरे, सोन्यासारख्या जमिनी व आस्था असलेल्या मंदिरांवर पाणी सोडले. केवळ राजकीय स्वार्थासाठी धरणातील पाण्याच्या नियोजनाचे तीन तेरा केले आहेत.
उजनी धरणातील अयोग्य पाणी नियोजनाच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी इंदापूर दौड, करमाळा व कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास तीव्र रास्ता-रोको आंदोलन केले.
उजनी धरणामधून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबविण्यात यावे, पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनीमध्ये दहा टीएमसी पाणी तत्काळ सोडण्यात यावे. अन्यथा, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिली.
सध्या उजनी धरणांमध्ये केवळ उणे सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. या असंतोषातून गुरुवारी (ता. १) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये उजनी धरणग्रस्त बजाव समितीचे महारुद्र पाटील, अरविंद जगताप, प्रा. रामदास झोळ, शिवाजी बंडगर, पराग जाधव, सविता राजेभोसले, शहाजीराव देशमुख, सुभाष गुळवे, राजेंद्र धांडे, अमोल भिसे, संजय जगताप, नंदकुमार भोसले, शहाजी जाधव, सतीश वाघ, नानासाहेब बंडगर, सचिन बोगावत, उदय राजेभोसले तसेच चार तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन उजनी धरण कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता नितीन खाडे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, मंडल अधिकारी दीपक कोकरे आदींना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन श्री. मोरे यांनी शेतकऱ्यांना दिले.
या वेळी अशोक गायकवाड, विष्णू देवकाते, देविदास साळुंखे, शरद चितारे, दादासाहेब थोरात, अशोक शिंदे, आबासाहेब बंडगर, अंकुश पाडुळे, सखाराम खोत, सुहास साळुंखे, नीलेश देवकर, किरण गोफणे तसेच धरणग्रस्त बचाव समितीच्या प्रमुखांनी धरणग्रस्तांच्या मागण्या मांडल्या.
कार्यक्रमाचे संयोजन विजयकुमार गायकवाड यांनी केले. शेतकरी आंदोलनाची तीव्रता विचारात घेऊन दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पाडुळे, पोलिस निरीक्षक संदेश बावकर, सूर्यकांत कोकणे, विक्रम साळुंखे, नंदकुमार केकान, रूपेश कदम, रतिलाल चौधर, नाना वीर आदींसह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होते.
उजनी धरणग्रस्तांच्या मागण्या
- उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले आवर्तन तत्काळ बंद करावे.
- पुणे जिल्ह्यातील धरणांतून दोन वेळा दहा-दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे.
- ठोक जलशुल्क आदेश रद्द करावा.
- सोलापूर शहरासाठीचे समांतर जलवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करावे.
- कालवा सल्लागार समितीवर इंदापूर, करमाळा, दौंड व कर्जत तालुक्यातील प्रतिनिधी निवडावेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.