Illegal Mining Bauxite : कोल्हापुरात बेकायदेशीरपणे बॉक्साईटचे उत्खनन, पर्यावरणाची मोठी हाणी

Bauxite Truck : बॉक्साईट ट्रकने कर्नाटकात नेले जाते. तेथे सिमेंट कंपन्या हे बॉक्साईट विकत घेतात.
Illegal Mining Bauxite
Illegal Mining Bauxiteagrowon

Bauxite Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्च प्रतीचे बॉक्साईट आढळते. याचा गैरफायदा घेऊन काही टोळ्या बेकायदेशीरपणे बॉक्साईटचे उत्खनन करतात. त्यानंतर हे बॉक्साईट कर्नाटकातील काही सिमेंट कंपन्यांना 'अॅल्युमिना'या घटकासाठी ते दिले जाते. गेल्या दोन वर्षांत सुमारे १० ट्रक बॉक्साईट चोरट्या पद्धतीने नेताना खनिकर्म विभागाने पडकले आहेत. याबाबत अधिक सजग कारवाई केल्यास ही संख्या वाढू शकते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमध्ये बॉक्साईट खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. पूर्वी जिल्ह्यामध्ये १९ बॉक्साईट खाणी होत्या. मात्र, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र, न्यायालयीन निवाडे यामुळे यातील १७ खाणी बंद केल्या गेल्या.

सध्या शाहूवाडी तालुक्यात बुरंबळे आणि गिरवाग या ठिकाणी दोन खाणी अधिकृतपणे सुरू आहेत. मात्र, काही टोळ्या जिल्ह्याच्या विविध भागांत अनधिकृतपणे उत्खनन करतात. त्यानंतर तेथील बॉक्साईट ट्रकने कर्नाटकात नेले जाते. तेथे सिमेंट कंपन्या हे बॉक्साईट विकत घेतात.

या बॉक्साईटमधील 'अॅल्युमिना' हा घटक वेगळा केला जातो. तो सिमेंट निर्मितीमध्ये वापरले जाते. बॉक्साईटला मागणी जास्त आहे, त्या तुलनेत उत्पादन कमी आहे. त्यामुळे चोरट्या बॉक्साईटला मागणी जास्त आहे. या टोळ्या संघटितपणे काम करतात. उत्खनन करणे, कर्नाटकातील कंपन्यांबरोबर व्यवहार करणे हे काम टोळ्या करतात. गेल्या दोन वर्षांत १० ट्रक बॉक्साईट पकडले आहेत. अशा प्रकारच्या चोरट्या बॉक्साईट उत्खननामुळे शासकीय महसूल बुडतोच तसेच पर्यावराणाचेही नुकसान होते. त्यामुळे अशाप्रकारे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर मोठी कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

Illegal Mining Bauxite
Vegetable Market Kolhapur : दोडका, वांगी, फ्लॉवर गड्डा, कोबी, गवारची दर तेजीत, भाजीपाला आवक घटली

अॅल्युमिना'चे मोल महत्त्वाचे

बॉक्साईटचा दर्जा हा त्यातील अॅल्युमिनाच्या प्रमाणावर ठरतो. ज्या बॉक्साईटमध्ये अॅल्युमिना ४५ टक्क्यांपेक्षा अधिक असते ते सर्वोत्तम दर्जाचे असते. त्यापेक्षा कमी असेल, तर ते दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीचे मानले जाते. सिमेंट बनवण्यासाठी अॅल्युमिनाची आवश्यता असते. बॉक्साईटवर प्रक्रिया करून अॅल्युमिना वेगळा केला जातो.

वाहतुकीचे मार्ग वेगळे

अवैध बॉक्साईट नेण्यासाठी मुख्य महामार्ग सोडून अन्य मार्गांचा वापर केला जातो. हे मार्ग सातत्याने बदलले जातात. ज्यावेळी ट्रकची संख्या अधिक असते, त्यावेळी ते दोन किंवा तीन मार्गानी जातात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अवघड असते.

परवाना दगडाचा, वाहतूक बॉक्साईटची दगड वाहतुकीचा परवाना घेतला जातो; पण प्रत्यक्षात बॉक्साईटची वाहतूक केली जाते. अशावेळी त्याची तपासणी काटेकोरपणे होणे आवश्यक असते. सिमेंट निर्मितीमध्ये वापरण्यासाठी बॉक्साईट चोरट्या मार्गाने नेले जाते. ही चोरटी वाहतूक आणि बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच राज्य सीमा भागातील तपासणी नाक्यांवरही कसून तपासणी होणे गरजेचे आहे. त्यातूनही हा बेकायदेशीर प्रकार थांबू शकतो.

-आनंद पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com