
jalgaon News : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यंदा लागवड स्थिर राहील, असे संकेत मिळ असून, लागवडीसाठी शेतकरी रोपांसह कंदांनाही पसंती देत आहेत.
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी ऑगस्ट अखेरीसही आगाप बागांची लागवड करतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी रोपे व कंदांची व्यवस्था केली आहे. रोपांसाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच शेतकऱ्यांनी आगाऊ नोंदणी पुरवठादारांकडे केली होती. जळगावात पुणे, नाशिक, बडवानी (मध्य प्रदेश), जळगावमधील स्थानिक कंपन्या रोपांचा पुरवठा करतात.
अनेक शेतकरी इल्लाकी केळी रोपांची देखील लागवड करणार आहेत. ही लागवडदेखील ऑगस्टच्या अखेरीस होईल, असे दिसत आहे. कांदेबाग केळीसाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, यावल, धुळ्यातील शिरपूर हा भाग प्रसिद्ध आहे. जामनेर, रावेर, मुक्ताईनगर भागातही अनेक शेतकरी कांदेबाग केळीला पसंती देतात. यंदा ही लागवड खानदेशात १७ ते १८ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहू शकते. सर्वाधिक लागवड चोपडा तालुक्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर होईल. धुळ्यातील शिरपुरातही तीन ते चार हजार हेक्टरवर कांदेबाग केळी पीक लागवडीची अपेक्षा आहे.
भडगाव व पाचोरा भागांत मिळून ७०० ते ८०० हेक्टरवर कांदेबाग केळी लागवडीची शक्यता आहे. जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर भागात मात्र कांदेबाग केळी कमी राहील. नंदुरबारातील शहादा, तळोदा तालुक्यांतही अनेक शेतकरी यंदा कांदेबाग केळीची तयारी करीत आहेत. या भागातही ४०० ते ५०० हेक्टरवर कांदेबाग केळी पीक असणार आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पूर्वमशागत केली आहे. अनेकांनी लागवडीसाठी क्षेत्र नापेर ठेवले, त्यात पूर्वमशागत किंवा खोल नांगरणी करून ठेवली होती. काहींनी हिरवळीचे खत म्हणून धैंचाची लागवडही केली होती. मागील सात ते १० दिवस अनेक भागात पाऊस नसल्याने नियोजित क्षेत्रात पुन्हा बैलांकरवी मशागत अनेक शेतकऱ्यांनी करून घेतली आहे. त्यात गवत वाढल्याने काहींना तणनाशकांची फवारणीदेखील करून घ्यावी लागली.
कांदेबाग लागवडीसाठी शेतकरी जुनारी (काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या केळीबागा) बागांमधील कंद आणतात. हे कंद जुनारी बागांच्या क्षेत्रात म्हणजेच यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा भागांत उपलब्ध होतात. त्यात ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र काळे कसदार आहे, असे शेतकरी मध्यम किंवा पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रातील जुनारी बागांमधून कंद आणून त्याची लागवड करतात. तर ज्यांचे क्षेत्र मध्यम व पाण्याचा निचरा होणारे आहे, असे शेतकरी काळ्या कसदार जमिनीतील कंद लागवडीसाठी आणतात.
केळी कंदांमध्ये महालक्ष्मी, श्रीमंती, बसराई, सातमासी, आंबेमोहोर, ग्रॅण्डनैन (उतिसंवर्धित रोपांच्या बागा) आदी कंदांना शेतकरी पसंती देत आहेत. कमी कालावधीत येणाऱ्या कंदांना अधिकची पसंती त्यात आहे. कंदांचे दर वेगवेगळे आहेत. पोहोच चार ते पाच रुपये प्रतिकंद असा दर जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना पडत आहे. शहादा, तळोदा भागांतून कंद आणण्यासाठी जळगावातील शेतकऱ्यांना अधिकचा वाहतूक खर्च मात्र लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.