Reading Skill : वाचाल तर वाचाल, शिकाल तरच टिकाल

Reading Benefits : व्यक्ती उन्नतीला, समाज विकासाला, राष्ट्र उत्कर्षाला वाचन आवश्यक आहे. शिकण्यासाठी व ज्ञान ग्रहणासाठी वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य आहे.
Reading
ReadingAgrowon

शिवाजी काकडे

Reading is an Important : थोर लेखक रिचर्ड स्टिल म्हणतात, “Reading is to the mind what is exercise is to the body,” वाचन हा मनाचा व्यायाम आहे. वाचनाने मनाची, बुद्धीची मशागत होते.

व्यक्ती उन्नतीला, समाज विकासाला, राष्ट्र उत्कर्षाला वाचन आवश्यक आहे. शिकण्यासाठी व ज्ञान ग्रहणासाठी वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य आहे. वाचन संज्ञानात्मक विकासाला चालना देते.बोलली जाणारी भाषा मुले नैसर्गिकरीत्या शिकतात, पण वाचन जाणीवपूर्वक शिकवावे लागते. सामान्यपणे इयत्ता दुसरीपर्यंत मुले वाचायला शिकतात.

National achievement survey (NAS 2021)च्या अहवालाप्रमाणे दुसरी ते आठवीपर्यंतच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांच्या वाचनाच्या अपेक्षित क्षमता विकसित झालेल्या नाही. मुलांच्या भाषिक क्षमता विकसित होण्यासाठी व वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र वाचन चळवळ हा उपक्रम हाती घेण्यात आला.

महाराष्ट्रातील वाचन चळवळ शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ, रीड इंडिया आणि प्रथम बुक्स यांच्या संयुक्त सहयोगातून सुरू करणे बाबतचा शासन निर्णय २२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. सन २०२६ पर्यंत तिसरी पर्यंतचे प्रत्येक मूल समजपूर्वक वाचन करू लागेल आणि इयत्ता आठवी मधील प्रत्येक मूल ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’ या उद्देशाने ही वाचन चळवळ सुरू केली आहे.

मुलांना वाचनाची संधी उपलब्ध करून देणे, दर्जेदार मराठी साहित्य निर्माण करून मराठी भाषेचा नवीन वाचक तयार करणे, वाचनांद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडविणे, मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणं करणे हे या वाचन चळवळीचे उद्दिष्ट आहे.

Reading
Drought Condition : अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीतील सवलती लागू

स्क्रीन टाइम एक समस्या

टी.व्ही., स्मार्टफोन, टॅब्लेट, आयपॅड, संगणक यांच्यावरील मुलांचा व एकंदरीत सर्वांचाच स्क्रीनटाइम हा एक डोकेदुखीचा विषय झाला आहे. मोबाइल फोनच्या अतिवापराचा मुलांच्या अभ्यासावर जसा परिणाम होतो तसा एकूणच सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम झालेला दिसतो. मुलांना सतत हातामध्ये मोबाइल हवा असतो.

त्यामुळे डोळ्यांचे दोष, झोपेवर परिणाम, एकलकोंडेपणा, चिडचिड, आक्रस्ताळेपणा व इतरही शारीरिक व मानसिक व्याधींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. स्क्रीन टाइम कमी करणे हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वाचन संस्कृती जोपासणे व वाढवणे.

वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास

अन्न, वस्त्र, निवारा यानंतर पुस्तक ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे. माणूस म्हणून व्यक्तीचा परिपूर्ण विकास होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे. पुस्तके मुलांना मूलभूत भाषा कौशल्ये विकसित करण्यास आणि त्यांच्या शब्दसंग्रहाचा विस्तार करण्यास मदत करतात.

वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात.बालवयातच झालेले संस्कार मुलांना आयुष्यभर प्रेरणा देतात. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शाळेतील शिक्षक व लेखक असलेले कृष्णाजी केळुसकर यांनी वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली.

या पुस्तकांमुळेच बाबासाहेबांचे पुढचे आयुष्य घडले. यामुळे बाबासाहेब यांचे ग्रंथप्रेम जगविख्यात आहे. केवळ महागडी शाळा, महागडे क्लास आणि खूप मार्क म्हणजे शिक्षण नव्हे.

प्रत्येक पिढीतील पालकांना असे वाटते की, आपली मुलं अजून जास्त हुशार, चौकस व्हावीत. हुशार म्हणजे पाठ्यपुस्तकीय गुणवत्ता एवढाच त्याचा अर्थ घेतला जातो. यामुळे शिक्षक आणि पालकही केवळ पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेच्या मागे लागतात.

आज आपली मुलं पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेत पुढे आहेत. परंतु कल्पनाशक्तीचा विस्तार करण्यास कमी पडतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासातही मुले मागे पडतात. याला मुख्य कारण म्हणजे आपल्या घरात, शाळेत मुलांच्या हातात आपण गोष्टींचे पुस्तके मोठ्या प्रमाणावर देत नाही. सुशिक्षित घरातही मुलांना बालसाहित्य वाचनास प्रोत्साहन दिले जात नाही.

आपल्याला भावी पिढी मानसिकदृष्ट्या निरोगी व कल्पक घडवायची असेल तर मुलांच्या हातात सकस बालसाहित्य दिले पाहिजे. कारण मुलांचे भावविश्‍व हे बालसाहित्य वाचनातून लवकर समृद्ध होते.

Reading
Water Budget : पाण्याचे अंदाजकपत्रक कसे मांडायचे?

रामायण, महाभारत, बुद्धजातक कथा, इसापनीती, पंचतंत्र, प्राणिकथा, कल्पितकथा, बोधकथा यांनी भारतीय कथा वाङ्‍मय समृद्ध होते. या सर्व कथांचा हेतू सर्वसामान्य लोकांवर मनोरंजनातून नीतिशिक्षण देण्याचा होता.

लहान मुलांना कथा खूप आवडतात. कथेतून संस्कार करणे व मूल्य रुजवणे सहज सोपे असते. मुले टीव्हीवर, मोबाइलवर विविध कार्टून्स, गेम्स, रील्स बघतात. यातील हिंसक व मारामाऱ्या करणाऱ्या प्रसंगांचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.व्हिडिओ, गेम्स, रील्स यांनी मुलांच्या मन आणि बुद्धीवर ताबा मिळवला आहे.

व्हिडिओमधील मारामारी करणारे, नृत्यावर थिरकणारे लोक दुर्दैवाने आपल्या मुलांचे नायक होत आहेत. या माध्यमांनी एकप्रकारे आपली मुलेच चोरली आहेत. याउलट मुलांना गोष्टी सांगितल्या किंवा वाचायला लावल्या तर मुले देखील गोष्टीतील नायकाप्रमाणे आपणही शूरवीर व्हावे, सद्‍वर्तनी व्हावे असा विचार करतात. आपल्या मुलांचे खरे नायक महापुरुष, शास्त्रज्ञ, विचारवंत होण्यासाठी वाचनच आवश्यक आहे.

वाचन लोकचळवळ व्हावी

शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेला उपक्रम महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम लोकचळवळ व्हावा. शाळा तिथे ग्रंथालय हवेच. यामध्ये मुलांच्या वयानुरूप बालसाहित्य असावे. कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, चरित्र, आत्मचरित्र, तत्त्वज्ञान, संतसाहित्य, इतिहास यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके असावी.

सकाळ, अॅग्रोवनसारखी दर्जेदार वर्तमानपत्रे ग्रंथालयात नियमित सुरू करावीत. ॲग्रोवनने राज्यभरात शेतकरी वाचक निर्माण केला. या वाचनातून शेतकरी वाचक, लेखक, विचारवंत तर झालाच बरोबरीने आर्थिकदृष्ट्या सक्षमदेखील झाला ही ज्ञानाची किमया आहे.

घरोघरी पुस्तकाचं कपाट असावं. पालकांनी मुलांसोबत बोलताना पुस्तकांविषयी चर्चा करावी. स्वतःदेखील पुस्तके वाचून मुलांना पुस्तक वाचनाची प्रेरणा द्यावी. यातून वाचन संस्कृती नक्कीच वाढीला लागेन.

वाचन चळवळीत विविध उपक्रम अपेक्षित आहेत. त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. आकाशवाणी, दूरदर्शन यांवर देखील शाळेच्या वेळात कार्यक्रम प्रसारित व्हावे. आकाशवाणी वरील कथाकथन, पुस्तकवाचन हे कार्यक्रम खूप प्रभावी असतात. मुलांना श्रवणाची सवय होते व चांगले विचारदेखील ऐकायला मिळतात.

दररोज किमान अर्धा तास शाळेत अवांतर वाचनासाठी असावा. मुलांसाठी वाचन स्पर्धा, लेखन स्पर्धा व इतरही स्पर्धा आयोजित केल्या तर मुलांना पुस्तक वाचनासाठी प्रोत्साहन मिळेल. वाचन चळवळ ही लोकचळवळ व्हावी. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र सक्षम व सशक्त बनविण्यासाठी पुस्तकांशी मैत्री हवीच. मुलांनी पुस्तके वाचली तरच मुले शिकतील आणि शिकली तरच जगाच्या स्पर्धेत टिकतील.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com