Indrajit Bhalerao : 'जैत रे जैत' नं महानोरांना कशी ओळख मिळवून दिली ?

Mahanor's Poem : १९८०-८२ चा काळ. आमची पिढी नेमकीच वाचायला, लिहायला लागलेली होती. आणि नेमका त्याच काळात ना. धों. महानोर यांच्या कवितेचा डंका वाजत होता.
Na. Dho. Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon
Published on
Updated on

इंद्रजित भालेराव

१९८०-८२ चा काळ. आमची पिढी नेमकीच वाचायला, लिहायला लागलेली होती. आणि नेमका त्याच काळात ना. धों. महानोर यांच्या कवितेचा डंका वाजत होता. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते लता मंगेशकरांपर्यंत सगळे जण एकसुरात महानोरांच्या कवितेच्या कौतुकाच्या नौबती झडवत होते. ते सगळं कानावर येत होतं. महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह मिळवून, रानामध्येच वाचून आम्हीही त्या कवितेने बेभान झालेलो होतो. महानोरांच्या कवितेला रानाचा लळा होता आणि महानोरांच्या कवितेने अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावला होता.

या शेताने लळा लाविला असा असा की

सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो

ही या कविता संग्रहातली महानोरांच्या हस्ताक्षरातली पहिलीच कविता सर्वांना जखडून टाकणारी होती. रानावनातल्या माणसांनाही ती आपली वाटत होती आणि शहरी मध्यमवर्गीयांनाही ती रम्य वाटत होती. त्यामुळे महानोरांच्या कवितेचा रसिक चाहता हा रानाडोंगरापासून ते महानगरांपर्यंत पसरलेला होता. त्या काळात महानोरांच्या वाट्याला जे कौतुक आलं ते इतर कुणाही कवीच्या वाट्याला आलं नाही.

१९७८ मध्ये आलेला ‘जैत रे जैत’ चित्रपट आणि त्यातली गाणी सगळ्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून वाजत होती, गाजत होती. ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजे जी’ या गाण्यासोबत सर्वत्र महानोरांच्याच कवितेचे ढोल वाजत होते. एकापाठोपाठ एक अशा अनेक विक्रमांनी महानोर यांची कविता पुढे पुढे चालली होती.

त्या देदीप्यमान यशाकडे आमची पिढी विस्फारीत डोळ्यांनी पाहत होती. त्यापासून प्रेरणा घेत होती. रानातल्या कवितानंतर एकापाठोपाठ एक त्यांचे वही, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, प्रार्थना दयाघना, पानझड, तिची कहाणी असे कवितासंग्रह येत गेले. आम्ही उत्सुकतेने वाट पाहत भारावून वाचत गेलो.

Na. Dho. Mahanor
Ethanol Production : इथेनॅालनिर्मीती बंदीवरून राजू शेट्टींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

ना. धों. महानोर या नावाचा पहिला परिचय झाला तो रेडिओमधून. ‘जैत रे जैत’ चित्रपटाची गाणी आली आणि माझ्यासारख्या आडनिड्या वयाच्या मुलांना त्या गाण्यांनी झपाटून टाकलं. तो १९७८ चा काळ. रेडिओवर सर्व आकाशवाणींच्या ‘आपली आवड’ या श्रोत्यांनी पसंती कळवलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात पहिलं गाणं ‘जैत रे जैत’मधलंच असायचं.

मग ते कधी ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’ असे, तर कधी ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ हे गाणं असे. ‘आपली आवड’मध्ये प्रामुख्याने ही दोनच गाणी जास्त गाजत होती. रेडिओ कानाला लावून आम्ही ‘आपली आवड’ची वाट पाहायचो. त्या काळी मुंबई, जळगाव, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद अशा पाच आकाशवाणी केंद्रांवर रविवारी हा कार्यक्रम असायचा.

सगळ्यांना हा कार्यक्रम ऐकता यावा म्हणून या आकाशवाणी केंद्रांनी आपापल्या वेळा वाटून घेतल्या होत्या. साडेअकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालायचे. मी या केंद्रावरची ‘आपली आवड’ संपली की पुढच्या केंद्रावर पळायचो, तिथली ‘आपली आवड’ संपली की त्याच्या पुढच्या केंद्रावर पळायचो. हमखास, चुकू न देता ‘जैत’चं गाणं ऐकायचो. कारण तेव्हा ही गाणी ऐकण्यासाठी रेडिओशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता आणि या गाण्यांनी तर वेड लावलेलं होतं.

रानात आखाड्यावर रविवारी दिवसभर मी ही गाणी ऐकत बसायचो. मी माझा रेडिओ कधी बंद करून पाहिला, तर रानावनातून सगळीकडून ‘जैत''च्या गाण्यांचे आवाज यायचे. त्या काळात आजच्या मोबाइलसारखा रेडिओ लोकप्रिय झालेला होता. लग्नात जावयाला हमखास रेडिओ मिळायचा. सासऱ्याने रेडिओ दिला नाही तर जावई रेडिओसाठी रुसून बसायचे.

मग तातडीनं तालुक्याला माणूस पाठवून रेडिओ विकत आणला जायचा. जावयाला दिला जायचा. त्यामुळे शेतातल्या सगळ्या आखाड्यांवर रेडिओ नक्की असायचा. शेतकऱ्यांची माझ्यासारखी आडनिड्या वयाची पोरं कायम कानाला रेडिओ लावून बसलेली असायची.

महानोरांच्या ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गीताचा प्रभाव केवळ रसिक श्रोत्यांवरच पडला असं नाही, तर तो सर्व क्षेत्रातल्या लोकांवर झाला. चित्रपटात तसं एखादं गाणं असावं असं सगळ्या चित्रपट निर्मात्यांना वाटू लागलं. दादा कोंडके यांच्यासारख्या मुळातच लोकप्रिय असलेल्या माणसालादेखील जांभूळगीतानं भुरळ घातली. त्यांच्या चित्रपटातून लगेचच एक जांभूळगीत अवतरलं. ‘पिकलं जांभूळ तोडू नका, कुणी झाडावरती चढू नका’ हे दादा कोंडके यांचं गाणं महानोर यांच्या जांभूळगीतापाठोपाठ लोकप्रिय झालं.

त्यानंही आकाशवाणीवरील ‘आपल्या आवडी’त जागा मिळवली. शाहीर निवृत्ती पवारसारख्या लोकगीत गायकालाही जांभूळगीताची भुरळ पडली. त्यांनी ‘करू नकोस टाकमटीका, रंग तुझा फिका, कपाळावर टिकली, नारी चला माझ्या गावाला गं जांभळं पिकली’ यासारखं गाणं लिहिलं. आणि तेही लोकप्रिय झालं. पूर्वी मराठी गाण्याच्या बाहेर असलेलं जांभूळ हे फळ आता मराठी गाण्यात आलं. मराठी गीतविश्‍वात जांभूळगीतांचा सडाच पडला.

Na. Dho. Mahanor
Rabi Sowing : रब्बी पेरण्यांनी घेतला वेग

सहज आठवणारी म्हणून वरील दोन गाणी मी नमूद केली. इतरही अशी अनेक गाणी तेव्हा आली होती. याआधी फार तर पेरूसारखं फळ पोपटासोबत मराठी गाण्यात आलेलं होतं. आंबाही लावण्यांमधून आला होता. पण जांभळाकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नव्हतं. महानोरांच्या या गाण्यानं सगळ्यांचंच लक्ष जांभळाकडं गेलं. जांभळाच्या दिवसांत जशी गावातल्या सगळ्या पोरांनी जांभळाखाली गर्दी करावी तशी या कलावंतांनी जांभळाभोवती गीत, कविता, प्रतिमा शोधण्यास सुरुवात केली.

‘जांभूळ आख्यान’ हे लोकनाट्यही या दरम्यानच रंगभूमीवर अवतरलं आणि तेही तुफान लोकप्रिय झालं. याआधी कथेत मात्र जांभूळ आलेलं होतं. व्यंकटेश माडगूळकर यांची ‘जांभळाचे दिवस’ नावाची कथा खूप लोकप्रिय होती. त्यांच्या एका कथासंग्रहाचं शीर्षकही ‘जांभळाचे दिवस’ असंच होतं. पुढे भास्कर चंदनशिव यांनी त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे नाव ‘जांभळडव्ह’ असं ठेवलं.

‘जैत रे जैत''च्या गाण्यांचा प्रभाव जसा इतरांवर पडला तसा तो स्वतः ना. धों. महानोर यांच्यावरही पडला. ‘जैत रे जैत’नंतर महानोरांची कविता बदलली. ती ‘जैत''मधील गीतांच्या वळणानं गेली. ‘पानझड’मध्ये तिचं एकत्र दर्शन आपणाला होतं. योगायोगानं याच संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. ज्याच्या लोकप्रियतेच्या प्रभावातून स्वतः कवी देखील स्वतःला वाचवू शकला नाही, तिथं इतरांची काय कथा!

‘जैत’च्या गाण्यांच्या लोकप्रियतेमध्ये कवी, गायक आणि संगीतकार असा तिघांचाही वाटा समान होता. या तीनही घटकांमुळे या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली. यातला कुठलाही एक घटक तिथं अनुपस्थित असता तर ही गाणी इतक्या मोठ्या प्रमाणात गाजली नसती. हा समसमा संयोग चित्रपटसृष्टीत फारच कमी वेळा जुळून आलेला आहे. या गाण्यांचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर हे देखील ‘जैत’च्या गाण्यांच्या प्रभावातून सुटले नाहीत. आपणच दिलेल्या या गाण्यांच्या संगीताची भुरळ स्वतः संगीतकारालाही पडली. या गाण्यांच्या चालीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटात दोन वेळा वापरल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com