Indrajit Bhalerao : महानोर शेतीत का रमले ?

Mahanor in Agriculture : महानोर शेतीत का रमले ? याविषयीची माहिती पाहुयात.
N D Mahanor
N D MahanorAgrowon
Published on
Updated on

Na. Dho. Mahanor : महानोरांच्या कवितेनं आणि गाण्यांनी तरुण पिढी तर झपाटली होतीच; पण मागच्या पिढीलाही महानोर यांच्या कवितेनं झपाटलं होतं. १९७४ ला इचलकरंजीला झालेल्या संमेलनात महानोरांच्या कवितेची जादू पाहिलेले आधीच्या पिढीचे थोर कवी बा. भ. बोरकर हे जेव्हा गोव्याला परत गेले, तेव्हा तिथं भेटेल त्याच्याजवळ महानोरांच्या कवितेचं कौतुक करू लागले.

मी गोव्याला गेलो तेव्हा बोरकरांचे भाचेजावई आणि गोव्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री सुरेश अमोणकर यांनी मला त्यांच्या घरी नेलं होतं. तेव्हा सोमनाथ कोमरपंत आणि सुरेश आमोणकर यांनी मला बोरकरांनी त्या काळात महानोर यांच्या कवितेच्या सतत केलेल्या कौतुकाचे काही किस्से सांगितले. बोरकरांनी ‘सत्यकथे’त महानोरांच्या कवितेवर लेखही लिहिलेला होता. बोरकरांच्या पिढीचे कुसुमाग्रज हे देखील महानोर यांच्या कवितेवर तितकेच फिदा झालेले होते.

‘जैत रे जैत’नंतर आली ती ‘माझ्या आजोळची गाणी.’ यातल्या ‘किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं’ आणि ‘राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तुम्हाविन बाई’ या दोन लावण्या तुफान लोकप्रिय झाल्या होत्या. आकाशवाणीवरील ‘आपली आवड’मधल्या जैतच्या गाण्यांची जागा आता ‘आजोळच्या गाण्या’तल्या या दोन लावण्यांनी घेतलेली होती.

‘जैत रे जैत''मध्ये लता मंगेशकर यांच्या वाट्याला फारशी गाणी आलेली नव्हती. त्यातली सगळी लोकप्रिय गाणी आशा भोसले यांनी गायलेली होती. त्या गाण्यांची लोकप्रियता पाहून लताबाईंनाही वाटलं, की महानोर यांची कविता आपण गावी. हा साक्षात लता मंगेशकर यांच्यावर पडलेला ‘जैत''च्या गाण्यांचा प्रभाव होता.

महानोरांच्याच परिसरात असलेलं थाळनेर हे लताबाईंचं आजोळ. त्यांनी लहानपणी आजोळी ऐकलेल्या लोकगीतांवर हृदयनाथ मंगेशकर यांना सांगून महानोरांच्या कविता बसवल्या आणि ‘माझ्या अजोळची गाणी’ ही रेकॉर्ड तयार केली. ‘जैत रे जैत’इतकीच ही रेकॉर्ड सर्वत्र लोकप्रिय झाली.

N D Mahanor
Na. Dho. Mahanor : कविवर्य महानोर यांना साश्रू नयनांनी निरोप

कॅसेटचा जमाना अजून आलेला नव्हता. टेप अजून घरोघरी आलेले नव्हते. गंगाखेडच्या प्रा. म. गो. देशपांडे यांनी मला या संदर्भातील एक आठवण सांगितली, ‘‘दररोज संध्याकाळी संत जनाबाई महाविद्यालयातील आम्ही काही प्राध्यापक एका हॉटेलवर चहा प्यायला जमायचो आणि आवर्जून हॉटेल मालकाला ‘माझ्या आजोळची गाणी’ लावायला सांगायचो. ती गाणी ऐकत ऐकत आम्ही चहा घ्यायचो. हा आमचा नित्याचाच नियम झालेला होता.

केवळ ही गाणी ऐकण्यासाठी आम्ही सगळे प्राध्यापक तिथं चहा पिण्याच्या निमित्तानं जमायचो.’’ आम्हाला असा देशपांडे सरांसारखा काही पर्याय अजून आमच्या लहानशा गावात उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळं आम्ही ही गाणी रेडिओवरच जेव्हा लागतील तेव्हा ऐकत होतो. प्रा. देशपांडे तालुक्याच्या पातळीवर असलेल्या गावात राहत असल्यामुळं तिथल्या हॉटेल मालकाला आवर्जून विनंती करून त्यांनी आजोळच्या गाण्याची रेकॉर्ड मागवायला सांगितलेली होती.

मी १९७९ ला दहावीच्या वर्गात होतो. तेव्हा आम्हाला आमच्या मराठीच्या पुस्तकात ना. धों. महानोर यांची कविता होती.

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतूनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येते फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

त्या कवितेशेजारी कवीचा छोटासा फोटोही होता. तेव्हा आठवी, नववी आणि दहावी अशा तीन वर्गांत लेखकाचा फोटो छापण्याची पद्धत बालभारतीत होती. त्यामुळं तो छोटासा फोटो पाहून आम्हाला महानोरांची ओळख झाली होती. कविता शिकवणारे गुरुजी फारसे चांगले नव्हते. त्यामुळं कविता फारशी मनात रुजली नाही. त्या वयात ती कविता स्वतः समजून घेता यावी इतकी सोपी नव्हती. अर्थातच नंतर मी कविता वाचू लागलो तेव्हा त्या कवितेचा सखोल अर्थ मला कळला.

N D Mahanor
Na. Dho. Mahanor : रानकवी ना. धों. महानोर यांचा जीवनपट...

पुढं दोनच वर्षांनी १९८१ मध्ये मी वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयात गेलो. तेथे मला मराठी शिकवणारे प्रा. श्यामलाल अग्रवाल यांच्या घरी मला ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह पाहायला मिळाला. या कवितासंग्रहाच्या पाठीमागचं त्यांचं रेखाटनही पाहायला मिळालं. तेव्हा मला कविता चांगली कळू लागली होती. कवितेची गोडीही लागलेली होती.

‘रानातल्या कवितां’नी मला वेडावून टाकलं होतं. आधी गाण्यातून मनावर ठसलेले महानोर आता कवितेतून मनात झिरपत जात होते. महाविद्यालयात असताना ना. धों. महानोर यांची गाणी आपणाला पाहिजे तेव्हा ऐकता यावीत म्हणून मी एक सोय करून घेतली होती. माझा धाकटा भाऊ औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात गेला तेव्हा अधून मधून त्याच्या भेटीसाठी मी जात होतो. एका भेटीत ‘जैत’ची गाणी टेपवर उतरवून घेतली.

त्या काळात बाजारात ‘जैत’च्या गाण्याच्या रेडिमेड कॅसेट आलेल्या नव्हत्या. तेव्हा रेकॉर्ड टेपवर उतरवून घ्यावी लागायची. त्या एका तासाच्या कॅसेटमध्ये चाळीस मिनिटांची ‘जैत रे जैत’ची गाणी आणि वीस मिनिटांची ‘माझ्या आजोळची गाणी’ बरोबर बसली. मला सोन्याचा खजिनाच सापडल्यासारखं झालं. ती कॅसेट घेऊन परत मी वसमतला महाविद्यालयात आलो. पण माझ्याकडं अर्थातच टेप नव्हता. टेपचा आग्रह मी वडिलांना करू शकत नव्हतो.

कारण ती चैनीची गोष्ट होती. आणि चैन करण्याइतकी आमची आर्थिक स्थिती नव्हती. सत्यम बोगेवार नावाचे आमच्या महाविद्यालयात ग्रंथालय सहायक असलेले एक गृहस्थ होते. त्यांच्याकडचा सोनीचा टेप मी अधून-मधून घेऊन यायचो. महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही कॅसेट पुन्हा पुन्हा ऐकत बसायचो. कारण एकदा टेप नेऊन दिला की पुन्हा आठ-दहा दिवस तो लगेच मागता येणं शक्य नव्हतं. इतकं त्या गाण्यांनी आम्हाला वेड लावलेलं होतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com