Washim News : पशुधनाच्या कानावर शिक्के (इअर टॅगिंग) मारले नसतील तर येत्या १ जूनपासून जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही. जिल्ह्यात इअर टॅगिंग मोहीम सुरू असून आतापर्यंत ७० टक्के पशू, जनावरांचे इअर टॅगिंग झाले आहे. उर्वरित ३० टक्के पशुपालकांनी देखील जनावरांचे इअर टॅगिंग करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यामध्ये इअर टॅगिंग (१२ अंकी बारकोड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेतल्या जात आहेत. यासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत इअर टॅगिंग करण्याची मोहीम राबवली जात आहे. यापुढे भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय १ जूननंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार होणार नाहीत.
वाशीम जिल्ह्यात २०१९ च्या गणनेनुसार ४ लाख ९१ हजार ६७४ जनावरांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत यापैकी जवळपास ७० टक्के जनावरांचे टॅगिंग आटोपले आहे. उर्वरित जनावरांचेही टॅगिंग सर्व पशुपालकांनी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे.
इअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर जनावरांची खरेदी-विक्री तसेच जनावरांवर उपचार करता येणार नाही. जनावरांच्या कानाला टॅग नसल्यास त्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार नाही. तसेच नैसर्गिक आपत्ती, विजेचा झटका, तसेच अन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या कानाला टॅग नसल्यास नुकसानभरपाई सुद्धा मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांनी दिली.
वाशीम जिल्ह्यातील पशुधन
गायवर्ग १६८०९२, म्हैस ५३८२६, शेळी ११९६१९, मेंढी ९३९४, वराह ७१९३, कुक्कुट ११६४७७, इतर १७०७६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.