डॉ. ओम पवार, डॉ. दर्शना भैसारे, डॉ. मुकुंद कदम, डॉ. हर्षल बोकडे
भाग ः १
Poultry : कुक्कुटपालन व्यवसाय हा मुख्यतः अंडी आणि मांस उत्पादनासाठी केला जातो. देशातील विविध संशोधन संस्थांनी विशिष्ट गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या विविध संकरित जाती विकसित केल्या आहेत. त्यानुसार कुक्कुटपालनासाठी योग्य जातीची निवड करावी.
कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी अंडी की मांस उत्पादन याचा निर्णय घेऊन त्यानुसार कोंबड्यांच्या जातींचा विचार करावा लागतो. प्रत्येक जातीच्या कोंबडीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात. त्याची माहिती कुक्कुटपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार व्यवसायासाठी योग्य कोंबडीच्या जातीची निवड करणे शक्य होते.
संकरित कोंबड्यांची वैशिष्ठ्ये ः
- प्रतिकूल वातावरणात व साध्या घरट्यात वाढविणे शक्य.
- सहज उपलब्ध होणाऱ्या खाद्यामध्ये ही चांगल्या वाढतात.
- दोन परस्पर अंडी उत्पादन साखळीतील अंतर कमी.
- मांस तसेच अंड्याची चव व अन्नद्रव्य घटक देशी कोंबड्यांसारखेच असतात. मांसामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते.
- रोग प्रतिकारक क्षमता जास्त असल्याने रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी.
- खाद्याचे मांसामध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण (२.२) चांगले असते.
- साधारणतः आठ आठवड्यांमध्ये पक्ष्याचे वजन १२५० ग्रॅम इतके भरते.
- अंड्याचे वजन (५५ ते ६३ ग्रॅम) देशी कोंबड्यांच्या अंड्यापेक्षा जास्त असते.
- परसातील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त.
- अंडी उत्पादनासाठी विकसित जाती ः कॅरी निर्भिक, उपकॅरी, कॅरिश्यामा, हिटकॅरी, ग्रामप्रिया, गिरिराजा, कृषी-ब्रो, वनराजा, गिरीरानी.
कोंबड्यांच्या संकरित जाती ः
जात---संस्थेचे नाव---उत्पादकता
गिरीराजा---पशुवैद्यकीय महाविद्यालय, बंगलोर---अंडी व मांस
गिरीराणी---पशुवैद्यकीय महाविद्यालय, बंगलोर---अंडी
वनराजा---कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद---अंडी व मांस
ग्रामप्रिया---कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद---अंडी
श्वेतप्रिया---कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद---अंडी
कृषी-ब्रो---कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद---अंडी व मांस
कृषी-जे---पशुवैद्यकीय महाविद्यालय, जबलपूर---अंडी
ग्रामलक्ष्मी---केरळ कृषी विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय, केरळ---अंडी
हिटकॅरी---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी व मांस
उपकॅरी---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी व मांस
कॅरी निर्भीक---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी
कॅरी श्यामा---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी
कॅरी सोनाली---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी
कॅरी प्रिया---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी
कॅरी देवेंद्र---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर---अंडी व मांस
कॅरी ब्रो विशाल---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ.प्रदेश)---मांस
कॅरी ब्रो धनराजा---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ.प्रदेश)---मांस
कॅरी ब्रो मृत्युंजय---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ.प्रदेश)---मांस
कॅरी ब्रो ट्रोपिकाना---केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ.प्रदेश)---मांस
स्वर्णधारा---कुकुटपालनशास्त्र विभाग, कर्नाटक पशुविज्ञान विद्यापीठ, बंगलोर---अंडी
कलिंगा ब्राउन---केन्द्रीय कुक्कुट विकास संघटन, भुवनेश्वर---अंडी
सातपुडा---यशवंत ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव---अंडी व मांस
कावेरी---केंद्रीय कुक्कुट विकास संघटन, बंगलोर---अंडी
प्रतापधन---महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान---अंडी व मांस
श्रीनिधी---कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद---अंडी व मांस
कामरूपा---आसाम कृषी विद्यापीठ, गुवाहाटी---अंडी व मांस
नर्मदानिधी---पशुवैद्यकीय महाविद्यालय, जबलपूर---अंडी व मांस
इंडब्रो ब्राउन लेअर---इंडब्रो रिसर्च व ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड---अंडी व मांस
जर्सिम बिरसा---कृषी विद्यापीठ, रांची, झारखंड---अंडी व मांस
नंदनम चिकन १---तामिळनाडू पशू व प्राणी विज्ञान विद्यापीठ, चेन्नई---अंडी व मांस
नंदनम चिकन २---तामिळनाडू पशू व प्राणी विज्ञान विद्यापीठ, चेन्नई---मांस
नंदनम चिकन ४---तामिळनाडू पशू व प्राणी विज्ञान विद्यापीठ, चेन्नई---अंडी व मांस
गिरीराजा ः
- पशुवैद्यक महाविद्यालय, हेब्बल, बंगलोर यांच्याद्वारे विकसित.
- मांस व अंडी उत्पादनासाठी उपयुक्त.
- नर पक्षी सुमारे ४ किलोपर्यंत तर मादी ३ किलोपर्यंत वाढते.
- अंडी उत्पादनाचे वय ः २२ ते २३ आठवडे.
- वार्षिक अंडी उत्पादन ः १८० ते १९० अंडी
वनराजा ः
- कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद यांच्याद्वारे विकसित.
- ही जात कॉर्निश आणि स्थानिक जातीची संकर आहे.
- अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.
- वजनाला हलकी आणि लांब पाय असल्यामुळे स्वरक्षण करू शकते.
- ग्रामीण व आदिवासी भागांत परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त.
- वार्षिक अंडी उत्पादन ः १६० ते १८० अंडी.
ग्रामप्रिया ः
- कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद या संस्थेद्वारे विकसित.
- प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी उपयुक्त.
- परसबागेतील अंडी उत्पादनासाठी फायदेशीर.
- ही जात व्हाइट लेगहोर्न आणि स्थानिक जातीची संकर आहे.
- साधारण ७२ आठवड्यांमध्ये सुमारे २०० ते २२५ अंडी देते.
श्वेतप्रिया ः
- कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद या संस्थेद्वारे विकसित.
- ही जात पी.बी.१ आणि नेकेड नेक या दोन जातींची संकर आहे.
- वार्षिक अंडी उत्पादन ः २०० अंडी.
कृषी-ब्रो ः
- कुक्कुट अनुसंधान निदेशालय, हैदराबाद या संस्थेने विकसित केलेली जात.
- आकर्षक रंगाची पिसे व उष्ण तापमानाला जुळवून घेण्याची क्षमता हे प्रमुख वैशिष्ट्य.
- मांसोत्पादनासाठी उत्तम.
- रोगप्रतिकारक क्षमता चांगली.
- ६ आठवड्यांत १.२ किलोपर्यंत वजन वाढते.
हिटकॅरी ः
- केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेने विकसित केली आहे.
- ही जात कॅरी रेड आणि नेकेड नेक या दोन जातींची संकर आहे.
- प्रामुख्याने उष्ण हवामान व जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणासाठी योग्य.
- अंडी उत्पादनाचे वय १७२ दिवस असून प्रतिवर्षी १७४ अंडी उत्पादित करते.
उपकॅरी ः
- केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेद्वारे विकसित.
- स्थानिक जात, फ्रिजल आणि कॅरी रेड या तीन जातींची संकर ही जात आहे.
- रोगप्रतिकारक क्षमता तसेच उष्ण हवामानामध्ये तग धरण्याची क्षमता जास्त असते.
- जास्त अंडी उत्पादन क्षमता. अंडी उत्पादन वय १७० ते १८० दिवस.
- प्रतिवर्ष अंडी उत्पादन ः १६५ ते १८० अंडी.
कॅरी निर्भिक ः
- केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेने ही जात विकसित केली आहे.
- असील आणि कॅरी रेड या दोन जातींची संकर.
- नर पक्षी ३ ते ४ किलो आणि मादी पक्षी २ ते ३ किलो वजनापर्यंत वाढतात.
१० आठवड्यांत १.३५ किलोपर्यंत वजन मिळते.
- अंडी उत्पादन वय ः १७६ दिवस.
- प्रतिवर्षी अंडी उत्पादन ः १९८ अंडी.
----------------------------------
- डॉ. दर्शना भैसारे, ६३९६७६४१८०
- डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४
(कुकुटपालनशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.