Hurda Party : जिरायती भागातील गोविंदबनात बहरली हुरडा पार्टी

Govindban Festival : कोरेगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील बाळासाहेब मोहारे यांनी हुरडा ज्वारीची लागवड व हुरडा पार्टी- कृषी पर्यटन व्यवसायाचे मूल्यवर्धन केले आहे. डोंगराळ माळरानावरील ‘गोविंदबनात सुरू असलेल्या या व्यवसायाने चांगलेच मूळ पकडले असून, त्यातून मोहारे यांनी आपल्या जिरायती शेतीला मोठा आर्थिक आधार प्राप्त करून दिला आहे.
Hurda Party
Hurda PartyAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Culture : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कोरेगाव आहे. या भागात शेतीसाठी पाण्याचे कायम दुर्भिक्ष असते. त्यामुळे रब्बी, उन्हाळी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी आदी पारंपारिक पिकांसह उपलब्ध पाण्यावर गहू, कांदा, हरभरा या सारखी पिके शेतकरी घेतात. काही शेतकरी फळबागाही करतात. कोरेगावातील बाळासाहेब मोहारे यांचे सर्वसाधारण शेतकरी कुटुंब होते. त्यांची तीस एकर शेती आहे. इयत्ता दहावीपर्यंत शिकलेले बाळासाहेब ही सारी शेती पाहतात. काही काळ त्यांनी राजकारणाला दिला. सामाजिक कामांमध्येही ते अग्रेसर असतात.

हुरडा पार्टी व्यवसायाला चालना

बाळासाहेब यांचे बंधू कै. शशिकांत ऊर्फ प्रदीप यांचे शेतीत वेगळेपण आणून कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होते. मात्र २००९ मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. भावाच्या संकल्पनेवर बाळासाहेबांनी काम सुरू केले. अलीकडील काळात हुरडा पार्टीला चांगलेच मार्केट मिळू लागले आहे. अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायातून अर्थार्जन सुरू केले आहे. बाळासाहेबांकडे पूर्वी ज्वारीचे पीक होते.

मात्र संधी हेरून सुमारे पाच- सहा वर्षांपूर्वीपासून त्यांनी हुरडा ज्वारीची लागवड करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे कणसे विकली. ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला तशी टप्प्याटप्प्याने हुरडा पार्टी व कृषी पर्यटन या दृष्टीने शेती व्यवसायाचे मूल्यवर्धन केले. गुंडेगाव (ता. अहिल्यानगर) येथील डॉ. संतोष भापकर, डॉ. नैना भापकर, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, चुलते सेवानिवृत्त तहसीलदार वसंतराव मोहारे यांचे त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Hurda Party
Jowar Hurda : गावरान आंबट-गोड, आरोग्यदायी ज्वारीचा हुरडा; शेतकऱ्यांना ठरतोय आर्थिक हातभार

मूल्यवर्धन व्यवसायाला चालना

आज बाळासाहेबांनी सहकारी दादासाहेब मच्छिंद्र साबळे यांच्या भागीदारीतून हुरडा पार्टी व कृषी पर्यटन व्यवसाय मागील पाच-सहा वर्षांच्या अथक परिश्रमातून बहरात आणला आहे. गोविंदबन असे त्याचे नाव आहे. दरवर्षी पाच ते सहा एकरांवर हुरडा ज्वारीची पेरणी ते करतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मधुर हा खास हुरड्याचा वाण विकसित केला आहे. एकरी सहा क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. खाण्यासाठी चवदार, गोड व कणीसही मोठे अशी या वाणाची वैशिष्ट्ये आहेत. सुमारे नव्वद दिवसांत हुरडा तयार होतो. त्यानंतर दहा दिवसांपर्यंत तो राहतो.

पेरणीचे नियोजन

ऑगस्टमध्ये ज्वारीची पेरणी होते. साधारण १५ नोव्हेंबरपासून हुरडा विक्रीला सुरुवात होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत हंगाम सुरू राहतो. तोपर्यंत ग्राहक हुरडा खाण्यासाठी येतात. अधिक काळ हुरडा विक्रीसाठी उपलब्ध राहावा यासाठी साधारण पंधरा दिवसांच्या अंतराने पेरणीचे नियोजन असते. सुरुवातीला ग्राहकांची संख्या कमी असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात दहा गुंठ्यांवर पेरणी असते. डिसेंबर-जानेवारी काळात ग्राहकांची संख्या अधिक, त्या दृष्टीने पेरणीची वेळ व क्षेत्रवाढ केली जातेअगदी शेवटच्या टप्प्यात ग्राहकांची संख्या कमी असल्याने त्यादृष्टीनेच पेरणीच्या अखेरच्या टप्प्यातील क्षेत्र असते.

Hurda Party
Hurda Demand : खवय्यांकडून हुरड्याला वाढली मागणी

व्यवसायाचे स्वरूप

बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता कोरेगाव येथील सात- आठ शेतकरी हुरडा ज्वारीची पेरणी करीत आहेत. गरजेनुसार त्यांच्याकडूनही १०० रुपये प्रति किलो दराने बाळासाहेब कणसे खरेदी करतात. डोंगराच्या कुशीत, निसर्गरम्य वातावरणात झाडाच्या सावलीला सुरू केलेल्या हुरडा पार्टीलाग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवडाभरात दररोज येणाऱ्या ग्राहकांची संख्या ५० पासून२०० ते कमाल ३०० पर्यंत असते. सुट्टीच्या दिवशी गर्दी अधिक असते. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत हुरड्याचा आस्वाद घेणाऱ्या ग्राहकांना ग्रामीण जीवनाचा आनंद देणाऱ्या सुविधा देण्यास सुरुवात केली.

पर्यटनातील सुविधा

आंबा व नारळ यांची प्रत्येकी दोनशे तसेच सफरचंद, पेरू, चिकू, संत्रा आदी झाडे.

ग्राहकांना पोहण्याचा आनंद देण्यासाठी तलाव.

बैलगाडी, ट्रॅक्टर सफर, मुलांसाठी विट्टी-दांडू, लगोरी, चेंडू, आट्यापाट्या, रस्सीखेच, सुरपारंब्या आदी पारंपरिक खेळांची सुविधा.

सकाळी चहा-नाश्‍ता. यात पेरू, कलिंगड, मका यांचाही समावेश. दुपारी हुरडा पार्टी. सोबत चटण्या, दही, गडीशेव यांचा आस्वाद.

सायंकाळच्या वेळी जेवण. यात वांगे- भरीत, शेंगोळे आदींचा समावेश.

मुक्कामाची इच्छा असलेल्यांसाठी जुन्या काळातील कांदा चाळीच्या वापरातून आकर्षक खोल्यांची सुविधा.

लाभले आर्थिक स्थैर्य

ज्वारीचे हुरडा पार्टीद्वारे मूल्यवर्धन व पर्यटन व्यवसायातून सुमारे ६० ते ७० टक्के नफा होऊ लागल्याचे बाळासाहेब सांगतात. वर्षभरात तीस क्विंटलपर्यंत हुरडा विक्री होते. डिसेंबरनंतर या भागात पाण्याची टंचाई सुरू होते. अशा या जिरायती स्थितीत या ‘गोविंदबन’ने मोहारे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले आहे. वडील भीमराज, आई पद्मावती, पत्नी उज्वला, भावजय प्रतिभा तसेच नव्या पिढीतील अनुश्री, विश्‍वजित, रणजित व अजित अशा कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत बाळासाहेबांना होते. पंधराहून अधिक व्यक्तींचा येथे कामांसाठी राबता आहे. त्यातून गावातील सात- आठ जणांना रोजगार मिळाला आहे.

सेंद्रिय शेती व डाळ विक्री

मोहारे कुटुंबाकडे बाराहून अधिक जनावरे आहेत. काही दुभत्या गाई आहेत. ज्वारीच्या कडब्याचा त्यांना उपयोग होतो. शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर असून कांदा, गहू, हरभरा, दोन एकरांतखपली गहू अशी पिके आहेत. जिरायती भाग असल्याने या भागात हुलगे, मटकी अशी पिकेही हे कुटुंब घेते. पर्यटनासाठी येणाऱ्या ग्राहकांना हुलग्याच्या शेंगुळ्याचाही आस्वाद घेता येतो. घरच्याच हरभरा, तूर, मूग यांच्यापासून डाळी तयार करून वर्षभरात दहा क्विंटलपर्यंत त्यांची विक्री केली जाते.

बाळासाहेब मोहारे ९४२३४२१३९३

दादासाहेब साबळे ९९७०७६११११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com