
आजच्या घडीला बदलते हवामान (Climate Change), पावसाची अनियमितता, पीक पद्धती (Cropping Method), रासायनिक घटकांचा वाढता वापर, त्यामुळे पिकांवर होणारे विपरीत परिणाम आणि मग ते परिणाम कमी करण्यासाठी लागणारा अनावश्यक खर्च, ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या नित्य जीवनाच्या भाग झाल्या आहेत. यात आणखी भर म्हणजे गेल्या तीन-चार वर्षांपासून मजुरांच्या समस्येने (Agriculture Labor Problem) शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आधी कामासाठी मजूर शेतकऱ्यांच्या घराभोवती घिरट्या घालायचे, आता शेतकऱ्याला वेळप्रसंगी अक्षरशः केविलवाण्या शब्दांत त्यांना विनंती करावी लागते, अशी वास्तविक परिस्थिती आहे.
...कशी बदलली परिस्थिती
१) आपण साधं उदाहरण जर लक्षात घेतलं तर कापूस वेचण्यासाठी आधी मजूर स्वतः शेतात जायचे. परंतु आज त्यांना कापूस वेचण्याच्या वेळी शेतात नेऊन देण्यासाठी व वापस आणण्यासाठी ऑटो किंवा दुसरे वाहन सांगावे लागते. मजुरांना आपल्याकडे कामावर टिकवून ठेवण्यासाठी इच्छा नसताना शेतकऱ्यांना करावी लागणारी ही एक कसरत आहे. तसे नाही केले तर दुसऱ्या वेळेस मजूर तुमच्याकडे येतीलचं याची शाश्वती नाही.
२) बहुतांश भागात ९-१० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे कापसाची वेचणी देण्यात येते. दुसरी गोष्ट म्हणजे एक शेतकरी जर १० रुपये प्रतिकिलो प्रमाणे उद्या कापूस वेचणीसाठी मजूर सांगून गेला आणि त्याच्या पश्चात जर दुसरा एखादा शेतकरी दोन रुपये वाढवून १२ रुपये प्रतिकिलो प्रमाणे द्यायला तयार असला तर शेतमजूर कुठलीच तमा न बाळगता अगदी शिताफीने आधीच्या शेतकऱ्याला संध्याकाळी उशिरा नकार कळवतात. इथे कामासाठी आवश्यक असणाऱ्या नैतिक मूल्यांना सहज बगल दिली जाते. पूर्वी मजुराने कापूस वेचला की आपली गोणी तो बांधावर असलेल्या बैलगाडीवर स्वतः ठेवायचा. आज अशी परिस्थिती आहे की मजूर त्या गोणीला हातही लावत नाही. शेतमालक स्वतः ते गोणे जमा करून बैलगाडीवर ठेवतो.
३) शेतमजुरांचे सध्याचे असे चित्र आहे, की रोजंदारीवर ठरलेल्या वेळात काम करण्याऐवजी काम पाहून त्या कामाचा एकंदरीत मोबदला ठरवून पाच दिवसाचे काम दोन दिवसात संपवण्याचा प्रयत्न असतो. किंबहुना, शेतमजूर त्याच कामाला प्राधान्य देतात. रोजंदारीवर काम असले तर त्यांची नाराजी सहज झळकते.
४) शेतमालकाने मजुरांना जर चुकूनही म्हटलं, की “हात थोडा लवकर चालवा... उरकवा” बस एवढंही खटकते मजुराला! ते चर्चा करायला लागतात...“हा शेतीमालक काई चांगला नाई बाई, दोन मिनिटं बी बसू देत नाई... नीरा घाईच करतो, पुढच्या टायमाले विचार करू.’’ जो शेतकरी तुमच्या हाताला काम देतोय, रोजीरोटीची व्यवस्था करतोय, त्याच्याबद्दल बोलायला पण ते मागेपुढे पाहत नाही.
५) आज पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यात फारशी अडचण येत नाही. परंतु पदवी मिळवूनही बाहेर नोकरी सहज उपलब्ध नाहीये. अशावेळी एवढं शिक्षण करून आपण शेतात राबायचं का? मजुरी करायची का? असा नाहक विचार बळावतो. आणि मग कामाचा आणि कमाईचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनतो. अनेक जण घरी राहण्यास पसंत करतात पण शेतात मजुरी करायला त्यांचा मोठा नकार असतो.
६) आपल्याकडे मध्य प्रदेश राज्यातून स्थलांतर करून बरेच कोरकू-पाव्हरी लोकं कुटुंबासह मजुरी करण्यासाठी येतात. परंतु त्यांच्याबाबतीत आपल्या शेतकऱ्यांचे बरेच कटू अनुभव आहेत. आगाऊ पैसे घेऊन गावाकडे जाऊन येतो म्हणतात आणि जे जातात ते वापस येतचं नाही. अनेक शेतकऱ्यांची अशी आर्थिक फसवणूक झाली आहे.
या समस्येवर उपाय काय?
१) मजुरांविना शेती हे काही केल्या शक्य होणार नाही. जी छोटी-मोठी काम आहेत, ज्या ठिकाणी हातांची कुशलता लागते त्या कामांसाठी पूर्ण यांत्रिकीकरण आले तरी मजुरांची गरज भासेलचं.
२) आपल्याकडची शेती ही विखुरलेली आणि कमी क्षेत्रफळाची आहे. शेतीचे तुकडे तुकडे आहेत. त्यामुळे मोठ्या कृषियंत्रांना आपल्या भागात वाव नाही. याउलट तेच काम करणारी लहान यंत्रे कमी क्षेत्राच्या सुलभ वापरासाठी तयार केली तर शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरतील. परंतु या समस्येवर अपेक्षित काम अजूनही झालेलं नाही. अशावेळी जे काही देशी जुगाड शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या पातळीवर तयार केलेतं त्यांचा प्रचार-प्रसार व उपलब्धता वाढली पाहिजे. कृषी विद्यापीठे या विषयात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी टेक्निकल मदत करण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतात.
३) ज्याप्रकारे एखाद्या दुकानासमोर ‘ऑर्डरनुसार माल तयार करून मिळेल’ अशी पाटी असते, त्याप्रमाणे येणाऱ्या काही वर्षांत ‘आमच्याकडे शेतमजूर उपलब्ध आहेत, कामानुसार व गरजेनुसार उपलब्ध करून दिले जातील,’ अशा पाट्या लागल्या तर नवल वाटायला नको. कारण या क्षेत्रात आता एजंट पद्धती जोर धरू लागली आहे.
४) मजुरांअभावी शेतकऱ्याच्या मनाची जी घुटमळ होते ती पाहवत नाही. तो अगदी बैचेन अवस्थेत रात्र काढतो. हे वास्तव आहे.
एकंदरीतच मजुरांच्या समस्येचा हा गुंता इतक्या लवकर आणि सहजासहजी सुटेल, असे वाटत नाही. याउलट येणाऱ्या काळात तो अधिक क्लिष्ट होत जाणार, असेच दिसते. त्यामुळे कमी क्षेत्रासाठी अनुकूल असणारे तंत्रज्ञानयुक्त अवजारे शोधणे, हाच काहीअंशी आशादायक मार्ग वाटतो. शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर शोधलेलं तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तेव्हाचं कुठे मजुरांच्या अनुपलब्धतेवर शेतकऱ्यांना तोडगा मिळेल असे वाटते.
- योगेश पाटील, अंतुर्ली. ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.