Chana Crop : हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण दाळवर्गीय पीक असून, भारतात त्याची कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वाधिक लागवड होते. पण मर रोग आणि घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे हरभरा उत्पादनात घट येते.
याशिवाय पाणथळ किंवा पानबसन जमिनीत हरभरा पिकाची लागवड, ओलिताचे चुकीने व्यवस्थापन, बागायतीमध्ये युरियाचा अवाजवी वापर अशा कारणामुळे हरभरा मोसंडतो. म्हणजेच हरभरा पिकाची अवास्तव वाढ होते. त्यामुळे उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याची माहिती घेऊया.
हरभरा पिकात पेरणीपूर्वीचे ओलीत व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलीत द्यावे.
स्प्रिंकलरचा वापर करताना जमिनीच्या प्रकारानुसार आणि ओलीची स्थिती पाहून पाण्याच्या पाळीची वेळ ठरवावी. म्हणजेच स्प्रिंकलर किती वेळेसाठी लावायचे, हे ठरवावे. अन्यथा बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
यानंतर गरज भासल्यास घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. या वेळी सुद्धा जमिनीतील ओलीनुसार निर्णय घ्यावा.
हरभऱ्याचे शेंडे खुडल्यानंतरही अवास्तव वाढ रोखता येते. निंदणीच्या काळात महिला मजूर भाजीसाठी झाडांचे शेंडे खुडून घेतात. असे शेंडे खुडल्यामुळे अवास्तव वाढ टाळता येते. अथवा पेरणीपासून साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी मशिनच्या साह्याने पिकाचे शेंडे छाटून घ्यावेत.
घाटे अळीचा प्रादुर्भाव कसा टाळाल?
हरभरा पिकावर घाटेअळी ही मोठी समस्या ठरते. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिकाचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.
हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी, पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट जास्त उंचीचे पक्षिथांबे एकरी १२-१५ प्रमाणात उभारावेत. याकरिता साधारणत: ५.५ ते ६ फूट लांबीच्या काठीला एका बाजूने टोक काढावे. दुसऱ्या बाजूला १.५ ते २ फूट लांबीची काठी आडवी पक्की बांधावी. जुन्या काळातील टीव्हीच्या ॲन्टेनाप्रमाणे पक्षिथांबे दिसतात. त्यावरून पक्षी घाटे अळीचा फडशा पाडतात.
पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी (साधारणत: ७ ते १० दिवस आधी) शेतात कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये घाटे अळीच्या हेलील्युअरचा वापर करावा. ल्युअर खाचेमध्ये लावताना त्याला बोटांचा स्पर्श होऊ देऊ नये.
पाऊच फोडून ल्युअरचा नरम भाग अंगठा व पहिल्या दोन बोटांच्या चिमटीत पकडून खाच्यात लावावा. रिकामा पाऊचसुद्धा कामगंध सापळ्याच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकावा.
-------------
माहिती आणि संशोधन - जितेंद्र दुर्गे, शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.