Banana Farming Techniques: केळी बागेचे व्यवस्थापन कसे करावे? जळगावातील शेतकऱ्याची यशोगाथा!

Banana Farming Management: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नितीन चौधरी यांनी शाश्वत शेतीच्या मदतीने केळी बागेचा उत्कृष्ट दर्जा कायम राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन शक्य झाले आहे. जाणून घ्या त्यांचे खास तंत्र आणि उपाय!
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

Banana Farm Success:

शेतकरी नियोजन । पीक : केळी

शेतकरी : नितीन आत्माराम चौधरी

गाव : पिंप्रीनांदू, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र : ५० एकर

केळीखालील क्षेत्र : २० एकर (३० हजार झाडे)

पिंप्रीनांदू (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) शिवारात नितीन चौधरी यांची ५० एकर काळी कसदार जमीन आहे. चौधरी यांनी कला शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. नितीन यांचे वडील आत्माराम चौधरी यांना ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ हा शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

केळी प्रमुख पीक आहे. यासोबत पेरू, तूर, गहू, मका ही पिके घेतात. दरवर्षी नवती किंवा मृग बहर (जून, जुलै लागवडीची बाग) लागवड असते. लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन या जातीच्या १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला जातो. काही वेळी कंदांचाही उपयोग करतात. लागवड अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंद गादीवाफ्यावर केली जाते. सिंचनासाठी सिंगल लॅटरलचा वापर केला जातो. सव्वापाच बाय साडेपाच फूट या अंतरावर लागवड केली जाते. निर्यातक्षम केळीचे उत्पादन सातत्याने घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. केळी बाग व्यवस्थापनामध्ये शरद महाजन (उत्राण, ता. एरंडोल) यांचे मार्गदर्शन मिळते, असे नितीन चौधरी सांगतात.

केळी लागवडीसाठी काळी कसदार जमीन असल्याने योग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. मागील पिकांचे अवशेष जाळले जात नाहीत. ते कुजविले जातात. त्याचा पुढे केळी पिकासाठी फायदा होतो. केळी लागवडीपूर्वी शेतामध्ये एकरी तीन ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत पसरून नंतर पूर्वमशागत केली जाते. लागवडीसाठी खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत केली जाते.

Banana Farming
Banana Farming : पुसदमध्ये केळी उत्पादनासाठी ‘क्लस्टर’ विकासाची संधी

सिंचन व्यवस्था

सिंचनासाठी दोन विहिरी व तीन जलवाहिन्या तापी नदीवरून आणल्या आहेत. हतनूर धरणाचा लाभही या परिसरास आहे. तापी नदीकाठी हा भाग असल्याने जलसाठे मुबलक आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई भासत नाही. बागेत सिंचनासाठी १२ मिलिमीटरच्या सिंगल लॅटरलचा वापर केला जातो. त्यामधून ताशी चार लिटर पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येते. दोन ड्रीपमध्ये साधारण दीड फूट अंतर ठेवले जाते. रोपांची लागवड करण्यापूर्वी गादीवाफे चांगले भिजवून घेतले होते. त्यानंतर लागवड केली जाते. लागवडीनंतर जमिनीत वाफसा स्थिती कायम राखण्यावर भर दिला जातो.

खत व्यवस्थापन

रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी बुरशीनाशके, खते व अमिनो ॲसिड यांची आळवणी केली जाते.

लागवडीनंतर ३० दिवसांत रासायनिक खतांचा पहिला बेसल डोस दिला होता. त्यात प्रति एक हजार झाडांना दोन गोण्या डीएपी, एक बॅग युरिया व एक बॅग पोटॅश हे खत दिले जाते.

रासायनिक खतांचा दुसरा डोस पीक ६० दिवसांचे झाल्यानंतर दिला जातो. त्यात प्रति एक हजार झाडांना पोटॅश व युरिया सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.

पीक ९० दिवसांचे झाल्यानंतर तिसरा डोस दिला जातो. त्यात युरिया, पोटॅश आणि दुय्यम अन्नघटक व १०ः२६ः२६ यांचा वापर केला जातो.

थंडीच्या काळातील व्यवस्थापन

थंडीच्या काळात कमी झालेल्या तापमानामुळे झाडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. त्यासाठी बागेला सल्फरची मात्रा दिली.

बाग सहा महिन्याची झाल्यानंतर निसवण सुरू झाली. थंडीच्या काळात दोन दिवसाआड चार तास बागेत सिंचन करण्यात आले.

आता बागेत ४० टक्के निसवण झाली आहे. फण्यांची विरळणी करून नऊ फण्या ठेवल्या जात आहेत.

अतिरिक्त फुटवे दर आठ दिवसांनी काढून घेतले जात आहेत.

घडांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घडांवर केळी बागेतील कोरड्या पानांचा चुडा ठेवला जात आहे.

केळी बागेच्या भोवती हिरवी शेडनेट लावली आहे. जेणेकरून बागेत उष्ण वाऱ्यांचा शिरकाव होऊन नुकसान होणार नाही.

Banana Farming
Banana Farming : थंडीपासून केळी बाग संरक्षणासाठी उपायांवर भर

आगामी नियोजन

सध्या केळी बाग निसवण अवस्थेत असून आगामी काळातही बागेत निसवण सुरूच राहणार आहे. त्या दृष्टीने व्यवस्थापनावर भर देण्यात येईल.

मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली असून आता उष्णता वाढली आहे. त्यामुळे बागेतील केळी घडांचे संरक्षण करण्यासह बागेत सिंचनावर अधिक भर दिला जात आहे.

रासायनिक खतांच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये व सरळ खते दिली जातील. घड तयार होण्यासाठी पोटॅशिअम शोनाईट, १३ः००ः४५ ही खते दिली जातील.

निसवणीच्या काळात बागेतील घड सतत केळीच्या कोरड्या पानांच्या चुड्याने झाकून घेतले जातील. या महिन्यात बाग ५० ते ५५ टक्के निसवणार आहे. त्यामुळे खतांची योग्य मात्रा पिकास देण्यावर भर दिला जाईल.

आवश्यकतेनुसार करपा रोगासाठी रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

केळी बागेत वाढलेले अतिरिक्त फुटवे काढण्याची कार्यवाही नियमित केली जाईल.

घडांचा दर्जा राखण्यासाठी घडांवर पोटॅशसह इतर शिफारशीत घटकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

बागेत नियमितपणे निरीक्षण केले जाईल. उष्णतेमुळे बागेत अनेकदा घड सटकण्यासह अन्य समस्या दिसून येतात. त्या रोखण्यासाठी खते व शिफारशीत कीडनाशकांच्या वापरावर भर दिला जाईल.

वाढत्या तापमानात झाडांची पाण्याची गरज वाढते. त्यासाठी या काळात दररोज किमान चार तास सिंचन करण्यावर भर दिला जाईल. आवश्यकतेनुसार सिंचनाचा कालावधी कमी जास्त केला जाईल.

कीड-रोग व्यवस्थापन

मागील वर्षी ३० जूनच्या दरम्यान लागवड केली होती. या काळात उष्णता होती. त्यामुळे सिंचनासह रासायनिक घटकांच्या आळवणीवर भर देण्यात आला.

पावसाळ्यात कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या.

साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये करपा (येलो सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी मिनरल ऑइल व शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारणी घेतल्या. त्यानंतर विद्राव्य खते वेळापत्रकानुसार देण्यास सुरुवात केली.

दर आठ दिवसांनी जिवामृताचा वापर केला.

विद्राव्य खतांमध्ये १९.१९.१९ प्रति एक हजार झाडांना चार किलो प्रमाणे देण्यात आले. सोबत सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली. बाग दीड महिन्याची झाल्यानंतर ही रासायनिक खतमात्रा देण्यात आली.

बेसल डोस दिल्यानंतर वेळापत्रकानुसार विद्राव्य खतांसह सूक्ष्म अन्नद्रव्येदेखील दिली.

बाग चार महिन्यांची झाल्यानंतर बागेच्या वाढीसाठी कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन, मॅग्नेशिअम सल्फेट यांचा ड्रीपमधून वापर करण्यात आला.

- नितीन चौधरी, ९५११२६९९०७

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com