Mango Harvesting : काढणीयोग्य आंबा कसा ओळखावा?

Mango Pre-Harvesting Indicators ; बहुतांश बागांमध्ये उत्तम मोहर येऊन त्याचे आंब्यामध्ये रूपांतरही चांगल्या प्रकारे झालेले दिसत आहे. मधल्या काळात काही ठिकाणी अचानक पाऊस व गारपीटही झाली. त्यातूनही आपला आंबा तग धरलेला आहे.
Mango Harvesting
Mango Harvesting Agorown
Published on
Updated on

Mango Harvesting Methods : पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी झाडावरील काही आंबे पाड लागून खाली पडल्यानंतर आंबा काढण्यायोग्य झाल्याचे समजतात. मात्र यात एक अडचण आहे. (काही भागात यालाच ‘शाखी लागणे’ असेही म्हणतात.) आंब्याचा मोहर एकदाच न येता तो महिनाभर चालू असतो.

अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या बागांमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केलेला असल्यास मोहोर साधारणतः दहा नोव्हेंबर सुरू होऊन नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू असतो. मोहर दोन-तीन वेळेस येतो.

त्यातील प्रथम आलेल्या मोहोराची फळे अगोदर तयार होणार, यात काही कुणालाच काही शंका नको. मोहोर येण्याच्या वेळेनुसार त्या झाडावरील आंबे वेगवेगळ्या वेळेला पक्वतेचा योग्य टप्पा गाठणार हे लक्षात ठेवावे. त्यानुसार योग्य पक्वतेला आंब्याची काढणी करावी लागेल. आता केसर आंब्यामध्ये काढणी कधी करायची, हे ओळखण्याच्या विविध पद्धती पाहू.

बाह्य रंगरूपावरून पक्वता तपासण्याच्या पद्धती ः

झाडावर आंबा असताना केवळ डोळ्यांनी पाहून किंवा किचिंत हाताळून त्याच्या बाह्य रंगरूपाच्या काही लक्षणावरून आंब्याची पक्वता जाणता येते. या पद्धती सोप्या असून, थोड्याशा अनुभवातून चांगल्या प्रकारे वापरता येतात.

१) देठाजवळ खड्डा पडणे : फळाच्या देठाजवळचा भाग तपासावा. फळाचे खांदे चोहोबाजूने वर आलेले आणि देठ खाली गेलेला असल्यास (म्हणजेच देठाजवळ खड्डा पडलेला असल्यास) आंबा काढण्यास तयार झाल्याचे समजावे. मात्र फळाजवळील खांदे जर खाली असले म्हणजे सर्वसाधारण देठापेक्षा थोडासा बाजूला उतार असल्यास आंबा काढणीस अजून तयार नाही असे समजावे.

Mango Harvesting
Mango Farming : वातावरणामुळे ‘रायवळ’उत्पादनात घट

२) फळाचा आकार :

फळाने पक्वता गाठल्यास फळाचा आकार थोडा गोल झाल्यासारखा दिसतो. फळाची चोच बोथट होऊन चोचीकडील कोनही कमी झालेला दिसतो.

३) फळावरील पांढरे ठिपके :

फळावरचे छोटे छोटे पांढरे ठिपके असतात, त्याला इंग्रजीमध्ये ‘लेंटिसेल’ असे म्हणतात. आंबा पक्व झाल्यानंतर हे ठिपके बरेच ठळक आणि पांढरेपणा उठून दिसायला लागतात. त्यांचा ठळकपणा वाढल्यामुळे फळाचा सर्वसाधारण हिरवा असलेला रंगही थोडाबहुत पांढरट झाल्यासारखा वाटतो. या लक्षणावरून फळाने पक्वता गाठल्याचे ओळखता येते. मात्र हे ठिपके ठळक दिसत नसल्यास फळ अजून काढणीस योग्य नसल्याचे समजावे.

४) नरमपणा :

फळावर बोटाने थोडा दाब देऊन पाहावे. फळ थोडेसेच दबत असल्यास फळ काढणीस तयार असल्याचे समजावे. हाताने नरमपणा तपासणे ही बाब थोड्या अनुभवानंतर किंवा प्रशिक्षणानंतर चांगल्या प्रकारे जमू शकते. अर्थात, यासाठी प्रेशन टेस्टर हे उपकरण वापरता येते.

५) फळाच्या गराचा रंग :

एखादे फळ चाकूने कापून पाहावे. त्याचा गर जर पांढरा किंवा दुधाळ रंगाचा असल्यास फळ अजून काढणीस तयार नाही. गराला पिवळसर झाक आली असल्यास फळ काढणीस तयार असल्याचे समजावे.

Mango Harvesting
Kesar Mango Farming: केसर आंब्याच्या आकारवाढीसह दर्जा राखण्यावर भर

फळाच्या घनतेवरून पक्वता जाणणे :

फळाची पक्वता जाणण्यासाठी घनता हा महत्त्वाचा निकष ठरू शकतो. एखाद्या भांड्यात चांगले पाणी घेऊन त्या फळ बुडवून पाहावे. त्याचे तरंगणे किंवा बुडणे यावरून आपल्याला फळाची घनता जाणून घेता येते.

- काढणीनंतर फळ चांगल्या पाणी सोडावे. पाण्यात आंबा बुडाला तर ते पूर्ण पक्व झाल्याचे समजावे.

- फळ अगदी थोडेसे उघडे राहिले (स्थानिक भाषेमध्ये याला ‘चवली पडणे’ असे म्हणतात), तर असे फळ निर्यातीसाठी किंवा काढणीनंतर जास्त दिवस टिकवायच्या दृष्टीने योग्य पक्व झाल्याचे समजावे.

- पाण्यात फळ जर जास्त उघडे दिसले तर मात्र फळ अद्याप काढणीस तयार नाही, हे जाणून घ्यावे.

पक्वता तपासण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे ः

रिफ्रॅक्टोमीटर ः

आंब्याची पक्वता जाणून घेण्यासाठी एकूण विद्राव्य घटक (TSS) मोजण्याचा मार्ग वापरला जातो. त्यासाठी रिफ्रॅक्टोमीटर हे छोटे व हाताने वापरण्यायोग्य उपकरण वापरता येते. याची किंमत साधारणतः दोन अडीच हजार रुपये असते. यामध्ये आंबा झाडावरून काढून त्याच्या गरातील एकूण विद्रव्य घटक (म्हणजे टीएसएस) मोजावा. हा टीएसएस सात ते आठ असल्यास आंबे काढायला तयार झाल्याचे समजावे. या पक्वतेचे आंबे काढल्यास पुढे ते जास्त दिवस टिकतात. मात्र आंबे आपल्याला पिकवून लगेच वापरायचे किंवा विकायचे असल्यास टीएसएस आठ ते दहा असावा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे टीएसएस सातपेक्षा कमी असल्यास आंबे अजून अपक्व म्हणजेच काढायला तयार झाले नसल्याचे समजावे.

प्रेशर टेस्टर :

प्रेशर टेस्टर हे फळाचा नरमपणा तपासण्याचे उपकरण आहे. त्याने फळाचा दाब (प्रेशर) मोजावे. ते २२ ते २६ पाऊंड प्रति इंच पर्यंत असल्यास फळ काढणीस तयार झाले असे समजावे.

महत्त्वाचे मुद्दे...

- फळ काढणी करतेवेळी शक्यतो अनुभवी किंवा प्रशिक्षित मजुरांचीच मदत घ्यावी. आवश्यकता भासल्यास त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करावे.

- सुरुवातीला आपण मोठी फळे काढली तर झाडावर त्यापेक्षा लहान फळे शिल्लक असतात. अशावेळी जर बागेला आपण पाणी दिले, पाऊस पडला किंवा अधिक काळ ढगाळ वातावरण राहिले तरी चार ते पाच दिवसातच झाडावरील लहान फळे एकदम मोठी होतात. अपक्व फळे काढण्याची गडबड करू नये.

- झाडावरील फळे एकदाच न काढता अगदी तीन-चार वेळा काढावी लागली तरी चालेल.

- फळाची काढणी शक्यतो सकाळी दहाच्या आधी (म्हणजे जास्त उन्हे पडण्याआधीच) करावी. ही काळजी घेतल्यास फळांची प्रत चांगलली राहण्यास मदत होते.

डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९

(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com