Custard Apples Disease: सीताफळातील फळसड, स्टोन फ्रूट लक्षणे अन् उपाय

Climate Change Impact: वातावरणातील बदलांमुळे सीताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडणे तसेच संपूर्ण फळ काळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. फळसड आणि स्टोन फ्रूट रोगामुळे देखील सीताफळ काळे पडतात. त्यासाठी रोगाची योग्य लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
Black Spots on Custard Apple
Black Spots on Custard AppleAgrowon
Published on
Updated on

डॉ. युवराज बालगुडे, डॉ. प्रदीप दळवे, सुनील नाळे

Agriculture Guidance: सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट, तर नैसर्गिक बहराची फळे ऑक्टोबर- नोव्हेंबरदरम्यान काढणीस तयार होतात. कमी पाणी, कमी खर्चात आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे फळपीक म्हणून सीताफळ ओळखले जाते. सध्या वातावरणातील बदल जसे की कमी-जास्त तसेच अनियमित पर्जन्यमान यामुळे सीताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कमी दर मिळून मोठे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी सीताफळ काळे पडण्यामागील कारणे व त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल.

फळसड रोग

रोगकारक बुरशी : कोलेटोट्रीकम ग्लिओस्पोराइडेस

आर्द्रतायुक्त दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. मात्र कोरड्या हवामानात रोगाचे प्रमाण कमी असते.

रोगाच्या वाढीसाठी उष्ण हवामान, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि भरपूर आर्द्रतेची (८० टक्क्यांपेक्षा जास्त) आवश्यकता असते.

बुरशीचे बीज अंकुरण्यासाठी कमीत कमी ४ ते ६ तास झाडाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांची आवश्यकता असते. अशा हवामानात रोगाचा प्रादुर्भाव होऊन पुढील वाढ फारच झपाट्याने होते. म्हणून पावसाळ्यात या रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.

Black Spots on Custard Apple
Custard Apple Farming: सीताफळाच्या गुणवत्तेसाठी पीक संरक्षणावर भर द्या

लक्षणे

हा रोग फळवाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. मात्र कळी आणि लहान फळे रोगास जास्त बळी पडतात. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कळ्या व लहान फळे तसेच त्यांचे देठ काळे होऊन गळून पडतात.

फळे मध्यम सुपारीच्या आकाराची (१५ ते २० मि.मी. व्यास) झाल्यावर प्रादुर्भाव झालेली फळे गळून न पडता लटकून राहतात.

काही वेळेस रोगाची सुरुवात फळाच्या पृष्ठभागापासून होते. फळांवर काळपट चट्टे पडून ते एकमेकांत मिसळून संपूर्ण फळ काळे पडते. काही वेळा संपूर्ण फळ काळे न पडता केवळ फळाचा काही भाग हा काळा पडतो. त्यामुळे फळाच्या रोगग्रस्त भागाची वाढ होत नाही, फक्त निरोगी हिरवट भागाची वाढ होते. त्यामुळे फळे वेडीवाकडी होतात. रोगट फळे न पिकता वाळून कडक होतात.

या रोगामुळे सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.

Black Spots on Custard Apple
Custard Apple Farming : सीताफळ उत्पादकांनी जाणून घेतले छाटणीचे महत्त्व

उपाययोजना

बागेतील जमिनीची नांगरट आणि खणणी करून जमीन चांगली तापू द्यावी. म्हणजे जमिनीतील रोगकारक बुरशी आणि किडींच्या अवस्था नष्ट होतील.

रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने बागेतील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. छाटणी करताना झाडावर शिल्लक राहिलेली रोगग्रस्त फळे, फांद्या, पाने, गर्दी होत असलेल्या फांद्या यांची छाटणी करावी.

छाटणीनंतर सर्व रोगग्रस्त अवशेष गोळा करून जाळून नष्ट करावेत.

बहराचे पाणी देण्यापूर्वी झाडांभोवती वाफे करून सेंद्रिय व रासायनिक खताचा हप्ता द्यावा. त्यामुळे झाडे सशक्त होण्यास मदत मिळते.

फळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्के (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ फवारण्या घ्याव्यात.

स्टोन फ्रूट

सीताफळाची काही फळे झाडावरच काळी पडून वाळून जातात. ही फळे पिकत नाहीत व तशीच झाडावर लहान स्थितीत पानगळ होईपर्यंत राहतात. अशी फळे दगडासारखी टणक दिसतात, म्हणून त्यांना ‘स्टोन फ्रूट’ असेही म्हणतात.

फळ वाढीच्या काळात फळे अन्नद्रव्यांसाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात. आणि अन्नद्रव्यांची पुरेशी उपलब्धता न झालेल्या फळांमध्ये ही विकृती अधिक प्रमाणात दिसून येते. फळांची पूर्ण वाढ न होता ती आकाराने लहान राहतात. कडक होऊन त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो.

उपाययोजना

बागेतील नियमित योग्य मशागतीची कामे करावीत.

सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.

बहर धरण्याच्या काळात पाण्याचा योग्य प्रमाणात व वेळेवर वापर करावा.

बागेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा किंवा आर्द्रता राखण्यासाठी बागेत बाजरीसारखी आंतरपिके घेणे घ्यावीत.

- डॉ. युवराज बालगुडे ९८९०३८०६५४ (वनस्पती रोग शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके

(अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com