Indrajit Bhalerao : महानोरांच्या कवितेने भालेरावांना कशी भुरळ पाडली ?

Article by Indrajit Bhalerao : कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘मी व माझे साहित्य’ या परिसंवादात सहभागी वक्ता म्हणून महानोर आले होते. तेव्हा महानोर यांना पाहण्याचा, ऐकण्याचा पहिला योग आला.
Na. Dho. Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon

Na. Dho. Mahanor : मी १९८१ मध्ये वसमतला ज्या बहिर्जी महाविद्यालयात शिकत होतो, त्याच महाविद्यालयात बारा वर्षांनी चौदावं मराठवाडा साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनाला कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘मी व माझे साहित्य’ या परिसंवादात सहभागी वक्ता म्हणून महानोर आले होते. तेव्हा महानोर यांना पाहण्याचा, ऐकण्याचा पहिला योग आला.

प्रा. अग्रवाल हे महानोर यांचे फार जवळचे मित्र होते. महानोर त्यांच्याकडंच उतरले होते. तिथं गंगाप्रसादजी अग्रवाल आणि निवडक रसिकांच्या उपस्थितीत रात्री झालेल्या त्यांच्या काव्यवाचनाची कॅसेट श्यामलालजींनी तयार करून ठेवली होती. ती त्यांच्या घरी जाऊन मी कितीदा तरी ऐकत राहायचो.

नंतर ही टेप मी माझ्याकडंही दुसऱ्या एका कॅसेटवर उतरवून घेतली. आता महानोरांची सगळी गाणी आणि काव्यवाचनातल्या त्यांच्या सगळ्या लोकप्रिय कविता यांचा ऐवज माझ्याकडं पाहिजे तेव्हा ऐकायला उपलब्ध झालेला होता.

या संमेलनात झालेल्या परिसंवादातलं महानोरांचं भाषण हे खूपच जिवंत आणि प्रत्ययकारी होतं. शेतकीतले त्यांचे अनुभव आणि त्याला जोडून असलेल्या त्यांच्या कविता असं घेत घेत महानोर ‘मी आणि माझे साहित्य’ या परिसंवादात बोलत होते. या परिसंवादाचे अध्यक्ष नरहर कुरुंदकर होते. रा. रं. बोराडे, प्र. ई. सोनकांबळे आणि ना. धों. महानोर अशी सर्वच दिग्गज मंडळी सहभागी वक्ते म्हणून आलेली होती.

पण रसिकांना झपाटून टाकलं ते महानोरांच्या भाषणानं. महानोरांना साक्षात समोर ऐकण्याची आणि पाहण्याची ही माझी पहिली वेळ. त्यांचा तो साधा खानदेशातल्या शेतकऱ्याचा सदरा आणि ट्राउझर असा वेश, उत्स्फूर्तपणे बोलणं, आवश्यक तिथं कवितांची उदाहरणं देणं या त्यांच्या शैलीमुळं ते कायमचे माझ्या लक्षात बसले. उंचीपुरी देहयष्टी, प्रभावी डोळे आणि तेजस्वी चेहरा यामुळे कुणीही चटकन आकर्षित व्हावं असं तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

Na. Dho. Mahanor
Na. Dho. Mahanor : रानकविता पोरकी झाली!

ते त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होते. यशवंतराव चव्हाण यांची भेट होऊन तेव्हा ते आमदार झालेले होते. जब्बार पटेल यांची भेट होऊन ते मंगेशकर कुटुंबातही दाखल झालेले होते. ‘जैत’ची गाणी आलेली होती. ‘रानातल्या कविता’ तुफान गाजत होत्या. मला वाटतं तो त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा काळ असणार.

तोपर्यंत महानोरांचे रानातल्या कविता आणि वही हे दोन कवितासंग्रह, गपसप आणि गावातल्या गोष्टी हे दोन कथासंग्रह, जैत रे जैत आणि माझ्या आजोळची गाणी या दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित झालेल्या होत्या. तेव्हा महानोर वयाच्या चाळिशीत आणि मी विशीत होतो. तिथून सुरू झालेला त्यांचा जवळ-दूरचा सहवास पुढच्या चाळीस वर्षांपर्यंत कमी जास्त प्रमाणात सुरूच राहिला.

१९८२ च्या फेब्रुवारीमध्ये वैजापूरला रा. रं. बोराडे आणि भास्कर चंदनशिव यांनी ग्रामीण आत्मकथन शिबिर घेतलं होतं. तेव्हा खेड्यापाड्यातून नव्यानं लिहिणाऱ्या मुलांना येणाऱ्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून शिबिराचं नियोजन केलेलं होतं. प्रमुख ग्रामीण लेखक, कवींना अनुभवकथनासाठी आवर्जून बोलावलेलं होतं.

उद्‍घाटनाला आनंद यादव आणि समारोपाला ना. धों. महानोर होते. एका मंगल कार्यालयात समारोपाचा कार्यक्रम होता. गर्दीही खूप होती. महानोर तेव्हा लोकप्रियतेच्या कळसावर होतेच. प्रत्यक्ष समारोप सुरू होण्याआधी आम्हा शिबिरार्थ्यांना भेटण्यासाठी बोराडे सर महानोरांना घेऊन आले. फक्त व्यासपीठीय भाषणं असं या शिबिराचं स्वरूप नव्हतं. त्यामुळं बोराडे सरांनी महानोरांना थोडं आधी बोलावून आमच्याशी संवाद ठेवलेला होता.

आम्ही शिबिरार्थी चाळीस जण होतो. आम्ही स्वतःचा परिचय करून देत होतो. महानोर एखादा-दुसरा प्रश्‍न विचारत होते. प्रामुख्यानं विद्यार्थी ज्या भागातून आलेला आहे त्या भागातल्या शेतीविषयी, पिकांविषयी महानोर विचारत होते.

मी वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयातून आलोय म्हटल्यावर त्यांनी वसमत परिसरातील केळीच्या पिकाविषयी विचारलं. पण मी ज्या गावातून आलो होतो तिथं केळीच्या बागा नव्हत्या. वसमतच्या पूर्व भागात केळी होती. कारण तिथं सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था होती. पश्‍चिम भागात मात्र बागायतीची पद्धतीच नव्हती. फळबागा नव्हत्याच. सिंचनाचं पाणी आलेलं होतं, पण लोक त्यावर नगदी पिकेच घेत होते. कारण फळबागा त्यांच्या रक्तात भिनलेल्या नव्हत्या.

त्यामुळे मी त्यांना तसं सांगितलं. आम्ही शिबिरार्थी साहित्याच्या शिक्षणासाठी आलेलो होतो. पण महानोरांच्या डोक्यात मात्र शेतीच होती. त्यांच्या डोक्यात शेतीचा विषय हा कायमच असायचा. कारण शेतीने त्यांना वेडच लावलेलं होतं. कवितेसोबतच प्रयोगशील शेतकरी म्हणूनही सर्वत्र त्यांना लोक ओळखायचे. इथलं महानोरांचं समारोपाचं भाषण तुफानच झालं.

मागच्या वर्षी वसमतला त्यांना वेळेची मर्यादा होती. पण इथं त्यांना एकट्यालाच पूर्ण रान मोकळं होतं. त्यामुळं त्यांनी आपले घोडे चौखूर उधळवले आणि विद्यार्थ्यांना तृप्त करून टाकलं. आपल्या अनेक कवितांच्या निर्मिती प्रक्रिया सांगितल्यामुळं त्यांचं हे भाषण शिबिरार्थ्यांसाठी उद्‌बोधक देखील झालं.

Na. Dho. Mahanor
Na. Dho. Mahanor : अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावणारा रानकवी

वातावरण एकच होतं. बहिणाबाईंच्या कविता, महानोरांच्या कविता, ना. घ. देशपांडे यांच्या कविता शेतातल्या काम करणाऱ्या गड्यांना दुपारच्या जेवणाच्या वेळी मी वाचून दाखवायचो. त्यांचा प्रतिसाद पाहून मीच आनंदी व्हायचो. जणू काही मीच माझ्या कविता वाचून दाखवतोय, इतका उल्हसित होऊन मी या कविता त्यांना वाचून दाखवायचो.

माझ्या या कविता वाचनाची कुणी कधी चेष्टा केली नाही. कारण या सगळ्या कवींच्या कवितांतून आपणच वावरत आहोत, असं त्यांना वाटत असणार. १९८४ मध्ये जळगावला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही मी गेलो होतो. आता मी कवितेनं पुरता झपाटलेला होतो. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उपस्थित राहणं हे मला आवश्यक झालेलं होतं.

एक तर तिथं खूप काही ऐकायला, पाहायला मिळत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवी ती पुस्तकं विकत घेता येत होती. या वेळी महानोर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झालेले होते. शंकराव खरात या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, मधुकरराव चौधरी स्वागताध्यक्ष होते. या संमेलनात मी महानोरांचे पावसाळी कविता आणि पळसखेडची गाणी ही दोन कवितेची पुस्तकं आणि शेतकरी दिंडी हे रोजनिशी पुस्तक घेतलं.

जशा महानोरांच्या गाण्याच्या टेप मी पुन्हा पुन्हा ऐकत होतो; तसा हा पुस्तकांचा ऐवजही मी पुन्हा पुन्हा वाचत होतो, जपत होतो. तो इकडे-तिकडे जाऊ नये म्हणून मी त्या चारही पुस्तकांना एकत्रित खास हार्डबाउंड बाइंडिंग करून घेतलं. त्यांची ही चार पुस्तकं मी कायम माझ्यासोबत ठेवायचो. जळगाव साहित्य संमेलनाला गेल्याचा आणखी एक फायदा झाला, तिथं बहिणाबाईंचं जातं पाहण्यात आलं. ज्या जात्यावर बसून बहिणाबाईंना आपल्या सगळ्या कविता सुचल्या ते जातं तिथं पाहून मी खूप हरकून गेलो. शिवाय बहिणाबाईंविषयी आणखीही खूप काही तिथं पाहायला आणि ऐकायला मिळालं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com