Crop Insurance : पीक विम्याची अंतिम भरपाई कशी काढली जाते?

Agriculture Pik Vima : पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक विमा भरपाई कशी दिली जाते? उंबरठा उत्पादन कसे काढले जाते? तांत्रिक उत्पादन काय भानगड आहे? याची आकडेमोड आपण कशी करू शकतो? तसेच पीक विमा योजनेची भरपाई शेतकऱ्यांना काढता यावी यासाठी घेतलेला हा आढावा...
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Advance Crop Insurance : राज्यात आता पीक कापणी प्रयोग सुरु झाले. पीक कापणी प्रयोगातून राज्यात सरासरी १० ते १२ क्विंटलच्या दरम्यान सरासरी उत्पादकता येत असल्याची माहिती आहे. राज्यातील ज्या मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोगातून अशी उत्पादकता येत आहे त्या मंडळातील शेतकऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

कारण आहे यापूर्वी उंबरठा उत्पादनाच्या झालेल्या नोंदी. मागील पाच वर्षात बहुतांशी मंडळातील सरासरी उंबरठा उत्पादनाच्या नोंदी १० ते १५ क्विंटलच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा खरोखर उत्पादन कमी होऊनही पीक विम्याची भरपाई अपेक्षेपेक्षा कमीच मिळण्याची शक्यता निर्माण झाली. पण शेवटी पीक कापणी प्रयोग पूर्ण होऊन खात्यात किती रक्कम जमा होते, यावरून सर्व काही स्पष्ट होईलच.

पीक विमा योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

पीक विमा योजनेत नुकसान भरपाई कमी दिली जाते हे समजून घेण्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे. त्यात उंबरठा उत्पादन, तांत्रिक उत्पादन आणि पीक कापणी प्रयोग हे महत्त्वाचे घटक आहेत. नुकसान भरपाई या तीन घटकांच्या आधारावरच

काढली जाते. त्यामुळे तीन घटक काय आहेत आणि ते कस काढले जातात? हे आधी समजून घेणे आवश्यक आहे.

१. उंबरठा उत्पादन कसे काढले जाते?

पीक विमा योजनेत उंबरठा उत्पादन एक महत्त्वाची संकल्पना आहे. उंबरठा उत्पादन काढताना त्या मंडळातील मागील ७ वर्षांचा विचार केला जातो. मागील ७ वर्षांपैकी सर्वोत्तम म्हणजेच जास्त उत्पादन झालेल्या या ५ वर्षांची सरासरी काढली जाते. या ५ वर्षांची सरासरी काढल्यानंतर जे काही उत्पादन येईल त्याला ७० टक्के जोखीमस्तर असेल. पीक विमा योजनेत खरीप हंगाम २०२३ ते २०२५-२६ या काळासाठी ७० टक्के जोखीमस्तर ठरविण्यात आला. म्हणजेच या ५ वर्षांतील सरासरीच्या ७० टक्के उत्पादन गृहीत धरण्यात येईल. समजा जालना जिल्ह्यातील वाटूर मंडळात मागील पाच वर्षाची सरासरी १३०० किलो प्रतिहेक्टर आहे तर मग उंबरठा उत्पादन किती येईल?

उंबरठा उत्पादन = १३०० x ०.७० = १०००

म्हणजेच वाटूर मंडळातील उंबरठा उत्पादन प्रतिहेक्टरी १००० किलो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२. पीक कापणी प्रयोग

पीक विम्याची अंतिम भरपाईची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पीक कापणी प्रयोग केले जातात. पीक कापणी प्रयोगातून जे उत्पादन निश्चित होते, त्यावरच भरपाई अवलंबून असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विमा क्षेत्र घटक जर मंडळ असेल तर या मंडळात किमान १० पीक कापणी प्रयोग केले जातात. पण विमा क्षेत्र तालुका असेल तर तालुक्यात किमान १६ पीक कापणी प्रयोग करणे बंधनकारक आहे.

विमा क्षेत्रात म्हणजेच मंडळ किंवा तालुक्यात तीन विभागांमार्फत पीक कापणी प्रयोग केले जातात. तलाठी महसूल विभागासाठी पीक कापणी प्रयोग करतात. तर कृषी सहायक कृषी विभाग आणि ग्रामसेवक ग्रामविकास विभागासाठी पीक कापणी प्रयोग करत असतात.

हे पीक कापणी प्रयोग तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणात होत असतात. पीक कापणी प्रयोगासाठी मोबाईल अॅपचा वापर केंद्राने बंधनकारक केला आहे. असे केले नाही तर केंद्र सरकार आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता कंपन्यांना देणार नाही. त्यामुळे मोबाईल अॅपचा वापर केला जातो.

३. तांत्रिक उत्पादन

पीक विमा योजनेत अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई काढण्याच्या नियमात शासनाने बदल केला आहे. सोयाबीन, कापूस, गहू आणि भात या पिकांसाठी हा बदल असेल. पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन अशा दोन प्रकारात सरासरी उत्पादनाची विभागणी केली आहे.

यंदा सरासरी उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादन गृहीत धरण्यात येईल आणि एकूण तांत्रिक उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन गृहीत धरण्यात येईल. यंदा तांत्रिक उत्पादनाला केवळ ३० टक्के वेटेज देण्यात आले आहे. पण २०२४-२५ मध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाला ६० आणि तांत्रिक उत्पादनाला ४० टक्के वेटेज असेल. तर २०२५-२६ साठी पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाला ५० टक्के आणि तांत्रिक उत्पादनाला ५० टक्के वेटेज असेल.

तंत्रज्ञानावर आधारित सरासरी उत्पादन निश्चित करताना Maha Agritech प्रकल्पांतर्गत विमा क्षेत्र घटक स्तरावर प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येईल. तंत्रज्ञानाच्या आधारे पीक वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या टप्प्यात किती उत्पादन येण्याची शक्यता होती आणि शेवटच्या टप्प्यात किती उत्पादनाचा अंदाज आहे यावरून तांत्रिक उत्पादन काढले जाते.

तांत्रिक उत्पादन ही पूर्णतः तंत्रज्ञानावर आधारित असून मानवी हस्तक्षेप होत नाही. या पध्दतीचा वापर वाढविण्यावर शासनाचा जोर आहे. यातून पीक उत्पादन, नुकसानीची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. सदरची आकडेवारी वेळेत प्राप्त न झाल्यास पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी सरासरी उत्पादन निश्चित करताना ग्राह्य धरण्यात येईल.

Crop Insurance
Crop Insurance : दोन-तीन दिवसांनंतर या शेतकऱ्यांना मिळू शकते अग्रीम भरपाई; सचिवांचाही पीक विमा कंपन्यांना दणका

कापूस, सोयाबीनसाठी ३० टक्के कॅप

कापूस आणि सोयाबीन पिकाचे सरासरी तांत्रिक उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त फरक असेल तर ३० टक्क्यांची टॉलरंस पातळी लावण्यात आली. समजा वाटूर मंडळात पीक कापणी प्रयोगातून १००० किलो उत्पादन आले आणि तांत्रिक उत्पादन १५०० किलो आले तर ३० टक्के कॅप आहे. यावेळी १००० किलोचे ३० टक्के म्हणजे ३०० किलो असे १३०० किलो तांत्रिक उत्पादन गृहीत धरण्यात येईल. तर तांत्रिक उत्पादन ३० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच ६५० किलो आले तर पीक प्रयोगातून आलेल्या उत्पादनापैकी ३० टक्के कमी म्हणजेच १००० किलोच्या ३०० किलो कमी धरले जाईल. यावेळी तांत्रिक उत्पादन ७०० किलो गृहीत धरले जाईल.

सोयाबीनचे सरासरी उत्पादन कसे काढले जाईल?

आपण आधी पाहिलं, की सोयाबीनचे सरासरी उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन ७० टक्के आणि तांत्रिक उत्पादन ३० टक्के गृहीत धरले जाते. समजा जालना जिल्ह्यात वाटूर मंडळात पीक कापणी प्रयोगातून हेक्टरी १ हजार किलो उत्पादन आले. तसेच तांत्रिक उत्पादन १ हजार ५०० किलो आले. तर सरासरी उत्पादन किती येईल.

अ) तांत्रिक उत्पादन पीक कापणी

प्रयोगातील उत्पादनापेक्षा जास्त आल्यास

पीक कापणी प्रयोगातील उत्पादनः १००० किलो

तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन १५०० किलो

(तांत्रिक उत्पादन कॅप @ ३०% = १३०० किलो)

सरासरी उत्पादन = (१,००० x ०.७० = ७००) + (१,३०० x ०.३० = ३९०) = १,०९० किलो

म्हणजेच वाटूर मंडळाची सरासरी उत्पादकता हेक्टरी १०९० किलो.

ब) तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन

पीक कापणी प्रयोगापेक्षा कमी आल्यास

पीक कापणी प्रयोगातील उत्पादन = १००० किलो

तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनः ६५० किलो.

(तांत्रिक उत्पादन = कॅप @३०% ७०० किलो)

सरासरी उत्पादन = (१,००० x ०.७०) +

(७०० x ०.३०)

= ७०० + २१०

= ९१० किलो

म्हणजेच तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास ९१० किलो सरासरी उत्पादन येईल.

दुष्काळ जाहीर झाला म्हणजे भरपाई जास्त मिळते का?

पीक विमा योजनेच्या शासन निर्णयात तरतूद आहे की, पीक विमा योजनेची भरपाई ही पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादनाच्या आधारावरच मिळेल. शासनाने काढलेली पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती किंवा पुरामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजेच एखाद्या मंडळात किंवा तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला तरी पीक कापणी प्रयोगात आलेल्या उत्पादनाच्या आधारावरच विमा भरपाई मिळेल.

Crop Insurance
PM Kisan : पीएम किसानबाबत महत्वाची केवायसी आता मोबाईवर करता येणार

नुकसान भरपाई कशी काढली जाईल? सध्या सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग सुरु आहेत. त्यामुळे आपण सोयाबीनची नुकसानभरपाई कशी काढली जाईल, याचा आढावा घेऊ. वाटूर मंडळातील सोयाबीनचे उंबरठा उत्पादन एक हजार किलो आहे. तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनापेक्षा जर जास्त म्हणजेच १३०० किलो पकडले तर सरासरी उत्पादन १०९० किलो येईल.

म्हणजेच सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त येईल. या परिस्थितीत वाटूर मंडळातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार नाही. पण तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादनापेक्षा कमी आले तर आपण गृहीत धरलेल्या सूत्रानुसार सरासरी उत्पादन ९१० किलो येईल.

म्हणजेच उंबरठा उत्पादनापेक्षा कमी येईल. तर नुकसान भरपाई किती मिळू शकते याचा अंदाज घेऊ. उंबरठा उत्पादन - सरासरी उत्पादन नुकसान भरपाई = x विमा संरक्षित रक्कम उंबरठा उत्पादन १,००० - ९१० नुकसान भरपाई = x ५५,००० = ४,९५० रुपये १,००० म्हणजेच वाटूर मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी ४ ,९५० रुपये विमा भरपाई मिळेल.

अग्रीम भरपाई मिळालेली असल्यास अंतिम भरपाई कशी मिळेल?

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाईसाठी अधिसूचना निघालेल्या आहेत. त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये अग्रीमवर तोडगा निघाला. तर काही जिल्ह्यांमध्ये काही मंडळांच्या अग्रीमचा तोडगा निघाला. आतापर्यंत जवळपास २५ लाख शेतकऱ्यांना अग्रीम भरपाई देण्यावर तोडगा निघाला.

या शेतकऱ्यांना दिवाळीआधी अग्रीमची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. मग या शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळेल का? तर मिळेल पण अंतिम भरपाईच्या रकमेतून अग्रीमपोटी दिलेली रक्कम वजा केली जाईल.

समजा एखाद्या मंडळातील शेतकऱ्याला अग्रीमपोटी ६ हजार मिळाले आणि अंतिम भरपाई ८ हजार येत असेल तर ६ हजार वजा करून २ हजार रुपये दिले जातील. पण या शेतकऱ्यांना मिळणारी अंतिम भरपाई कमी म्हणजेच ५ हजार असेल तर त्या शेतकऱ्याला अंतिम भरपाई मिळणार नाही आणि उरलेली रक्कमही त्यांच्याकडून घेतली जाणार नाही.

सरासरी उंबरठा उत्पादनाची स्थिती काय?

राज्यातील वेगवेगळ्या मंडळात मागील काही वर्षातील कमी उंबरठा उत्पादनाची नोंद असल्याची माहिती मिळाला. अनेक मंडळातील सरासरी उंबरठा उत्पादन १ हजार किलो ते १ हजार २०० किलो प्रति हेक्टरच्या दरम्यान आहे. म्हणजेच हेक्टरी फक्त १० ते १२ क्विंटल. पण वास्तविक सोयाबीन उत्पादन एकरी एवढे होते. म्हणजेच हेक्टरी प्रत्यक्ष उत्पादन जास्त आहे.

पण उंबरठा उत्पादनाच्या नोंद कमी आहेत. पीक चांगले असतानाही विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी या नोंदी कमी करण्यात आल्याचे या विषयातील जाणकार सांगतात. पण खऱ्या संकटाच्या काळात कमी उंबरठा उत्पादनाच्या नोंदीचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. त्यामुळे उत्पादन चांगले असेल तर आपल्या मंडळातील उंबरठा उत्पादनाच्या नोंदी योग्य व्हायला हव्यात याची काळजी घ्यावी. त्यामुळे अशा दुष्काळी वर्षात पीक विम्याची योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com