Rural Life
Rural LifeAgrowon

Rural Story : आपणच आपल्याला कसं फसवणार ?  

काल संध्याकाळी पारूबाईचा पोरगा सोमा मोठमोठ्यानं बोलत होता, आई तुला कितीवेळा सांगितलं रानातली कामं तुला होत असतील तरच कर. तू काहीपण कामं काढतेस. पण इथून पुढं घरातलं कुणी तुला कामं करू लागायला येणार नाही.

- कल्पना दुधाळ

काल संध्याकाळी पारूबाईचा पोरगा सोमा मोठमोठ्यानं बोलत होता, आई तुला कितीवेळा सांगितलं रानातली (Farm) कामं तुला होत असतील तरच कर. तू काहीपण कामं काढतेस. पण इथून पुढं घरातलं कुणी तुला कामं करू लागायला येणार नाही. दरवर्षी लसणाचा (Garlic) कुटाना काढतेस. लसूण लावायचाय, रान नीट कर, रान नीट कर माझ्या मागं लागतेस.

ते केलं की वाफं वढून दे. पाण्याचं पाट ओढून ठेव नाहीतर ठीबकचं (Drip) पाइप जोडून ठेव. सारखं माझ्या मागं तुझं हुटकान चालू असतं. मी माझ्या सवडीनं करीन ना, पण तुझं आपलं चालूच. लसूण लावून झाला की, पाणी फिरव  कुड्या वाळून चालल्या. तूच सांग जरा पाणी द्यायला उशीर झाला तर कुड्या वाळून जातील का ? पण तुला दम असा निघणार नाही. काय अगं आई. पाणी फिरवून वाफसा येतोय तोवर पुन्हा, जरा युरिया फिसकारतोस का ?

Rural Life
Agro Tourism : नियोजन, कष्टांतून साकारलेले मुलूख कृषी पर्यटन केंद्र

त्याशिवाय लसूण कसा वाढायचा ? पाती पार आखडल्या फवारा फिरवतोस का ? ते झालं की लसणाला राख टाकायची राहिली, लसूण कसा पोसायचा ? खुरपून झाला पाण्याला ताणू नको. रान तडकलंय, उपटताना खुडून येतोय. पाणी फिरव ना एकदा. तू लसूण काढून ठेवला तरी ती गठोडी घरी आणायला पुन्हा मी. तू पेंड्या बांधल्या की गोठ्यात तारा बांधायला मी. पेंड्या वर टांगायला पुन्हा मीच.

आई बास्स आता हा कुटाना करणं. माझी मला भरपूर कामं असतात. असा किती लसूण लागतो आपल्याला ? किती आणायचा तेवढा सांग. बाजारातनं आणून देतो. आता पुन्हा पुन्हा सांगणार नाही आणि हे बघ कोणत्याच पाहुण्यारावळ्यांला लसूण वाटत बसायची गरज नाही. त्यांचं ते बघतील. मी कुणासाठी कुटाना करत बसणार नाही.

सोमाचं बोलणं काही खोटं नव्हतं. पण लसणाचं, रानातल्या कामाचं इतकं सगळं आपल्या पोराच्या बरोब्बर लक्षात असल्याचं ऐकून पारूबाईला मात्र धन्य वाटलं. आपला पोरगा आपल्यावर इतका कशानं तापला किंवा ती रानात असताना घरी काय काय झालं हे तिला दुसऱ्या कुणी कशाला सांगायला पाहिजे ? पण इथं लेखक म्हणून मी ते सांगितलं पाहिजे ना ! नाहीतर तुम्हाला वाटेल सोमा असंच आपलं आईवर राग काढतोय. 

तर झालं असं की, काल सकाळी घरची कामं उरकल्यावर पारूबाई तिच्या सूनंला म्हणजे सोमाच्या बायकोला म्हणाली, आज आपण दोघी तेवढा लसूण लावून घेऊ चल. तर ती म्हणाली, मला नाही येत लसूण लावायला. मी शिकवते की चल. तुम्ही शिकवणार हो. पण उन किती झालंय. संध्याकाळी जाऊ.

संध्याकाळी संध्याकाळची कामं असतात. उन काय करतंय. डोक्यावर टॉवेल घे चल. सासू मागंच लागली म्हणल्यावर पाण्याची बाटली भरून घे, टॉवेल शोध, चपला कुठेत बघ असं रेंगाळत रेंगाळत सुनंनं सगळं गोळा केलं. तोवर पारूबाईनं लसणाच्या पेंड्या काढून आणल्या. दोघीजणी रानात गेल्या.

बांधावरच्या लिंबाखाली बसून लसणाच्या कुड्या फोडल्या. पाखडल्या. बारीकसारीक, मेलेल्या कुड्या बाजूला काढल्या. ठोकाळ कुड्या वाडग्यात घेऊन दोघी लसूण लावायला लागल्या.  पटापटा उरकून कधी घरी जातेय असं सूनंला झालेलं. तिनं मूठभरुन कुड्या घेतल्या. मूठीतला अर्धा लसूण खाली सांडतोय. उगंच इथंतिथं कुड्या खोचत ती उरकायचं बघतेय. पारुबाईनं बघितलं. म्हणाली, 

कुड्या सांडू नको. अशा नीट लाव. उगं जवळजवळ लावून दाटी करू नको. दाटीवाटीनं कुड्या पोसत नाहीत. लांब लांब लावल्यावर चांगला वाढतो लसूण. पार खोल खोचू नको. वरचेवरपण सोडू नको. नाहीतर पाण्यानं वहावतील कुड्या. एकेक ओळ कडंपर्यंत नीट लाव. मगच दुसऱ्या ओळीला सुरूवात कर. त्याचं काही नक्षीकाम करायचं नाही म्हणा, पण निटनिटका उगवल्यावर चांगलं वाटतं.

Rural Life
Agrowon Kharif Scheme : ‘ॲग्रोवन समृद्ध खरीप योजने’च्या पाचव्या बक्षिसाचे विजेते

किती बाई तुमचे नियम. अस्साच लाव, तस्साच लाव. कसाही लावला तरी तुम्ही नावंच ठेवणार. कसापण लावला तरी रानातच उगवेल ना ? मी घरीच म्हणलं होतं, मला नाही येत लावायला. सूनंला राग आला. पारूबाईपासून उठून तिनं सेपरेट वाफा धरला. पटापट दोन वाफं लावून रिकामी झाली. इतकं झटक्यात कसं उरकलं म्हणून पारूबाईनं नीट बघितलं तर, सगळ्या कुड्या लावल्यात उलट्या !

Rural Life
Farmer : मोठे शेतकरी खरेच धनदांडगे आहेत का?

सूनंला म्हणाली, आत्ता ग बया. अस्सा उलटा लसूण कुणी लावला होता तुझ्या ? असा लावल्यावर तो फुटायचा कसा ? पात मातीत आणि मुळ्या हवेत वाढतील का काय याच्या ? जिथंनं मुळ्या फुटायच्या ती बाजू वर केल्यावर कसं उगवायचं त्यानं. जरा तरी विचार करावा माणसानं.

सून उठली, मी येत नव्हते तर चल चल करून बळंच आणलंय मला. मला नाही येत लसूण लावायला.  कितीदा सांगितलं, मला नाहीत जमत रानातली कामं. वर म्हणताय, तुझ्या कुणी लावला होता असा लसूण ? माझ्या नाही लावला कुणी. लावा आता तुम्हीच.

ती तरातरा घरी निघून गेली. पारूबाईनं राहिलेल्या बाकीच्या वाफ्यात लसूण लावला. सूनंच्या वाफ्यातला जमेल तितका सावरला. उलट्याचा पालटा, उभ्याचा आडवा केला. अजून कशाकशाचं बी तिनं बरोबर आणलं होतं. ते जिथल्या तिथं लावलं. सगळं निस्तारून घरी आली. तर संध्याकाळी हे सोमाचं बोलणं. आणि बघितलं का मध्ये बायकोचं नाव कुठंच नाही. का ? तर बायकोची बाजू घेतोय असंपण वाटायला नको ना !

Rural Life
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

पारूबाईसारख्या अनेक आयाबाया आहेत. तिच्या सूनंसारख्या सूनाही कमी नाहीत आणि सोमासारखे शेतकरीपण कमी नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की, घरची शेती असली तरी शेतात जाऊन काम करणारे कमी झाले आहेत. ज्याला हौस आहे त्याने ती करायची. दुसरं कुणी डोकून बघणार नाही. ज्याचे त्याला उद्योग आहेत. तसे खास उद्योग नसले तरी घरात टीव्ही बघत बसणं हा पण एक उद्योगच. 

आता अशात होणार काय तर, घरोघरच्या पारूबाईबरोबर बरंच काही कमी होणार किंवा संपणार. हे काही आजच्या आज नाही झालेलं. मागच्या कित्येक वर्षांपासून खतं, औषधं, फवारण्या आणि मुख्य म्हणजे तणनाशकांनी शेतातला मूळचा भाजीपाला संपवला. एकीकडं खुरपायला माणसं मिळत नाहीत. तर दुसरीकडं वाढलेला रोजगार. त्यात मजूरांचा कामचुकारपणा.

अशात तणनाशक सोपं. फवारलं की झालं. ज्या त्या पिकाचं वेगळं. त्यामुळे उसात मेथी, कोथिंबीर नको. गव्हात हरभरा नको. भूईमुगात मका नको. जे ते सेपरेट पिक. ज्याला कुणाला आंतरपीकं घ्यायचीत त्यांनी खुरपणीची तयारी ठेवायची. बांधावर भोपळा, दोडका, कारली, घोसाळं लावायचं नाही. उगं अडचण करून ठेवायची नाही. काय काय भाजीपाला पाहिजे तो सांगितला की बाजारातनं पिशवी भरून घरी आणायची. स्वस्त महाग बघत बसायचं नाही. 

Rural Life
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

घरोघरी गोठ्यातल्या देवळीत ठेवलेली बियांची जुनी पिशवी हरवली. त्यातल्या वाळलेल्या गवारीच्या शेंगा, घेवडा, पावटा, शेवगा, हादगा, वाळलेल्या भेंड्या, जिकडच्या तिकडं झाल्या. नाहीतर एखादी पारूबाई ती पिशवी घेऊन रानात गेली की जागा बघून सगळं बैजवार लावून येणार. त्याच्या उगवण्यावर लक्ष ठेवणार.

वेलांना कशाच्यातरी आधारानं चढवणार. गवार, भेंड्यांची पानं साळणार. येताजाता ओटीभरून माळवं घरी आणणार. येतायेता कुणी ओळखीचं भेटलं की वानवळा देणार. आल्यागेल्याला काही देताना हात आखडता घेणार नाही. तिला व्यवहारातलं शहाणपण भलेही कळत नसेल पण देवघेवीतलं आपलेपण हेच तिचं समाधान असणार.

पारूबाई थकली. मग पिशवीतलं एकेक बी किडलं. किडलं म्हणून फेकून दिलं. पिशवी रिकामी पडली. मग कधीतरी तशीच उकिरड्यात गेली. बी लावायचं ठरलं की कृषीसेवाकेंद्रातून चकचकीत बियांचं पॅकिंग रानात. उगवायच्या आधीपासून त्याला औषधं चालू होणार. त्याला  चकचकीत वाण येणार. बोटभर वाळकाच्या जागी हातभर हिरवीगार काकडी येणार. जाड सालींची टोमॅटो. त्याला तशीच औषधं, फवारण्या.

नाहीतर मावा उजरूच देत नाही पानं, फूलं. अशात एखादी पारूबाई गावरान धरून बसते. टिकवते. हायब्रीडला टक्कर देते. पण हायब्रीडचा वारू काही थांबत नाही. हायब्रीड भरमसाठ पिकणार. तेच गरज भागवणार. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला गावरानची मूठचिमूट कुणाला पुरायची ? आडजीभ ओली तर पडजीभ बोंबलली अशी गावरानची त-हा होणार. हायब्रीडशिवाय पर्याय नसण्याचे दिवस आणि तेच वास्तव. जे काही करायचं ते व्यापारी तत्वावर. त्यातच शेतकऱ्यांचा फायदा.

पाण्याबरोबर शेती बदलली. लसणाला तरी पाणी दे म्हणून दादा, बाबा करत शेजा-याच्या मागं लागणा-याच्या शेतात पाणी आलं. मग सुरुवातीला हौसेनं धनधान्य, भाजीपाला पिकवला. कष्ट करून करून दमल्यावर गाड्या नगदी पिकांकडं वळाल्या. नगदी पिकांनी किडूकमिडूक संपवलं. सगळं कसं ठोक, घाऊक. लाखानं येणाऱ्या आणि लाखानं जाणाऱ्या संसारात किलोभर लसूण, पिशवीभर माळवं म्हणजे किस पेड की पत्ती.

लसूण लावणं बंद म्हणजे लसणाच्या वाफ्यातले कोथिंबिरीचे लुसलुशीत पुंजके नसणार. चुकून पुंजक्याबाहेर पडलेले ऐटीत वाढलेले धने नसणार. शुभ्र नाजूक चांदण्या फुलांनी डुलणारे ठोंब जाणार. लेकुरवाळी मेथी नाही म्हणजे पांढरी फुलं मिरवणारे पालेदार भाजीचे शेंडे नाहीत. हिरवी शिंगं फुटल्यासारख्या टोकदार मेथीच्या शेंगा नाहीत.

Rural Life
Bhima Sugar Election : भीमा’ वर महाडिकांचेच वर्चस्व

न लावता वरंब्यावर उगवलेल्या पालकाच्या ठोंबाची ऐट नाही. जाड आंबूस पानांची चुक्याची भाजी नाही. हलकीफूल्लं गुलाबीसर चुक्याच्या तु-यांचं डुलणं नाही. मधेच झेंडा फडकवल्यासारखा उठून दिसणारा राजगिरा नाही. उकिरड्यातल्या खतातून आलेलं झेंडूच्या चुबुकदार गुच्छांचं देखणेपण नाही.

गव्हात डोलणारे मोहरीचे पिवळेधम्मक ढापे नाहीत. हातावर चोळलेला कोवळालूस्स हुरडा नाही. मकंची कणसं नाहीत. कितीही खाल्लं तरी पोटाला ना ओठाला असा हरभ-याचा कोवळा डहाळा नाही. बांधावरच्या आंबट बोरांची झुडपं तोडून तिथंच आडवी केलेली. इतकं सगळं नाही म्हणजे आपल्या रानात काय असणार आहे ? 

बाजारातनं पिशव्या भरून माळवं आणता येतं पण हे सगळं उगवण्यापासून ताटात येईपर्यंतची मनाला चिकटलेली मायेची हिरवळ विकत आणता येईल का ? ज्यांना माती नाही त्यांचं सोडून देऊ, पण माती असून मातीतल्या वैभवाला मुकताना वाईट वाटतं. माती केवळ पैसा पिकवत नाही तर जगण्याला समद्धी देते, जी पैशात मोजता येत नाही.

Rural Life
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

पारूबाईची सून आलं लसणाची रेडिमेड पेस्ट विकत आणते. तेव्हा पारूबाईच्या डोळ्यापुढं वाफ्यात डोलणारी लसणाची हिरवीगार पात दिसते. आढ्याला लोंबणा-या लसणाच्या पेंड्या दिसतात. सोललेल्या लसणाचा आपल्या हाताला वास अजून वास येतोय असा तिला भास होतो. तिच्याकडं देवळीतल्या बियांच्या पिशवीसहीत अनेक गोष्टी असतात. पण कोण विचारणार ? कोण ऐकणार ? सोमा केव्हाच मोठ्ठा बागायतदार झालेला असतो. सूनबाई बागायतदारीण झालेली असते. ताटात येतील ते दोन घास खाऊन कोप-यातून टुकूटुकू बघण्यापलीकडं पारूबाईकडं काय असतं दुसरं ?

आपल्यापैकी कुणी पारूबाई असेल, कुणी तिची सून असेल तर कुणी सोमा असेल. हा आताचा काळ असा आहे की, जूनं पूर्ण मोडीत निघालेलं नाही आणि नवंही पूर्ण स्वीकारता येत नाही. ही मधली अवस्था आहे आपली. जूनं आपल्या आतड्याला चिकटलेलं आहे. ते विसरता येत नाही, नवंही सोडता येत नाही. आपल्याला मागचं सगळं आठवतं. कदाचित ते आठवणंही सोडत नसेल आपल्याला आणि नवंही पकडून ठेवतं.

Rural Life
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

दोन्हीच्या मधे चेंबून गेलोय आपण. आपल्याला रासायनिक खता औषधाचे, हायब्रीडचे दुष्परिणाम कळतात आणि आपण पुन्हा पहिल्या ठिकाणी जाऊ पाहतो. तिथं तर उजाड जागा असतात. ना लसणाचे वाफे. ना वाफ्यातलं काहीच. ना ती देवळीतली पिशवी. निदान ती रिकामी पिशवी हवी असते आपल्याला. निदान त्या पिशवीचा जुनाट गावरान वास मन भरून घ्यायचा असतो. रानातून माळवं आणलेल्या ओटीचा मऊसर ओलावा पाहिजे असतो.

पण काहीच हाती नाही लागल्यावर काय करणार आपण ? हातावर हात घासून चुटदिशी चुटकी वाजवत आपण म्हणणार, हां आयडिया ! टाळी वाजवत नवं काहीतरी सुचल्याचं नाटक करतो आपण. भराभर वाफे काढतो. हे ते गोळा करून भरपूर लावतो आणि नवं म्हणून दाखवणार असतो. पण आपणच आपल्याला कसं फसवणार ?

अरे ही जुनीच गोष्ट नव्यानं करतोय आपण. पारूबाई, सोमा, सून ही लिहिण्यातली पात्र नसतात फक्त. हे वास्तव असतं आणि ते खरंही असतं. खरंच सोमा पारूबाईवर रागवला होता. पण ती कुणावरच रागवली नव्हती. कुणाला काही बोलली नव्हती. तिचं राज्य संपत आलं होतं.

तिच्या वाफ्यातल्या वाणाची वाताहत झाली होती. ज्या वाफ्यात तिला वानवळयाची ओंजळ दिसायची, ज्या वाणावर तिला मायेचे वाटे दिसायचे, त्याची ही वाताहत होती आणि या वाताहतीत आपल्या भोवतालापेक्षा वेगळं काय लिहिणार असतो आपण ? 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com