Crop Insurance : शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई कशी आणि किती मिळणार?

Crop Insurance Compensation : गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईचा मुद्दा चांगलाच अंगलट येऊ शकतो, याची जाणीव असल्याने घाईगडबडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याचा सरकारचा मानस आहे.
Crop Insurance Survey
Crop Insurance SurveyAgrowon

Crop Insurance Survey : राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून, २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आधीच पीकविम्याच्या अग्रिम भरपाईवरून तोंडघशी पडलेल्या सरकारला पीक नुकसानीच्या मुद्द्यावरून विरोधक घेरणार, याची जाणीव सरकारलाही आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईचा मुद्दा चांगलाच अंगलट येऊ शकतो, याची जाणीव असल्याने घाईगडबडीने नुकसानीचे पंचनामे करून अधिवेशनाच्या आधी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याचा सरकारचा मानस आहे. तसे आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत.

युद्धपातळीवर पंचनामे

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आधी पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहे.

तिन्ही विभाग काम करत असतानाही अजून पंचनामे पूर्ण झाले नाहीत. शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होता. पावसामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पंचनामे ७ डिसेंबरच्या आधी होऊन सरकार मदत जाहीर करणार का? हे पाहणे औत्स्युक्याचे असेल.

...असे होतात पंचनामे

सध्या गावपातळीवर कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून पंचनामे होत आहेत. गावातील पीकपेऱ्याची नोंद तलाठ्यांकडे आहे. मग त्या गावातील गारपीट किंवा अवकाळी पावसाचे प्रमाण आणि किती हेक्टरवर कोणते पीक आहे, यावरून कोणत्या पिकाचे किती नुकसान झाले याची नोंद केली जाते.

तसेच किती टक्के नुकसान आहे, याची नोंद होते. त्याचे अहवाल राज्यपातळीवर सादर केले जातात. त्यावरून राज्यपातळीवरील नुकसान, नुकसानीची टक्केवारी आणि भरपाईची रक्कम सरकार जाहीर करते.

नुकसानीचे क्षेत्र

२८ नोव्हेंबरपर्यंत जे पंचनामे झाले त्यात ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. पण २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरलाही अनेक भागांत पाऊस झाला. त्याची आकडेवारी पुढे यायची बाकी आहे. त्यामुळे नुकसानीची पातळी जास्त आहे.

नुकसानग्रस्त क्षेत्र ५ लाख हेक्टरवरपर्यंत पोहचू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आता अनेक भागातील पाऊस कमी झाला. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी लगेच पुढे येऊ शकते, असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे दोन पर्याय

सध्याच्या नुकसानीची शेतकऱ्यांना दोन माध्यमांतून भरपाई मिळू शकते. एक म्हणजे ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून सरकारची मदत आणि दुसरी म्हणजे पीकविमा. ‘एनडीआरएफ’ची मदत नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मिळेल. पण विमा भरपाई फक्त पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल.

म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई आणि सरकारची भरपाई अशा दोन्ही माध्यमांतून भरपाई मिळू शकते. पण जर पीकविमा काढला नसेल तर फक्त सरकारकडून मिळणारी रक्कमच मिळेल.

Crop Insurance Survey
Crop Insurance Compensation : नुकसान भरपाईपोटी ३३ कोटींवर पीकविमा मंजूर

पीकविम्याची भरपाई

पीकविम्याच्या भरपाईसाठी नुकसान झाल्यापासून शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. शेतकरी आपल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देत आहेत. सध्या शेतामध्ये पीक उभे असेल तर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती जोखीम अंतर्गत भरपाई मिळेल.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीत या जोखीम अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या आपत्तींचा समावेश होतो.

पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत असेल तर नुकसानीची ही जोखीम लागू होते. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीत आपल्याला गारपीट आणि क्षेत्र जलमय झाल्यास भरपाई मिळू शकते

पण पीक काढले आहे मात्र शेतात होते आणि नुकसान झाले तर काढणीपश्चात नुकसान ही जोखीम लागू होते. काढणीपश्चात नुकसान भरपाईत पीक शेतात असताना गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पाऊस आणि अवकाळी पावसामुळे नुकसान, याचा समावेश होतो. नुकसान झाल्यानंतर पंचनामे करून भरपाई देण्यात येते.

शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची पूर्वसूचना दिली तरच विमा भरपाई मिळते. त्यामुळे नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. तसेच नुकसानीच्या पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांनी योग्य ती जोखीम निवडून पूर्वसूचना द्यावी. यामुळे नुकसानीच्या पूर्वसूचना किंवा तक्रारी नाकारल्या जाणार नाही.

पीकविम्याची भरपाई कशी ठरेल?

स्थानिक नैसर्गिक आपत्ती भरपाई

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमअंतर्गत पीकवाढीच्या अवस्थेनुसार भरपाई निश्चित केली जाते. भरपाई काढण्यासाठी पीकवाढीच्या अवस्थेनुसार पीक उत्पादन खर्चाचाही विचार केला जातो. पीकवाढीची अवस्था आणि पीक उत्पादन खर्चाच्या प्रमाणानुसार गुणक ठरवला जातो. हा गुणक पुढीलप्रमाणे निश्चित केला आहे.

नुकसानभरपाईचा गुणक

पीक वाढीची अवस्था भरपाई गुणक

पेरणी ४५

पीकवाढीची अवस्था ६०

फुलोरा अवस्था ७५

पक्वता अवस्था ८५

काढणी अवस्था १००

या गुणकाप्रमाणे नुकसान भरपाई ठरवली जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम अंतर्गत शेतकऱ्याचे पिकाचे झालेले नुकसान, टक्केवारी आणि भरपाईचा गुणक यानुसार भरपाई मिळेल.

काढणीपश्चात नुकसान भरपाई

काढणीपश्चात नुकसान भरपाई या जोखीम अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवले तर विमा काढलेल्या पिकांसाठी कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत म्हणजेच १४ दिवस हा जोखीम लागू पडते. पीक शेतात सुकविण्यासाठी ठेवले आणि गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येते.

तसेच पडलेला अवकाळी पाऊस जिल्ह्याच्या त्या महिन्यातील सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त पडला तरच ही जोखीम लागू पडते.शेतकऱ्याने दिलेल्या नुकसान पूर्वसूचनेनुसार वैयक्तिक स्तरावर पंचनामा केला जातो. पंचनाम्यात नुकसान आढळून आले तरच ही जोखीम लागू होते आणि शेतकऱ्यांना त्या प्रमाणात भरपाई मिळते. नुकसान भरपाई काढताना नुकसानग्रस्त पिकासाठी आलेल्या खर्चाच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या अधीन राहून नुकसान भरपाई देण्यात येते.

सरकारची मदत कशी मिळेल?

राज्य सरकारने नुकतीच तीन हेक्टरपर्यंत ‘एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे ‘एनडीआरएफ'मधून दोन हेक्टरसाठी भरपाई मिळते. त्यामुळे केंद्राकडून दोन हेक्टर आणि राज्य सरकार एक हेक्टर, अशी तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

पिकांचे नुकसान झाल्यास कशी मदत द्यायची याचे नियम ठरलेले आहेत. पिकांचे नुकसान, नुकसानीची टक्केवारी, जमीन खरडून जाणे, भूस्खलन होऊन जमिनीचे नुकसान यासाठी भरपाई मिळते. तसेच ही भरपाई किती असेल हे ‘एनडीआरएफ'च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ठरविलेले आहे.

पिकांचे नुकसान झाल्यास किती भरपाई मिळेल?

अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना किती भरपाई मिळू शकते, याची माहिती ‘एनडीआरएफ'च्या निकषात दिली आहे.

पिकांचे नुकसान झाले आणि पंचनाम्यामध्ये नुकसान किमान ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून भरपाई मिळते. पारंपरिक पिके, फळपिके, वनपिकांना कोरडवाहू आहे की बागायती आहे यानुसार भरपाई मिळते.

भरपाई मिळण्यासाठी नुकसानीची टक्केवारी किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे. नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी भरपाईची रक्कम सारखीच असेल.

Crop Insurance Survey
Orange Crop Insurance : विमा परताव्यात संत्रा फळगळतीचा निकषच नाही

कोरडवाहू पिकांची भरपाई

‘एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे नुकसान झालेले पीक कोरडवाहू असेल तर हेक्टरी ८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. यंदा सरकारने तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मान्य केली.

म्हणजेच समजा एखाद्या शेतकऱ्याची कपाशी कोरडवाहू आहे आणि नुकसानग्रस्त क्षेत्र एक हेक्टर असेल, तर त्या शेतकऱ्याला ८ हजार ५०० रुपये मिळतील. पण नुकसानग्रस्त क्षेत्र ३ हेक्टर असेल, तर २५ हजार ५०० रुपये भरपाई मिळेल.

जर नुकसान झालेले क्षेत्र कमी आहे आणि त्या शेतकऱ्याला मिळणारी भरपाई एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तर ‘एनडीआरएफ'च्या नियमाप्रमाणे त्या शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये भरपाई द्यावी. म्हणजेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये भरपाई मिळेल.

उदा. समजा एखाद्या शेतकऱ्याचे नुकसानग्रस्त क्षेत्र १० गुंठे आहे. तर हेक्टरी ८ हजार ५०० रुपयाप्रमाणे १० गुठ्यांसाठी ८५० रुपये भरपाई येते. पण त्या शेतकऱ्याला ८५० रुपये मिळणार नाहीत. तर एक हजार रुपये मिळतील. म्हणजेच किमान एक हजार रुपये भरपाई देण्याचा नियम आहे.

बागायती पिकांची भरपाई

‘एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे पंचनाम्यामध्ये बागायती पिकांचे जर ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले तर एका हेक्टरसाठी १७०० हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. दोन हेक्टरचे नुकसान असेल तर ३४ हजार आणि तीन हेक्टरचे नुकसान झाले तर ५१ हजार रुपयांची भरपाई मिळेल. तसेच बागायती पिकांसाठी किमान २ हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे. बागायती पिकांना २ हजारांपेक्षा कमी भरपाई मिळणार नाही.

जमीन खरडली, भूस्खलन झाल्यास...

पूर आणि जोरदार पावसाच्या काळात जमीन खरडून जाते. तसेच डोंगराळ भागात भूस्खलनही होते. यासाठी शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. जमीन खरडून गेल्यास हेक्टरी १८ हजार रुपये भरपाई मिळते. तर जमीन खरडून गेल्यास किमान २ हजार २०० रुपयांची भरपाई देण्याचा निकष आहे.

भूस्खलन होऊन जमिनीचे नुकसान झाल्यास अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रुपये भरपाई देण्याचा नियम आहे. या परिस्थितीत किमान पाच हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे.

पशुधन दगावल्यास भरपाई

‘एनडीआरएफ''च्या निकषाप्रमाणे दुधाळ जनावरे आणि ओढकामाची जनावरे दगावल्यास भरपाई देण्याचा नियम आहे. दुधाळ जनावरांमध्ये म्हैस, गाय, उंट यासाठी प्रत्येकी ३७ हजार ५०० रुपयांची भरपाई मिळते.

तर शेळ्या, मेंढ्या आणि वराह यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रत्येकी ४ हजार रुपये मिळतात. तर ओढकामाचा बैल, रेडा आणि उंट दगावल्यास प्रत्येकी ३२ हजार रुपये भरपाई दिली जाते. ही भरपाई मोठ्या तीन पशुधनासाठी आणि तीस लहान पशुधनासाठी मिळते.

शेतकऱ्यांनो, सजग राहा...

पीकविमा किंवा सरकारच्या ‘एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे आपल्याला किती नुकसान भरपाई मिळते, याची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी. त्यासाठी आपले नुकसान किती झाले? किती टक्के झाले? पंचनाम्यात किती नोंद आहे? याची माहिती घ्यावी. पीकविमा आणि ‘एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे आपल्याला किती भरपाई मिळू शकते? याची आकडेमोड स्वतः शिकून घेतल्यास आपल्याला योग्य भरपाई मिळाली का?

हेही समजेल. पीकविम्यासाठी नुकसानीच्या पूर्वसूचना देताना योग्य ते पर्याय, नुकसानीच्या जोखमीची निवड करावी. विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी आल्यानंतर योग्य नोंद होते का? नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद योग्य झाली का? नुकसानीची टक्केवारी योग्य आहे का? तसेच जाग्यावर सह्या होतात का? याची शहानिशा करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com