Women Unpaid Labor : इतिहासातील सगळ्यात मोठी चोरी...

Household Work : लिंग आधारित श्रमवाटपाच्या असमानतेत फारसा बदल झालेला नसला, तरी तो बदल घडवण्याची नितांत गरज आहे. महिलांना केवळ घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून ठेवण्याच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे.
Women Empowerment
Women Empowerment Agrowon
Published on
Updated on

आकाश सावरकर, नीरज हातेकर

जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चोरी रोज तुमच्या-आमच्या घरात होत असते. वाटले ना आश्‍चर्य? ही चोरी आहे घरातील स्त्रियांच्या श्रमाची आणि त्यांच्या वेळेची. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ‘वेळेच्या वापराविषयीचे सर्व्हेक्षण : २०२४’ पूर्ण करून संक्षिप्त माहिती उपलब्ध करून दिली आहे.

आपला वेळ नागरिक विविध कामात कशाप्रकारे खर्च करतात याविषयीचा हा आराखडा आहे. सदर सर्व्हेक्षणातून रोजगार-संबंधित कार्यांमध्ये महिलांच्या सहभागात वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच पुरुष आणि महिलांमध्ये सांस्कृतिक, विश्रांती, समाज माध्यमे आणि खेळ यामध्ये खर्च केला जाणारा वेळ वाढला. मात्र विशेषतः घरगुती सेवा आणि काळजीवाहू सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणात लिंगविषयक तफावत दिसून येते.

वेळेच्या खर्चाचे गणित ः

तक्ता क्र. १ ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक सहभागी व्यक्तीने विविध कामामध्ये दिवसभरात खर्च केलेला सरासरी वेळ (मिनिटांमध्ये)

००---२०२४---२०१९

कामाचे वर्णन---ग्रामीण---शहरी---ग्रामीण---शहरी

रोजगार आणि संबंधित कामे---४१७---४९०---४०४---४८५

स्वतःच्या अंतिम वापरासाठी वस्तूंचे उत्पादन---१२३---६४---१५८---८५

कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य घरगुती सेवा---२४१---२३२---२४९---२४७

कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य काळजीवाहू सेवा---११५---११७---११३---११६

विनामूल्य स्वयंसेवी, प्रशिक्षणार्थी आणि इतर विनामूल्य काम---१२१---१२३---९८---१०६

शिक्षण---४१३---४१९---४२२---४३०

सामाजिकीकरण आणि संवाद, समुदाय सहभाग आणि धार्मिक कृती---१४२---१३१---१४५---१३८

संस्कृती, विरंगुळा, मास-मीडिया आणि क्रीडा सराव---१६५---१८३---१५९---१७६

स्वतःची काळजी आणि देखभाल---७११---७०१---७३१---७१५

Women Empowerment
Sugarcane Labor Crisis : हार्वेस्टरमुळे ऊसतोडणी मजुरांवर गंडांतर

ग्रामीण भागातील लोक स्वतःच्या अंतिम वापरासाठी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी शहरी भागातील लोकांच्या तुलनेत अधिक वेळ खर्च करतात. त्याउलट, शहरी भागातील लोक मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठी अधिक वेळ देतात.

२०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये रोजगार आणि संबंधित कार्यांसाठी खर्च केला जाणारा वेळ वाढला आहे, तर स्वतःच्या वापरासाठी वस्तू उत्पादनासाठी खर्च होणाऱ्या वेळेत घट झाली आहे.

तसेच, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये विनामोबदला स्वयंसेवी कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेत वाढ झाली आहे. मात्र शिक्षण आणि देखभालीसाठी खर्च होणाऱ्या वेळेत घट दिसून येते. याउलट, संस्कृती, विरंगुळा, मीडिया आणि खेळ यासाठी खर्च होणाऱ्या वेळेत वाढ झाली आहे.

पुरुष आणि महिलांच्या वेळ खर्चातील तफावत

तक्ता क्र. २ ः पुरुष आणि महिलांनी विविध कामांमध्ये दिवसभरात खर्च केलेला सरासरी वेळ (मिनिटांमध्ये)

क्रियेचे वर्णन---२०२४---२०१९

००---पुरुष---महिला---पुरुष---महिला

रोजगार आणि संबंधित कामे---४७३---३४१---४५९---३३३

स्वतःच्या अंतिम वापरासाठी वस्तूंचे उत्पादन---१३७---१०४---१९८---११६

कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य घरगुती सेवा---८८---२८९---९७---२९९

कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य काळजीवाहू सेवा---७५---१३७---७६---१३४

विनामूल्य स्वयंसेवी, प्रशिक्षणार्थी आणि इतर विनामूल्य काम---१३९---१०८---१०२---९९

शिक्षण---४१५---४१३---४२६---४२३

सामाजिकीकरण आणि संवाद, समुदाय सहभाग आणि धार्मिक कृती---१३८---१३९---१४७---१३९

संस्कृती, विरंगुळा, मास-मीडिया आणि क्रीडा सराव---१७७---१६४---१६४---१६५

स्वतःची काळजी आणि देखभाल---७१०---७०६---७२९---७२३

२०१९ आणि २०२४ मधील वेळेच्या उपयोगाच्या तुलनेत काही महत्त्वपूर्ण बदल दिसून येतात. रोजगार आणि संबंधित कार्यांवर खर्च होणाऱ्या वेळेत वाढ झाली आहे. पुरुषांचा वेळ ४५९ मिनिटांवरून ४७३ मिनिटांपर्यंत वाढला आहे, तर महिलांचा वेळ ३३३ मिनिटांवरून ३४१ मिनिटांपर्यंत वाढला आहे. यावरून असे दिसते, की महिलांच्या आर्थिक कार्यात वाढ झाली असली तरी अजूनही लिंगभेद कायम आहे. स्वतःच्या अंतिम वापरासाठी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी खर्च होणारा वेळ दोन्ही गटांत कमी झाला आहे. यावरून पारंपरिक घरगुती उत्पादनांवर कमी भर दिला जात असल्याचे दिसून येते.

घरगुती आणि काळजीवाहू सेवा ः

घरगुती सेवा आणि काळजीवाहू सेवा यामध्ये महिलांचा वाटा पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. २०२४ मध्ये महिलांनी कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य घरगुती सेवांसाठी २८९ मिनिटे खर्च केली, तर पुरुषांनी ८८ मिनिटे. काळजीवाहू सेवांसाठी महिलांनी १३७ मिनिटे तर पुरुषांनी फक्त ७५ मिनिटे खर्च केल्या. या आकडेवारीत २०१९ च्या तुलनेत फारसा मोठा बदल दिसत नाही, यावरून महिलांवरील अशा जबाबदाऱ्यांचा भार अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट होते. पुरुषांच्या तुलनेत ३२८ टक्के जास्त वेळ महिला कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य घरगुती सेवेवरती खर्च करतात. २०१९ मध्ये हे प्रमाण ३०८ टक्के एवढे होते. यामध्ये मोडणारी कामे ही प्रामुख्याने / स्त्रियांशी संबंधित आहेत. या कामांना पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये कमी महत्त्वाचे मानले जाते. हीच कामे बाहेरील व्यक्तीकडून करून घ्यायला पैसा द्यावा लागला असता, याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. ---

स्वतःसाठी वेळ ः

स्वतःच्या काळजी व देखभालीसाठी खर्च होणाऱ्या वेळेत घट झाली आहे. पुरुषांसाठी हा वेळ ७२९ मिनिटांवरून ७१० मिनिटांवर आला आहे, तर महिलांसाठी ७२३ मिनिटांवरून ७०६ मिनिटांवर घसरला आहे. यावरून असे दिसते, की लोकांचे दैनंदिन जीवन अधिक गतिमान होत असून, स्वतःच्या काळजीसाठी कमी वेळ दिला जात आहे. वसई-विरार भागातून मुंबईकर रोज कामासाठी तीन तास प्रवास करतात. रात्री घरी उशिरा पोहोचून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर घरातून निघावे लागते. मुंबईतील माणूस फक्त रविवारी आणि शासकीय सुट्टीच्या दिवशीच जगतो म्हणजेच कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देतो.

महिलांवरचा दुहेरी व तिहेरी ताण ः

पुरुषांच्या सोबतीला उभं राहून घरात पैसे कमावण्यासाठी महिलांना घराबाहेर कामासाठी पडावा लागते. एवढे करूनही घरच्या जबाबदाऱ्यांतून महिलांना मुक्ती मिळत नाही. त्यांना या बाबी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येऊन मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडते. त्याला दुहेरी जबाबदारी (Double Burden) आणि तिहेरी जबाबदारी (Tripple Burden) असे म्हटले जाते.

दुहेरी जबाबदारी म्हणजे एखाद्या व्यक्ती, विशेषतः महिला मोबदला मिळणारी कामे ,जसे की मोल-मजुरी आणि विनामोबदला कामे, जसे की घरगुती कामे, मुलांची काळजी, वयोवृद्धांची सेवा अशा दोन्ही कामांची जबाबदारी. उदा. ग्रामीण भागातील महिला शेतमजूर म्हणून कामाला जाते आणि घरी आल्यावर स्वयंपाक, मुलांची काळजी, साफसफाई इत्यादी कामे करते.

तिहेरी जबाबदारी (Triple Burden) ः

यामध्ये यामध्ये मोबदला मिळणारी कामे, विनामोबदला घरगुती कामे आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचा समावेश होतो. उदा. महिलेने नोकरी, घरगुती जबाबदाऱ्या आणि समाजसेवेचे, कुटुंब किंवा समाजातील पारंपरिक समारंभ, धार्मिक वा सामाजिक कार्याचे ओझे एकाच वेळी वाहणे. ह्या बाबी महिलांच्या श्रमाच्या अदृश्यतेशी (Invisible Work) संबंधित आहेत. या कामांचा पुरेशा प्रमाणात ना उल्लेख होतो ना कधी श्रेय मिळते. या बाबी थेट पैसे मिळवून देत नसल्यामुळे/ थेट पैसा घरी येत नसल्यामुळे कमी प्रतीची मानली जातात.

Women Empowerment
Women Sugarcane Cutter Labor : अनपेक्षित सन्मानामुळे उसतोड मजूर महिला भारावल्या

तक्ता क्र. ३ पुरुष आणि महिलांनी विनामोबदला आणि मोबदला मिळणाऱ्या कामांवर खर्च केलेल्या वेळेची तुलना

कामाचे वर्णन---२०२४---२०१९

००---पुरुष---महिला---पुरुष---महिला---

विनामोबदला केलेली कामे (Unpaid Work)---१२३---३६३---१६७---३७३

मोबदला मिळणारी कामे (Paid Work) ---४१४---३०२---४१५---३१३

२०१९ आणि २०२४ या दोन वर्षांतील पुरुष आणि महिलांनी विनामोबदला आणि मोबदला मिळणाऱ्या कामांसाठी दिलेल्या वेळेच्या तुलनेत मोठी असमानता दिसून येते. २०२४ मध्ये महिलांनी दररोज ३६३ मिनिटे विनामोबदला कामांसाठी खर्च केली, तर पुरुषांनी फक्त १२३ मिनिटे दिली. २०१९ मध्येही ही असमानता स्पष्ट होती, तेव्हा महिलांनी ३७३ मिनिटे, तर पुरुषांनी १६७ मिनिटे अशा कामांसाठी दिली होती.

ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते, की महिलांवर घरगुती जबाबदाऱ्या, मुलांची आणि वृद्धांची देखभाल, स्वयंपाक, स्वच्छता आणि अन्य पारंपरिक कुटुंबसंस्थेशी निगडित कामांचा जास्त भार आहे. दुसरीकडे, पुरुषांनी या प्रकारच्या कामांसाठी दिलेला वेळ कमी होत चालला आहे, याचा अर्थ घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभाग अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे.

मोबदला मिळणाऱ्या (Paid Work) कामांच्या बाबतीत मात्र संपूर्ण वेगळे चित्र दिसून येते. २०२४ मध्ये पुरुषांनी ४१४ मिनिटे, तर महिलांनी ३०२ मिनिटे मोबदला मिळणाऱ्या कामांसाठी खर्च केली. २०१९ मध्येही हे प्रमाण यासारखेच होते, जिथे पुरुषांनी ४१५ मिनिटे, तर महिलांनी ३१३ मिनिटे अशी कामे केली. यावरून स्पष्ट होते की पुरुष मुख्यत्वे वेतन मिळणाऱ्या आर्थिक कामांमध्ये अधिक वेळ घालवतात, तर महिलांना दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात – घरगुती आणि आर्थिक. यावरून स्पष्ट होते की महिलांना अजूनही मोबदला मिळणाऱ्या आर्थिक कामांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही, कारण त्यांच्यावर विनामोबदला श्रमांचा अधिक भार आहे.

दृष्टिकोन बदलावा लागेल ः

घरातील पुरुष बाहेर नोकरी करून पैसे मिळवत असेल तर नक्कीच घरची जबाबदारी ही महिलेने सांभाळली पाहिजे. पण हे होत असताना ‘तिच्या’वर अतिरिक्त ताण तर येत नाहीना? याकडे आपण कधी लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. घरातील महिलावर्ग वरील जबाबदाऱ्यांमध्ये तुलनेत इतक्या व्यग्र असतात, की त्यांना स्वतःला पुरेसा वेळ देता येत नाही.

त्यामुळे नव-नवीन गोष्टी शिकणे जमत नाही, बाहेर जगभर काय चाललंय ते निरखून बघायला, त्यावर विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यामुळे महिला वर्ग कुटुंबातील इतर सदस्यांवर पूर्णपणे अवलंबून होऊन जातात.

काही प्रसंगी पतीच्या निधानंतर महिलांना साधी-साधी बाहेरची कामे करायला सुद्धा कमालीचा ताण येतो. उदा. बँकेत जाऊन पैसे काढणे, सेतू केंद्रावर जाऊन उत्पन्नाचा दाखला काढणे. महिला आपल्या समाजव्यवस्थेला / अर्थव्यवस्थेला श्रम पुरवणाऱ्या मानवी संसाधनांची निर्मिती करतात. त्या करत असलेल्या पालनपोषणामुळे आपल्याला एक उत्तम मानवी संसाधन उपलब्ध होते.

त्यामुळे महिलांच्या या एकंदर स्थितीकडे सर्वंकष दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून आपण Recognise, Reduce, Redistribute या तीन आर (R) वरती काम करणे आवश्यक आहे. महिलाच्या कामाला मान्यता देणे (recognize करणे), घराबाहेरील मोबदला मिळणारी कामे, कौटुंबिक जबाबदारी यामुळे येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी शक्य असतील त्या कौटुंबिक कामात काही प्रमाणात का होईना हातभार लावणे आवश्यक आहे.

लिंग आधारित श्रमवाटपाच्या असमानतेत फारसा बदल झालेला नसला, तरी तो बदल घडविण्याची नितांत गरज आहे. महिलांना केवळ घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून ठेवण्याच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. त्यांना मोबदला मिळणाऱ्या कामांमध्ये अधिक वेळ देता यावा यासाठी पुरुषांनीही घरगुती जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात. घरकाम आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या या फक्त महिलांच्याच आहेत, हा विचार बदलला पाहिजे.

हे घडवून आणण्यासाठी वारंवार चर्चा झाली पाहिजे, तसेच धोरणांमध्ये आणि दैनंदिन वागण्यातही बदल झाला पाहिजे. सरकारने आणि समाजाने महिलांच्या अदृश्य श्रमाची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना अधिक संधी देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. घरातील सदस्यांनी शक्य असेल त्या घरगुती जबाबदाऱ्या समानपणे वाटून घेतल्या तर महिलांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेळ देता येईल. पुरुषांनी मुलांची काळजी, वृद्धांची देखभाल आणि इतर घरगुती कामांमध्ये हातभार लावला पाहिजे.

समाजमाध्यमांवर फक्त महिलादिनी आईसोबतचा फोटो शेअर करून आपल्या सर्वांची जबाबदारी संपणार नाही. महिलांना खऱ्या अर्थाने समान वागणूक देण्यासाठी त्यांच्या श्रमाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. समान जबाबदारीची जाणीव आणि त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने समतोल समाज निर्माण होऊ शकणार नाही.

(आकाश सावरकर हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संशोधक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com