Kharif Crop Loss: चिखलात रुतल्या खरिपाच्या आशा

Kolhapur Rain Damage: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा खरिपाचे गणित बिघडले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीनच्या वाढीला वावच मिळत नसून, बहुतांश पिकांची वाढ खुंटली असल्याचे चित्र आहे.
Kharif Crop Failure
Kharif Crop FailureAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१. पावसाचा अतिरेक: कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरिपाचे गणित कोलमडले आहे; सोयाबीन, भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांची उगवण आणि वाढ अडथळ्यात.

२. शेतांची वाफसा स्थिती नाही: सततचा पाऊस, सूर्यदर्शनाचा अभाव आणि चिखलामुळे शेतात यंत्रसामग्री व मजुरी अडचणीत, लागवड पूर्णतः ठप्प.

३. भात पिकावर धोक्याची घंटा: भात पेरणीसाठी तरूच न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाइलाजाने काही शेत नापीक ठेवले आहेत.

४. रोजगाराचा प्रश्न: चिखलामुळे मजूर कामावर जात नाहीत, परिणामी ग्रामीण मजुरांच्या रोजगारावरही परिणाम.

५. शेतकऱ्यांची मागणी: ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत जाहीर करण्याची जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Kolhapur News: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा खरिपाचे गणित बिघडले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीनच्या वाढीला वावच मिळत नसून, बहुतांश पिकांची वाढ खुंटली असल्याचे चित्र आहे. क्वचितच सूर्यदर्शन होत असल्याने शिवारे वाफसा स्थितीत नसल्याने शेतीवाडीत चिखल पाहावयास मिळत आहे. परिणामी खरिपाचे गणित बिघडले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीची निराशा दिसत आहे.

उगवणीच्या वेळीच पावसाने अतिकृपा करून पेरण्यांचे गणित बिघडविले आहे. विशेष करून यंदा जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या भाताबाबत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पेरलेल्या भाताची उगवण न होणे, भातरोप लावणीसाठी तरू उपलब्ध नसणे या अडचणी खरिपाच्या प्रारंभीच आल्या आहेत.

Kharif Crop Failure
Kharif Rain: पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज

याचा विपरीत परिणाम यंदाच्या खरिपावर होईल की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे. ‘सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावे. कमीत कमी नुकसानीची भरपाई तरी मिळावी, म्हणजे पुढच्या हंगामासाठी काहीतरी फायदा होईल,’’ अशी मागणी केखले (ता. पन्हाळा) येथील जयवंत मगदूम यांनी केली.

पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी हे भाताचे पट्टे पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एक-दोन दिवस पाऊस थांबून पुन्हा जोर धरत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी हटत नसल्याचे चित्र हिरव्यागार असणाऱ्या जिल्ह्यातील आहे.

एकीकडे वाढीवर परिणाम झाला आहे. तर, दुसरीकडे पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे डोंगरातील वाफे तुटून गेले, बांध तुटले, शेतीच्या मधोमध ओहोळ सुरू झाल्याने माती धुऊन गेली. अखेर कंटाळलेल्या शेतकऱ्याने डोंगरी पिकांची अपेक्षा सोडून ते नापीक ठेवणे पसंत केले आहे. नाचणीचे तरू सुरुवातीलाच टाकला जातो. यंदा तरू तयार करण्यासही संधी मिळाली नाही.

Kharif Crop Failure
Kharif Sowing: पुणे विभागात खरिपाचा ८९ टक्के पेरा

अंतिम टप्प्यात कशीतरी टाकलेली रोपवाटिका तयार झालीच नाही. यंदा नाचणीच्या लागवड क्षेत्रातील लक्षणीय घट होणार आहे. हवे तसे भुईमूग उत्पादन ही मिळणार नाही, अशी भीती आहे. ‘‘आम्हाला मजूर खर्च परवडत नसल्याने पुढच्या अंदाजावर पीक घेणे अशक्य असल्याने आम्ही यंदा खरीप पिके घ्यायचा नाद केला नाही,’’ अशी प्रतिक्रिया कोडोली येथील यशवंत पाटील यांनी व्यक्त केली.

‘‘औंदा पाऊस सुधरू देईना, शेतात जायला वाटच नाही, चालायला येईना तर पिकं कशी घेणार?’’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया बोरपाडळे येथील रामा भोसले यांनी व्यक्त केली. शाहूवाडी तालुक्यातील बाजीराव कांबळे, यांचा चेहरा सध्या चिंतेने ग्रासलेला आहे. ‘असा पाऊस कधी पाहिला नव्हता. सतत दोन महिने पाऊस, सूर्यदर्शन नाही. शेतात उभं राहिलं तर चिखलात रुतुन जातोया माणूस,’’ अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. पावसामुळे कांबळे यांच्या शेतातील सोयाबीनची वाढ पूर्णपणे थांबली आहे.

सध्या पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांकडे वेळीच लक्ष देऊन ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

रोजगारावरही परिणाम

सातत्यपूर्ण पावसाने सूर्यदर्शन रोज होत नाही. शेती चिखलाने भरली आहे, ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे वापरणेही शक्य होत नसल्याचे चित्र आहे. याचा परिणाम फक्त पिकांवरच नाही, तर मजुरांच्या रोजगारावरही झाला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१.खरिपात कोणती पिके सर्वाधिक प्रभावित झाली आहेत?
सोयाबीन, भात, नाचणी, भुईमूग यांची वाढ आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात अडथळ्यात आली आहेत.

२. या पावसाचा मजूर रोजगारावर कसा परिणाम झाला आहे?
चिखलामुळे शेतात काम नाही, परिणामी मजुरांना काम मिळत नाही.

३. सरकारने मदतीसाठी काय करणे अपेक्षित आहे?
ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत आणि पीक विमा लाभ तत्काळ देणे गरजेचे आहे.

४. भात लागवडीवर काय परिणाम झाला आहे?
रोप लागवडीसाठी तरू मिळाला नाही, परिणामी भात लागवड होऊ शकलेली नाही.

५. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय पर्याय ठेवले आहेत?
काहींनी शेती नापीक ठेवली आहे, काहींनी खरिपाचा नादच सोडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com