Tur Soybean Production : सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीनचे कमी कालावधीचे वाण (म्हणजेच JS-२०-३४ , JS-९३-०५, MAUS-७१ , JS-९५-६० ) वापरणार असल्यास ट्रॅक्टरचलित सात दात्यांच्या पेरणी यंत्राचे मधील दाते तसेच ठेवावे. त्याच्या अलीकडील व पलीकडील तीन फणे थोडे थोडे सरकवून घ्यावेत.
एक ते सव्वा फूट इतकी मोकळी जागा तुरीच्या दोन्ही बाजूंना तयार होते. म्हणजेच ६ ओळी सोयाबीन : १ ओळ तूर अशीच पेरणी होऊनही तुरीच्या वाढीला मोकळी जागा उपलब्ध होते.
सलग तूर लागवडीसाठी जोडओळ पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यासाठी ट्रॅक्टचलित सात दात्यांच्या (फण्याच्या) पेरणी यंत्राच्या पहिल्या व शेवटच्या बियाणे व खताच्या कप्प्यात अनुक्रमे बियाणे व खत घ्यावे. मधील पाच कप्पे खाली राहतील.
पेरणी करतेवेळी येताना व जाताना साधारणत: ३.५ ते ४ फूट अंतर सोडावे. प्रत्येकी ३.५ ते ४ फूट अंतरानुसार जोडओळ पद्धतीत तूर पिकाची पेरणी होईल. दोन जोडओळींमध्ये साधारणत: १०.५ फूट अंतर राहील.
या ठिकाणी डवऱ्याच्या अथवा वखराच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून मधोमध जर दांड अथवा सऱ्या पाडून घेतल्यास जोडओळीतील तूर गादीवाफ्यावर रूपांतरित होईल. जोडओळीच्या आतील बाजूने ठिबकची लॅटरल ठेवल्यास तब्बल १२.२५ फुटांवर लॅटरल येईल. केवळ एका लॅटरलच्या साह्याने जोडओळीला ठिबकद्वारे ओलित शक्य होईल.
सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये दोन्ही पिके जोडओळ पद्धतीत घ्यावयाची असल्यास, ट्रॅक्टरचलित सहा दाती पेरणीयंत्राचा उपयोग करावा. त्यातील पहिल्या व शेवटच्या कप्प्यामध्ये तूर बियाणे घ्यावे. पेरणी यंत्राची अलीकडील व पलीकडील बाजूची बियाण्याची व खताची दोन नंबरची नळी बंद करावी.
म्हणजेच मधल्या दोन नळ्यांच्या कप्प्यामध्ये सोयाबीन बियाणे व खताच्या कप्प्यांमध्ये खत घ्यावे लागेल. अशा प्रकारे पेरणी करताना ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र प्रत्येकवेळी पलटून येताना व जाताना जमिनीच्या प्रकारानुसार साधारणत: तीन- साडेतीन फुटाची जागा सोडावी. म्हणजेच काठावरच्या तूर पिकाच्या ओळीच्या बाजूला पुन्हा तुरीची ओळ येईल.
अशा प्रकारे तूर पिकाच्या दोन जोड ओळीच्या मध्ये सोयाबीनच्या दोन ओळी येतील. सोयाबीन पिकाच्या जोडओळीच्या दोन्ही बाजूंना मोकळ्या जागेत मध्यभागी, डवरणीचे (कोळपणी) वेळी दांड पाडून घेतल्यास दोन्ही पिकाच्या जोडओळी गादीवाफ्यावर (रुंद वरंबावर) येतील.
पट्टा पेर पद्धतीची आवश्यकता
आंतरपीक पद्धतीमध्ये मूग, उडीद व सोयाबीन ही पिके फुलोरावस्थेत येतायेता संपूर्ण जमीन झाकतात. ही स्थिती सोयाबीनची मुख्य पीक शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत येईपर्यंत असते. मुख्य पिकाने संपूर्ण शेत झाकले गेल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम तुरीच्या पिकावर होतो. मुख्य पिकाच्या तुलनेमध्ये तुरीकडे शेतकऱ्याचे फारच कमी लक्ष असते.
तुरीचे पीक मुख्य पिकाच्यावर फक्त शेंडे काढत राहते. खरेतर या दरम्यान तूर पिकाची फांद्या येण्याची अवस्था असते. मात्र मुख्य पिकाच्या उंचीपर्यंत येणाऱ्या फांद्या कधी जळतात, कुजतात, वाळतात, गळून पडतात अथवा जिरून जातात ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षातही येत नाही. पुढे मुख्य पिकाची कापणी झाल्यावर सोयाबीनच्या उंचीपर्यंत तुरीची खालील बाजू पूर्णपणे फांद्यारहित राहिल्याचे स्पष्ट होते.
म्हणून मुख्य पीक शक्यतो जितक्या कमी कालावधीचे असेल, तितके तुरीचे उत्पादन अधिक मिळण्याची शक्यता वाढते. मूग पिकाचा कालावधी ६०-७० दिवस, उडीद पिकाचा कालावधी ७५-८० दिवस, सोयाबीनचा कालावधी ९५-१०५ दिवस या प्रमाणे मुख्य पिकाचा कालावधी अधिक असल्यास तुरीचे उत्पादन कमी राहते.
वास्तविक दोन्ही पिकांची गर्दी झाल्यामुळे रोग- किडीच्या प्रादुर्भावासाठी निरीक्षण करून फवारणी करणेही शक्य होत नाही. यातून दोन्ही पिकांचे नुकसान होते. म्हणून मूग : तूर, उडीद : तूर, सोयाबीन : तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये पट्टापेर पद्धतीचा अवलंब करणे अत्यावश्यक ठरते. यात पिकाची निगराणी, फवारणी, ओलित, पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन इ. बाबी शक्य होतात.
खांडण्या भरणे आणि विरळणी
तूर पिकाची उगवण झाल्यानंतर लगेचच तुरीच्या ओळीमध्ये दोन झाडातील अंतरानुसार खांडण्या भरून घ्याव्यात. याकरिता पळसाच्या पानाच्या द्रोणामध्ये पेरणीसोबत एकरी २५० ते ३०० जादा रोपे आधीच तयार करून ठेवावी. ती खांडण्या भरण्यासाठी उपयोगी ठरतात. खांडण्या भरतेवेळी जमिनीत मुबलक ओल असावी.
अशा प्रकारे रोपे बनविणे शक्य नसल्यास तुरीचे पीक १२ ते १५ दिवसांचे असताना मजुरांच्या साह्याने ओळीमध्ये दोन झाडांतील राखावयाच्या १५ ते २० सेंमी अंतरानुसार बियाणे डोबून खांडण्या बुजवाव्यात.
तूर पिकाची विरळणी कटाक्षाने करावी. विरळणी थोडी विलंबाने म्हणजेच शेतात निंदणी (खुरपणी) करतेवेळी करावी. तूर झाडांची गर्दी झालेल्या ठिकाणची कीडग्रस्त, रोगग्रस्त, कमी उंचीची, योग्य वाढ न झालेली रोपे, दोन झाडातील अंतर (१५ ते २० सेंमी) ठेवून मजुरांच्या साह्याने विरळून घ्यावी. तूर पिकात विरळणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
याचा सरळ संबंध झाडांची संख्या, झाडाचे बूड व खोडाची बळकट वाढ, फांद्यांची संख्या यासोबत आहे. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात.
फांद्याची छाटणी
तूर पिकांमध्ये वेळीच शेंडे छाटल्यामुळे फांद्यांच्या संख्येत वाढ होते. आता सर्वत्र बॅटरीचलित छाटणी यंत्र उपलब्ध आहे. पेरणीपासून ३०, ६० व ९० दिवसांचे असताना तीन वेळा छाटणी करावी. याद्वारे मुख्य खोडावर मुख्य फांद्या, मुख्य फांद्यावर उपमुख्य फांद्या आणि उपमुख्यफांद्यावर उपफांद्या म्हणजेच तोरंबे (ज्या फांद्यावर फूल आणि शेंगा लागतात) मोठ्या संख्येने येतील.
ज्यांना तीन छाटण्या शक्य होणार नाहीत, त्यांनी किमान दोन वेळा (पेरणीपासून पीक ३५ आणि ७० दिवसांचे असताना) करावी. ज्यांनी दोन वेळाही छाटणी करणे शक्य होणार नाही, त्यांनी पीक साधारणत: ६५-७० दिवसांचे असताना किमान एकदा तरी शेंडे छाटावेत.
छाटणीवेळी व नंतर पावसाळी वातावरण असल्यास बुरशीनाशकाची एक फवारणी (कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे) नक्की घ्यावी.
संपर्क - प्रा. जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७, (सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.