Tur Varieties Selection : उत्पादन वाढीसाठी तूर वाणाची निवड, पेरणी

Tur Production : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे दाळवर्गीय पीक तूर हे भारतीयांच्या प्रथिनांचा एक महत्त्वाचा स्रोतही आहे. सध्या तुरीला बऱ्यापैकी दर मिळत असला तरी विविध कारणांमुळे उत्पादन घटलेले दिसत आहे.
Tur Varieties Selection
Tur Varieties SelectionAgrowon

Tur Cultivation : बहुतांश शेतकरी तूर लागवड ही मुग, उडीद, सोयाबीन किंवा काही प्रमाणात बीटी कपाशीसोबत आंतरपीक म्हणून करतात. दर वाढल्यामुळे काही शेतकरी सलग लागवडीकडेही वळलेले दिसतात. विशेषतः ज्यांच्याकडे ओलिताची अथवा ठिबकची सोय आहे ते सलग लागवड करतात. कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने तूर आंतरपीक म्हणूनच करतात.

वाणाची निवड

आंतरपीक पद्धतीमध्ये तूर पिकाची उत्पादकता मुख्य पिकाच्या कालावधीवर निर्भर असल्याचे आढळून येते. उदा. मुग पिकाचा कालावधी कमी असून, शेत लवकर खाली झाल्यामुळे तूर पिकाची उत्पादकता जास्त आढळते. त्याखालोखाल उडीद पिकातील तूर व त्यानंतर सोयाबीनमधील तूर यांची उत्पादकता कमी - कमी होताना आढळते.

सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेणार असल्यास सोयाबीनच्या कमी कालावधीचे वाण उदा. जेएस - ९३-०५, जेएस ९५-६०, एमएससीएस-७१, जेएस-२०-३४ इ. ची निवड करावी. तूर पिकाच्या उत्पादनातही वाढ होताना आढळते.

कालावधीनिहाय सलग लागवडीसाठी तूर पिकाच्या वाणांची निवड करता येईल. यासोबतच आपल्या भागातील जमीन, वातावरण, पाऊस, ओलिताची व्यवस्था, पीक पद्धती, वाणाचा पसंतीक्रम, वाणाचा कालावधी, दाण्याचा रंग, डाळीचा उतारा, वाणाला दाल मिलवाल्यांद्वारे दिल्या जाणारा पसंतीक्रम, वाणाची बाजारातील मागणी, मिळणारा बाजारभाव, मळणीदरम्यान होणारी दाण्याची फूट आणि वाणाच्या बियाण्याची उपलब्धता यानुसार शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या वाणाची निवड करावी. त्यासाठी तक्ता पहा.

मूळ कूज, खोड कूज व मर रोखण्यासाठी

प्रारंभिक किंवा रोपटे अवस्थेत जास्त पावसामुळे ओळीत पाणी साचून राहिल्यास मूळसड या बुरशीजन्य रोगामुळे रोपांची मोठ्या प्रमाणात मर होते. तूर पिकाच्या ओळीत वारंवार खांडण्या भराव्या लागतात. हे टाळण्यासाठी तूर बियाण्याला ट्रायकोडर्मा ५ ते १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रीया करावी.

ट्रायकोडर्मा उपलब्ध न झाल्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम अथवा थायरम अधिक कार्बोक्झीन (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम अथवा पेनफ्ल्युफेन (१३.२८%) अधिक ट्रायफॉक्सॅस्ट्रोबीन (१३.२८%) (संयुक्त बुरशीनाशक) १ मि.लि. अथवा थायोफिनेट मेथिल अधिक पायरोक्लोस्ट्रोबीन (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रीया करावी. (*ॲग्रेस्को शिफारस)

प्राथमिक अवस्थेतील मुळसड या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोपटे अवस्थेतील पिकाला ट्रायकोडर्मा एक ते दीड लिटर प्रति २०० लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. ही आळवणी पाठीवरील नॅपसॅक पंपाने नोझलला प्लॅस्टिकचे हुड (टोकर/ कटोरी) लावून करता येते.

Tur Varieties Selection
Tur Stock Limit : तुरीवरील स्टॉक लिमिट पाळा

ज्या शेतात दरवर्षी रोपे जळण्याची समस्या उद्भवते, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मायुक्त शेणखत शेतात शेवटची वाही अथवा रोटाव्हेटर अथवा पट्टीपास मारण्यापूर्वी पसरून द्यावे. (ट्रायकोडर्मायुक्त शेणखत करण्याची पद्धत - प्रति ५० किलो शेणखताध्ये १ ते १.५ लिटर ट्रायकोडर्मा मिसळून हे मिश्रण सावलीच्या ठिकाणी १२ ते १५ दिवस ओल्या गोणपाटाने झाकून ठेवावे. )

आंतरपीक आणि सलग तूर पिकासाठी राखावयाचे पेरणीचे अंतर

कोरडवाहू परिस्थितीत मूग : तूर, उडीद : तूर अथवा सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र सात दात्यांचे (फण्यांचे) असल्यास, पेरणी यंत्राच्या मधल्या म्हणजे चार नंबरच्या कप्प्यात तूर बियाणे घेतात आणि पेरणी यंत्राच्या अलीकडच्या व पलीकडच्या प्रत्येकी तीन कप्प्यांमध्ये सोयाबीन घेतात.

म्हणजे प्रत्येक वेळी ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र पलटून येताना व जाताना तीन ओळी सोयाबीनच्या बाजूला पुन्हा सोयाबीनच्याच तीन ओळी येतात. अशा प्रकारे सहा ओळी सोयाबीन : एक ओळ तूर अशी पेरणी होते. सोयाबीनच्या शिफारशीच्या दोन ओळीतील अंतरानुसार (उदा. ४५ सेमी), प्रत्येकी सातवी ओळ तुरीची असल्यास तुरीच्या दोन ओळीतील अंतर तब्बल १०.५ फूट एवढे होते.

आंतरपीक पद्धतीतील मुख्य पिकाची (सोयाबीन) कापणी झाल्यानंतर त्या शेतात तुरीचे पीक संपूर्ण शेत व्यापते. फुले व शेंगांनी पीक लगडल्यानंतर तुरीमध्ये फवारणीसाठीसुद्धा जागा शिल्लक राहत नाही. म्हणून ज्यांना सलग तूर लागवड करावयाची आहे, त्यांनी दोन ओळीतील अंतर किती ठेवायचे याचे योग्य नियोजन केले पाहिजे.

सलग तूर पिकाची पेरणी करताना तूर पिकाच्या दोन ओळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार साधारणत: ९ ते १० फूट राखणे क्रमप्राप्त आहे असे वाटते.

सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये, प्रत्येकी सातवी ओळ तूर पिकाची असताना, तूर पिकाचे पेरणीसाठी बियाणे किती वापरावे याबाबत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहेत. सलग सोयाबीन पेरणीसाठी प्रति एकरी ३० किलो बियाणे वापरण्याची शिफारस आहे.

म्हणजेच सोयाबीन : तूर (६:१) अशा आंतरपीक पद्धतीमध्ये प्रत्येक सातवी ओळ तुरीची येणार असल्याकारणाने सोयाबीनचे बियाण्याचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे. मात्र शेतकरी सोयाबीनचे ३० किलो आणि सातव्या तुरीच्या ओळीसाठी साधारणत: ५ ते ६ किलो तूर बियाणे वापरताना दिसतात.

Tur Varieties Selection
Tur Market News : तुरीवरील स्टाॅक लिमिटचे पालन करा, अन्यथा कडक करवाई!

वास्तविक साधारणत: २५ ते २६ किलो सोयाबीन आणि ३.५ ते ४ किलो तूर बियाणे वापरावयास हवे. सोयाबीनचे दोन झाडातील शिफारशीत अंतर फक्त ५ सेंमी असते, तर तूर पिकाचे दोन झाडातील शिफारशीत अंतर १५ ते २० सेंमी असते. म्हणजेच तूर पिकाचेही ३.५ ते ४.० किलो प्रति एकर वापरण्याऐवजी फक्त १.५० किलो प्रति एकर बियाणे पुरेसे होणार आहे.

खूप अधिक बिया पेरणी करून नंतर विरळणी करण्याचे काम वाढते. विरळणी न केल्यास दाटीमुळे सोयाबीन व तूर दोन्ही पिकांचे उत्पादन घटते. अशा परिस्थितीत पट्टापेर पद्धती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते.

पट्टापेर पद्धतीत सोयाबीन : तूर आंतरपिकाची पेरणी करताना ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणीयंत्राच्या मधल्या म्हणजेच चार नंबरच्या कप्प्यात तूर पिकाचे बियाणे घ्यावे. त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकी एका नळीचे छिद्र बंद करावे. म्हणजेच पेरणी यंत्राची अलीकडील बाजूने तिसरी नळी व पलीकडील बाजूची तिसरी नळी बंद होईल.

अलीकडील व पलीकडील प्रत्येकी दोन्ही कप्प्यात सोयाबीनचे बियाणे घेतल्यास जाते व येतेवेळी काठावरील सोयाबीनच्या दोन ओळींशेजारीच पुन्हा सोयाबीनच्या दोन ओळी येतात.

काठावरच्या ओळी वगळता पूर्ण शेतात ४ ओळी सोयाबीन – खाली ओळ – तूर पिकाची ओळ – खाली ओळ – ४ ओळी सोयाबीन अशा प्रकारे शेतात पट्टापेर पद्धतीने पेरणी होईल. तूर पिकाच्या आजूबाजूच्या खाली ठेवलेल्या ओळींच्या ठिकाणी डवरणीचे वेळी दांड अथवा सरी पाडून घेतल्यास तूर पीक वरंब्यावर व सोयाबीनचे पीक गादीवाफ्यावर येते. दोन्ही पिकांना दोन्ही बाजूने मोकळी जागा उपलब्ध होते. परिणामी दोन्ही पिकांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ शक्य होते.

१) लवकर येणारे वाण

(कालावधी १३५-१६० दिवस) एकेटी -८८११, आयसीपीएल-८७, पुसा -१६ (हिरव्या शेंगा विक्रीसाठी, सलग व दुबार पीक पद्धतीसाठी योग्य.)

२) मध्यम कालावधीचे वाण

(कालावधी १६०-२०० दिवस) पीडीकेव्ही आश्लेषा, पीडीकेव्ही -तारा, बीएसएमआर -७३६, बीएसएमआर -८५३, फुले राजेश्वरी, फुले विपुला, बीडीएन-७०८, बीडीएन-७११, बीडीएन-७१६ इ.

३) लांब कालावधीचे वाण (२०० दिवसांपेक्षा जास्त) (आंतरपीक पद्धतीसाठी योग्य.) सी-११, आयसीपीएल -८७११९, टीएटी-१० इ.

संपर्क - प्रा. जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७, (सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com