
Zilla Parishad Education : पुण्याजवळील गोऱ्हे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसोबत मी गेल्या पाच वर्षांपासून जोडला गेलो आहे. याचे कारण म्हणजे अजय वालगुडे सरांची तुरीय लॅब संकल्पना आणि रजनीकांत मेंढे सर.
आज सकाळी या शाळेतील मुलांना मी झाडांची रोपवाटिका कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक दाखवायला गेलो होतो. आम्ही सर्वांनी मिळून १२ प्रकारच्या देशी वृक्षांच्या 300 बियांची टोकण पिशवीमध्ये केली.त्यानंतर गप्पा झाल्या. तुरीय लॅब च्या बाहेर उभे असतात भिंतीवरील एका बॉक्सकडे माझे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते `हेल्प मी सर.` खाली मोबाइल नंबर देखील होता.
मला वाटले, की शाळेची विज्ञान लॅब असल्याने मुलांनी त्यांना पडलेले प्रश्न किंवा नवीन संकल्पना लिहून ते या बॉक्समध्ये टाकत असतील. त्यावर वर्गात शिक्षक उत्तरे देत असावेत. मी कुतूहलाने रजनी सरांना विचारले, सर, हा कुलूप बंद नवीन काळा बॉक्स कशाला लावला आहे? याचा उपयोग काय?
त्यांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे होते. ते म्हणाले- मी या ग्रामीण भागातील शाळेत शिकवतो. माझ्या वर्गात शेतकरी, शेत मजूर, कामगार, गाडी चालक, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला, छोटे फळ, भाज्या विक्रेते अशा विविध स्तरातील कुटुंबातील मुले, मुली आहेत. या मुलांच्या शिक्षणासाठी कायम लक्ष द्यावे लागते. कारण घरच्या लोकांना यांचा अभ्यास घेण्यास आणि शिकवण्यास वेळ नसतो.
काही पालक अभ्यास घेतात, पण बोटावर मोजण्या इतकेच... पण शिकवताना काही वेळा वर्गात असे दिसते की, या मुलांचे दिवसभर वर्गात लक्ष नसते, प्रचंड चलबिचल असतात, वर्गातील मुलांशी बोलत नाहीत, खेळत नाहीत की डबा देखील खात नाहीत. अशा मुलांना मी वर्गात जवळ बोलवून विचारतो, काय झाले?
शिकवतोय ते समजत नाही का? किंवा बरे वाटत नाही का? पण ही मुले, मुली उत्तर देत नाहीत.खाली मान घालून न बोलता परत जागेवर जाऊन बसतात. पण ही मुले किमान ,३,४ दिवस मानसिक ताणामध्ये असतात. माझ्याशी वर्गात बोलू शकत नाहीत.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर मग मला स्वतंत्र भेटून सांगतात की, सर... माझे वडील घरी नीट वागत नाहीत, आईवर घरकामाचा मोठा ताण आहे, घरातील कोणी तरी व्यसनाधीन आहे, वही, पुस्तक हरवले आहे, घरी अभ्यास होत नाही... अशी अनेक कारणे मला कळू लागली की जी, ही मुलं सगळं वर्गात सांगू शकत नाहीत.
यावर मी एक उपाय काढला तो म्हणजे "हेल्प मी सर" हा बॉक्स. आमच्या तुरीय लॅब बाहेरील भिंतीवर हा बॉक्स बसवला आहे, मुले, मुली त्यांना असलेल्या अडचणी या बॉक्समध्ये कोणाच्या न कळत लिहून टाकतात.
मी रोज शाळा सुटल्यावर हा बॉक्स उघडून त्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचतो, दुसरी दिवशी संबंधित मुलगा किंवा मुलीस लॅबमध्ये बोलवून नेमकी काय अडचण आहे ते विचारतो. एकटेच असल्याने ते मनमोकळे बोलतात. त्यानुसार मी त्यांच्या पालकांना घरी भेटून समजावून सांगतो. त्यामुळे मुलांच्या मनातील तणाव नाहीसा झाला आहे, हा माझा अनुभव आहे.
काही वेळा पालक देखील या बॉक्समध्ये मुलांच्या समस्येबाबत चिठ्ठी टाकतात किंवा मला फोन करतात. कळत नकळत त्या मुलांना मी समजावून सांगतो. दर आठवड्याला किमान एक चिठ्ठी मिळते. हळूहळू का होईना मुलांच्या समस्येवर उपाय सापडू लागला आहे.
खरं म्हणजे प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये `हेल्प मी सर` हा बॉक्स असला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नावर विश्वासाने उत्तर शोधणारे शिक्षक देखील. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये विश्वास निर्माण करायला रजनीकांत मेंढे सरांना पाच वर्षे जावी लागली. असे शिक्षक प्रत्येक शाळेत असतात, बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.