
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी (ता. १२) दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रविवारी (ता. ११) सायंकाळी नेवासा तालुक्यातील काही भागांत पाऊस झाला.
१४ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून वातावरणात बदल असून अधूनमधून पाऊस येत आहे. रविवारी सायंकाळी नेवासा तालुक्यातील मुळा नदी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
सोमवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाची रिपरिप सुरू होती. अवकाळी पावसाने भाजीपाला, फळे त्यातही प्रामुख्याने आंबा पिकाला फटका बसत आहे. काढणीला आलेली बाजरी, कांदा यांचे नुकसान होण्याचा संभव आहे. डाळिंब, संत्र्याची वादळामुळे फळगळती होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पुढचे चार दिवस पावसाचे आहे. जिल्ह्यासाठी यामुळे येलो अलर्ट दिला आहे.
अवकाळी पावसाच्या काळात मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटाच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीज वाहक भागांशी संपर्क टाळावा.
ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर राहावे. शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल या बाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी अथवा १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.