Maharashtra Rain : नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूवात

Maharashtra Rain Updates : हवामान विभागाच्या अंदाजानुसार नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवण विस्कळीत झाले असून अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : गुजरात किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर सकाळपासून नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवण विस्कळीत झाले असून पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. पावसामुळे फुलोऱ्यात असलेल्या पिकाना नव संजीवनी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असून इतर विभागांच्या तुलनेत पावसाचा जोर मराठवाड्यात कमी होता. त्यामुळे येथील धरणे संथ गतीने भरत होती. मात्र गुजरात किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे मराठवाड्यातही मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न काही अंश सुटणार आहे. तर मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

Rain
Maharashtra Rain Alert : विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

नांदेडमध्ये 'मुसळधारा'

हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून रविवारी (ता.१) पहाटेपासूनच नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. येथील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तेलंगणा आणि नांदेडचा संपर्क तुटला आहे. तेलंगणा सीमेवरच्या शिवणी ते अप्पारावपेठदरम्यान वाहणारे नाले, ओढे ओसंडून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर नद्या नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने शेतात पाणी शिरले आहे. यामुळे शेतीचे देखील नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर मुसळधार पावसामुळे येथील सहस्त्रकुंड धबधबा प्रवहीत झाला आहे.

हिंगोलीतही जोरदार पावसाला सुरुवात

हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. येथे मागील आठ ते दहा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. पण रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसह शेतीतील पिकांना पावसाचे पाणी मिळाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.

परभणीत वादळी वाऱ्यांचा पाऊस

हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यापासून परभणीच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसचे आगमन झाले आहे. पहाटेपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होत असल्याने परभणीतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले.

Rain
Maharashtra Rain Update : उद्यापासून पावसाचा जोर वाढणार; राज्यभरात शनिवारपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

यवतमाळ पुस नदीला पूर

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी (ता.३१) सायंकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे विदर्भ-मराठवाडा सीमेवरील महागाव तालुक्यातील धनोडा येथे पैनगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. तसेच पुसद येथील पुस नदीला पूर आला आहे. यामुळे यवतमाळ-माहूर, किनवट हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. तर संततधार पावसामुळे यवतमाळमधील पुसदच्या खंडाळा घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद झाला आहे.

जायकवाडी ८२ टक्के भरले

दरम्यान, मराठवाड्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण मागील दोन ते तीन आठवड्यापूर्वी ४० टक्क्याच्या आसपास होते. तर कमी अधीक प्रमाणात होणाऱ्या पावसासह नाशिक आणि अहमदनगरमध्ये चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणासाठी विसर्ग केला जात आहे. सध्या धरण ८२ टक्के भरले आहे. तर नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत ३४ टीएमसी आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून २१.६ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे करण्यात आला आहे. त्यामुळे आता धरणात ८२ टक्के पाणीसाठा झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बिंदुसरा धरण ओवरफ्लो

बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे आणि तलाव भरले आहे. तर यादरम्यान येथील बिंदुसरा धरण देखील भरले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून या धरणातील पाणीसाठी उणे झाला होता. यामुळे आजुबाजूच्या २० ते २५ गावांना पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागेल असे चित्र निर्माण झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे बिंदुसरा धरण पुर्णक्षमतेनं भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com