Mumbai News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने रविवारी (ता. १) मुंबईत जोरदार निदर्शने करत राज्यातील महायुती सरकारविरोधात रोष व्यक्त केला. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार संजय राऊत, आमदार अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, अतुल लोंढे याच्यासह अनेक खासदार, आमदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलनाची घोषणा केली होती. रविवारी सकाळी १० च्या सुमारास राज्यभरातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हुतात्मा चौकात दाखल झाले. मुंबई, कल्याण, ठाणे, उल्हासनगर आदी भागांतूही कार्यकर्ते आले.
या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठीही बंद करण्यात आला होता. सकाळी १० च्या सुमारास शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर हुतात्मा चौकातून नेते कार्यकर्त्यांसह गेट वे ऑफ इंडियाकडे मोर्चाने गेले. या वेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वेळी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘या सरकारने अनेक भ्रष्टाचार केले आहेत. महाराजांचा गेट वे ऑफ इंडियाजवळचा पुतळा मागील कित्येक वर्षांपासून उभा आहे. पण मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे या सरकारला घालवावे लागेल.’
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘छत्रपतींता पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, अशी माफी मान्य नाही. पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका.’
खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे, त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत.’
नाना पटोले म्हणाले, ‘भाजप सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही.’
जनता त्यांनाच चपलांनी मारेल : मुख्यमंत्री
महाराजांचा पुतळा कोसळला ही दु:खद घटना आहे. पण त्यावर राजकारण करू नये, असे सांगत, जनताच विरोधकांना चपलेने मारेल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा तोडण्यासाठी जेसीबी आणले. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. येत्या निवडणुकीत विरोधकांना जनता चपलेने मारेल, असेही ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.