Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा रविवारी (ता. २५) आयोजित आहे. तर याच परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी कृषी पदवीधरांसह स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. यासाठी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीन दिवसापासून पुण्यातील लाल बहादूरशास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावरून आता जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सरकारला गुरूवारी (ता.२२) निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य करा. अन्यथा मलाच आता आंदोलनात उतरावं लागेल असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला असून संयुक्त पूर्व परीक्षेत बदल होतो का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
कृषी विभागाच्या २५८ पदांचा आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत समावेश करावा, आयबीपीएस व एमपीएससीची एकत्रित आलेल्या तारखेमुळे संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष करत परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा गुरूवारचा तिसरा दिवस असून पवार यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सरकारला दिला आहे.
उद्यापर्यंत सरकारने भूमिका स्पष्ट करावी : शरद पवार
पवार यांनी याबाबत ट्विट करत, सरकारने विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे म्हटलं आहे. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा सारासार विचार सरकारने करावा. विचार करणं सरकारचं काम आहे. पण सत्ताधारी या विषयाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मला उतरावे लागेल. त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मैदानात उतरणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तर आता सरकार कोणता निर्णय घेणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
खा. सुळे यांची भेट; फडणवीस यांची माहिती
दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी बुधवारी जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करू असे म्हटले होते. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. फडणवीस यांनी, आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती दिली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक
पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर गुरूवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक ११ वाजत आहे. मात्र अद्याप या आंदोलनासंदर्भात आयोगाचा कोणताच निर्णय आलेला नाही. तर या बैठकीत आयोग परीक्षे संदर्भात नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.