डॉ.आर.सी.कुलकर्णी, डॉ.के.वाय.देशपांडे
Poultry Farming : सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे हवामान उष्ण प्रकारचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दरांनी विक्री होते. परंतू उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी, मांस उत्पादनात घट दिसून येते.
व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांचे सामान्य शरीर तापमान मूलतःच अधिक (१०३-१०७ अंश फॅरानाईट) असते.
कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यतचे तापमान सहन करू शकतात. त्यांच्या उत्पादनात फारसा फरक पडत नाही.
परंतु ३० अंश सेल्सिअसच्या वरती तापमान गेल्यास त्याचा त्यांच्या उत्पादन आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बाह्य तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास प्रति अंश सेल्सिअस तापमान वाढीने ५ टक्के उत्पादन घट होते.
महाराष्ट्राचा विचार करता विदर्भ व मराठवाड्यात उन्हाळ्यातील कमाल तापमान मागील काही वर्षात ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे.
कोंबड्या उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तोंडावाटे शरीरातील उष्णता बाहेर टाकतात यालाच धापणे (पॅंटिंग) म्हणतात. याचा विपरीत परिणाम वाढीवर, रोगप्रतिकार क्षमतेवर आणि उत्पादनावर होतो.
कोंबड्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन ४२ दिवस वय होऊनही १७०० ते १८०० ग्रॅम देखील होत नाही. अथवा विशेषतः मोठ्या कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक होते.
हे संभावित नुकसान टाळण्यासाठी व कोंबड्यांची अक्षम शरीर तापमान नियंत्रण प्रणाली विचारात घेता विशेष लक्ष देऊन कोंबड्यांची काळजी घेणे गरजेचे ठरते.
उष्माघाताची लक्षणे:
१)श्वास तोंडावाटे घेतात,
२) पाणी जास्त पितात. भूक मंदावते
३) तोंडाची उघडझाप करून धापा टाकतात.
४) पोट जमिनीला घासतात, डोळे बंद करतात.
५) हालचाल मंदावते, सुस्त राहतात.
६) अंडी उत्पादनात घट होते, अंडयाचे वजन कमी होते.
७) अंडयाच्या बाहेरील कवचाची गुणवत्ता कमी होते.
८) शारीरिक वजनात लक्षणीय घट होते.
९) मांसल कोंबडयांचे वजन कमी होते.
१०) प्रजोत्पादन यावर उष्णतेचा विपरीत परिणाम होतो.
११) रोगप्रतिकार शक्तीही कमी होते, त्यामुळे आजारास बळी पडतात.
१२) खाद्याचे मांसात वा अंड्यात रूपांतर क्षमता कमी होते.
१३) कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात. काही कोंबड्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकवून बसतात.
१४) शरीराचे तापमान कमी करण्यासाठी व शरीरात थंडपणा आणण्यासाठी पंख शरीरापासून दूर पसरवितात.
त्वचा रखरखीत होते, रंगामध्ये बदल दिसून येतो.
१५) दीड किलो पेक्षा अधिक वजनाच्या कोंबड्यांना दुपार ते संध्याकाळच्या वेळी ताप येतो. लालसर होऊन मरतात.
उपाययोजना
१) शेड बांधताना घराची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी. वायुवीजन
व्यवस्था सक्षम असावी.
२) उन्हाळ्यात गादीसाठी लाकूड भुश्याऐवजी भाताचे तूस किंवा भुईमूग टरफलांचा वापर करावा.
३) गादी म्हणून वापरात येणाऱ्या तूसाची जाडी कमी (१ ते १.५ इंच) करावी.
४) कोंबड्यांची संख्या किमान १० टक्क्यांनी कमी करावी.
५) थंड, स्वच्छ, ताजे पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे.
६) पिण्याच्या पाण्याची भांडी संख्या दुप्पटी पर्यंत वाढवावी.
७) क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करावा. यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील.
८) पिण्याच्या पाण्यामधून जीवनसत्व (क, ई), सेलेनीअम यांचा वापर करावा. त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होईल.
९) पिण्याचे पाणी पुरवणारी टाकी शेडमध्ये विशिष्ट उंचीवर बसवावी. बाहेरच्या बाजूस बसवली असेल तर त्यास बारदानाची पोती गुंडाळून त्यावर थंड पाणी टाकावे, जेणेकरून आतमधील पाणी थंड राहण्यास मदत होईल.
१०) टाकीतून भांड्यांपर्यंत जाणारी पाइपलाइन देखील शेडच्या आतमधूनच असावी, जेणेकरून भांड्यात पोहोचणारे पाणी थंड राहते.
११) ब्रॉयलर कोंबडीच्या खाद्यात मुख्य ऊर्जा स्रोत म्हणून वनस्पती तेलाचा ४ ते ५ टक्के या प्रमाणात वापर करावा.
१२) अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा वापरावा.
१३) अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्य भांड्यात टाकलेल्या खाद्य पृष्ठभाग यावरती शिंपले अथवा मार्बलचे तुकडे थोड्या प्रमाणात पसरावेत.
१४) शेडमधील कामे सकाळी पूर्ण करावीत. दुपारच्या वेळेत कोणतीही कामे करू नयेत जेणेकरून त्याचा ताण कोंबड्यांवर पडणार नाही.
१५) छतावर स्प्रिंकलर्स आणि शेडमध्ये फॉगर्स बसवावेत. स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स यांचा वापर हा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान दर १ ते २ तासांनी करावा.
१६) लसीकरण सकाळी ८ च्या अगोदर अथवा संध्याकाळी ७ नंतर करावे.
१७) खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
१८) वजन १.५ किलो च्या आसपास झाल्यावर त्यांना दुपारच्या (११ ते ५) वेळेत खाद्य देऊ नये त्याकरिता खाद्य भांडी वरती करून ठेवावीत.
१९) खाद्य दिल्यानंतर साधारणतः अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे त्यांच्यावरील उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचे खाद्य देणे टाळावे.
२०) शेडमध्ये बल्ब किंवा ट्यूबलाइट्स रात्री १ ते २ तासापर्यंत लावून कोंबड्यांना थंड वातावरणात खाद्य खाण्यास प्रोत्साहित करावे.
२१) शेड सभोवताली उंच व सरळ जाणारी झाडे (उदा. अशोक) लावावीत.
२२) बाजुभिंतीच्या जाळीवरती बारदान पोती लावावीत. त्यावर स्प्रिंकलर्सचे पाणी पडेल याची सोय करावी.
शेड नेटचा वापर करता येतो.
२३) शेडमध्ये कुलर किंवा पंखा याचा वापर करणेही योग्य राहते, परंतु कुलर मध्ये संपूर्ण दुपारभर पाणी आहे हे वेळोवेळी निश्चित करावे. तसेच कुलरमुळे निर्माण होणाऱ्या अधिकच्या आर्द्रतेचे वायुवीजन योग्य रीतीने होईल हे निश्चित करावे.
२४) शेडच्या छतावर वेलवर्गीय भाजीपाला जसे की, दोडके, कारले यांचे वेल सोडल्याने नैसर्गिक आच्छादन तयार होते.
२५) छतावर सूर्यप्रकाश परावर्तित करणाऱ्या पत्र्यांचा वापर करावा जेणेकरून शेडच्या आतील तापमान कमी राखण्यास अधिक मदत होते.
संपर्क - डॉ. कुलदीप देशपांडे,८००७८६०६७२
( विभाग प्रमुख, पशु पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
डॉ.आर.सी.कुलकर्णी ७७७६८७१८००
(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.