कृष्णा काळे, डॉ. सचिन शेळके
Health Benefits of Watermelon : उन्हाळी हंगामात नदीपात्रात तसेच बागायती पीक म्हणून कलिंगडाची मोठी लागवड होते. पूर्वी कोणत्याही पिकात आंतरपीक म्हणून किंवा नदीपात्रात, तलावात गाळपेर म्हणून कलिंगडाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन मुख्य पीक कलिंगड लागवड वाढली आहे.
कलिंगड हे मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक फळ आहे. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होणारी दाहकता कमी करण्यासाठी कलिंगड फळ आवडीने खाले जाते. कलिंगड सेवनामुळे शीतलता मिळते, थकवा दूर होतो. कलिंगडामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच जीवनसत्त्व अ, ब, क मुबलक प्रमाणात असतात. कलिंगड फळामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर ठरते. याशिवाय वजन नियंत्रित राखण्यासाठी देखील कलिंगड सेवन फायदेशीर ठरते.
कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असतात. कलिंगडाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. याशिवाय कलिंगडापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात.
कलिंगडातील पोषक घटक (प्रति १०० ग्रॅम) (टक्के)
पाणी -९३
शर्करा पदार्थ - ३.३
प्रथिने – २.०
तंतुमय पदार्थ - ०.२
खनिजे - १.३
कॅल्शिअम - ०.१
लोह - ०.८
जीवनसत्त्व ‘अ’ -११
जीवनसत्त्व ‘क’ - १३
जीवनसत्त्व ‘ब’ -१०
जीवनसत्त्व ‘ई’ - ७
आरोग्यादायी फायदे
कलिंगडामध्ये जीवनसत्त्व क आणि अ मुबलक प्रमाणात असते. या जीवनसत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले असते.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कलिंगड सेवन फायदेशीर ठरते.
मूतखड्याचा त्रास असेल तर कलिंगड अवश्य खावे. कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे किडनी साफ होण्यास मदत होऊन किडनीचे विकार कमी होतात.
कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अॅन्टिऑक्सिडेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.
वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा नियमित आहारात जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र कलिंगड खाल्यानंतर अधिक काळापर्यंत पोट भरल्याचा भावना निर्माण होते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
कलिंगड फळाच्या फोडी किंवा ताजा रस पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. रक्तवाहिन्यातील ताण कमी होतो. जास्त कष्टदायक काम केल्यानंतर स्नायूंमध्ये आलेला ताण कमी होण्यास मदत होते.
पोटाचे विकार कमी होतात. पोट साफ होण्यास मदत होते.
चेहऱ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कलिंगडाची साल उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्यामुळे चेहरा ताजातवाणा दिसतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे शरीराची तसेच डोळ्यांची, तळपायांची आग होते. अशावेळी कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. काही वेळातच आराम मिळतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.