व्ही. आर. चव्हाण, डॉ. एन. आर. चव्हाण
Health Benefits of Tamarind : चिंचपाला, चिंचफळ, चिंचोके आणि चिंचसालीचे अनेक औषधी उपयोग आहेत. चिंच ही आयुर्वेद व औषधी प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. शरीर थंड ठेवणारा घटक व औषधी घटक म्हणून चिंचेला मागणी आहे.
चिंचेच्या फळांच्या लगद्याचा उपयोग पाचन, पित्त विकारांवर उपाय म्हणून, उन्हाची झळ, धोत्र्याच्या फुलाची विषबाधा कमी करण्यासाठी केला जातो. चिंचेचे पेय जगभरात लोकप्रिय आहे. चटणी, लोणचे, केचअप, सॉस, आइस्क्रीम, सरबत आणि लोणच्यामध्ये चिंचेचा लगदा महत्त्वाचा घटक आहे.
उपयोग :
१) चिंच फळापासून उत्तम चटणी, सॉस व सरबत बनवतात. युरोप, अमेरिकेत चिंचेतील आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात. कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यासाठी चिंच पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यपदार्थांमध्ये चिंचेचा वापर करण्यात येतो. अनेक औषधात चिंचेचा वापर केला जातो. चिंचेची पावडर गोळ्या, बिस्किटे व चॉकलेटमध्ये वापरतात.
२) चिंचोका बहुगुणी आहे. त्यात पेक्टिन द्रव्य असते. त्याचा जेली व मुरांबा तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. चिंचोक्यात पेक्टिन बरोबरच स्टार्च व टॅनिन असते. काही आदिवासी चिंचोक्याच्या पिठाची भाकरी करून खातात. तसेच पिठाची खळ बनवितात. चिंचोके भाजून किंवा उकडून खातात.
३) लोकर व रेशीम, इतर धाग्याचे कापड विणताना चिंचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. घोंगड्यांना खळ देण्यासाठी चिंचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो.
४) चिंचोके भाजून त्यापासून केलेल्या पिठाचा वापर ब्रेड, बिस्किटामध्ये केला जातो. चिंचोक्याचा वापर स्टार्चनिर्मितीसाठी करतात. स्टार्चचा वापर सुती कापड व घोंगड्यांना कडकपणा आणण्यासाठी केला जातो. कातडी कमावण्याच्या उद्योगात चिंचोक्याच्या काळपट - तांबडसर टरफलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
५) जनावरांच्या खाद्यामध्ये चिंचोक्याच्या पिठाचा वापर करतात. चिंचेचा पाला जनावरे आवडीने खातात.
औषधी गुणधर्म :
१) गर रोचक, दाहशामक आहे. लघवीच्या विकारावर उपयुक्त आहे.
२) लचक - मुरगळा, व्रण बरा होण्यासाठी चिंचपाला ठेचून बांधतात. चिंच पाला सारक, रुचकर असतो.
३) टार्टिरिक अॅसिड आणि क्षारादी औषधी गुणधर्म असतात. पाळीव जनावरांची पचनक्रिया बिघडली असताना
चिंचपाला व लिंबपाला मिश्रित चारा खाऊ घालतात.
४) पोटात कळा येत असतील, पातळ जुलाब होत असतील तर भाताच्या पेजेत चिंचपाला वाटून ते मिश्रण औषधासारखे घेतले जाते. याने अतिसार थांबतात.
५) चिंच नेत्रविकारावर उपयुक्त आहे.
६) भाजलेल्या चिंचोक्याची टरफले काढून सुपारीसारखे चूर्ण किंवा तुकडे, भाजलेल्या खारकांचे तुकडे तसेच मीठ व लिंबयुक्त ओवा टाकतात. ही सुपारी चवदार व पाचक असते. चिंचोके वातहरक, रक्त दोषनिवारक व कफनाशक असतात.
७) चिंचोके कुटून व यंत्रदाबाने चिंचोक्याचे तेल काढतात. ते शक्तिवर्धक असते.
चिंच गर :
१) चिंच फळे पाण्यात ५ मिनिटे उकळून घ्यावीत. लाकडी चमच्याने
हलवावीत. यामुळे चिंच फळे नरम होऊन चिंचोके त्वरित बाहेर काढता येतात किंवा गर आणि चिंचोके वेगळे करण्यासाठी पल्प वेगळा करण्याच्या यंत्राचा उपयोग करावा.
२) गर उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा १०-१२ मिनिटे गरम करून घ्यावा. त्यामुळे गर घट्ट स्वरूपात तयार होतो. गर गरम असताना पोटॅशिअम मेटा बाय सल्फेट संरक्षक १०० मि.ग्रॅम प्रति एक किलो गर या प्रमाणात मिसळून घ्यावे.
३) निर्जंतुक केलेल्या प्लास्टिक भरणीमध्ये तयार झालेली गर भरून झाकण लावून सीलबंद करावे. हा गर घरगुती आहारात वापरण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो.
संपर्क : व्ही. आर. चव्हाण, ९४०४३२२६२३
(एमजीएम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.