Tamarind Production
Tamarind ProductionAgrowon

पाचशे झाडांची फुलविली समृद्ध चिंचबाग

वडाळा (जि. सोलापूर) येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी विजयकुमार फंड यांनी सुमारे पाच एकरांत कोइमतूर वाण असलेल्या चिंचेच्या पाचशे झाडांची बाग विकसित केली आहे. अवर्षणग्रस्त भागासाठी अनुकूल तसेच श्रम, खर्च, पाणी यांच्यात बचत करून भरवशाचे उत्पन्न देऊ शकणारे हे पीक असल्याचे फंड सांगतात. सोबत मिलिया डुबिया, सागवान, निलगिरी आदींच्या लागवडीतून वनशेतीलाच त्यांनी प्रमुख स्थान दिले आहे.
Published on

सोलापूर- बार्शी महामार्गावर सोलापूरपासून २५ किलोमीटरवर वडाळा येथे तुळजापूर रस्त्यावर विजयकुमार फंड यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. ‘रेल्वे’ विभागातून इलेक्ट्रिशियन म्हणून सात- आठ महिन्यांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. नोकरीत असतानाही शेतीची आवड त्यांनी जपली. शेतीची नाळ कधी तुटू दिली नाही. सेवानिवृत्तीनंतर पूर्णपणे शेतीत रममाण होताना सुमारे पाच एकरांत चिंच (Tamarind) आणि पाच एकरांत मिलिया डुबियाची (मलबार निम) लागवड त्यांनी केली. (Tamarind Farming)

चिंच लागवडीची प्रेरणा

फंड यांची शेती हलकी व मध्यम आहे. या भागात पाऊस तसा फार कमी पडतो. विहीर हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. केवळ ज्वारी, गहू अशी पिके ते घेत. रेल्वेत वातानुकूलित डब्याशी संबंधितच नोकरी असल्याने परराज्यांत सतत जाणे-येणे होई. यात पद्धतीने कोइमतूर भागातील चिंचेची शेती त्यांच्या पाण्यात आली. उत्पादन, आयुष्यमान, खर्च अशी सर्व माहिती घेताना हे पीक आपल्या भागासाठी योग्य असल्याची खात्री झाली. तेथील रोपवाटिका व विद्यापीठातून पीकेएम-१ वाणाची ५० रोपे आणली आणि लागवडही केली. थोडे थोडे भांडवल व त्यानुसार ५०, २५० अशी टप्प्याटप्प्याने त्यांनी लागवड वाढवली. आज त्यांच्याकडे एकूण सुमारे पाचशे झाडांची चिंचेची बाग विकसित झाली आहे. त्यातील जुनी झाडे सहा वर्षांची झाली आहेत.

चिंच बाग वैशिष्ट्ये

-पीकेएम-१ (कोइमतूर) वाणाची चिंच चवीला आंबटगोड, लांबट आणि भरपूर गर असणारी आहे.
-काही झाडांचे अंतर २४ बाय २४, काहींचे २२ बाय २२ फूट आहे.
-साधारण ऑक्टोबरमध्ये फळधारणा, फेब्रुवारी-मार्चमध्ये चिंचा काढणीस येतात.
-मेच्या पहिल्या पंधरवड्यात झाडांची झोडणी होते. या दरम्यान दररोज तीन ते चार तास ड्रीपद्वारे पाणी दिले जाते.
-या पिकाला खते, पाणी, कीडनाशके यांची गरज तुलनेने कमी असते.

चिंचेची विक्री

दोन वर्षांपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. चिंचेसाठी बार्शी, सोलापूर हे मार्केट आहे. पण अनेकदा एकाचवेळी झाडे फुलोऱ्यात येत नाहीत. उत्पादन मागे-पुढे होते. त्यामुळे झाडे पाहून चिंचेचा सौदा केला जातो. कधी झाडावरील चिंच पाहून तर कधी उत्पादनाच्या अंदाजाने व्यवहार होतो. काढणी, पॅकिंग, वाहतूक हे खर्च व्यापारीच करतो. त्यामुळे त्यावरील खर्च वाचतो. श्रम, खर्च आणि वेळेचा विचार करता मागील वर्षी साडेचार ते पाच क्विंटल तर यंदा साडे आठ क्विंटल उत्पादन मिळाले.

गेल्या दोन ते तीन वर्षांत किलोला ३० ते ५० रुपये दर मिळाला. झाडांची वाढ व वय वाढेल तसे उत्पादन व उत्पन्नात वाढ होत जाईल. फंड सांगतात की एकेवर्षी उन्हाळ्यात ऐन संवेदनशील अवस्थेत झाडे असताना लाखाचे पाणी आणून बाग जगविली आहे. त्यामुळे चिचेंच्या प्रत्येक झाडाचे माझ्यासाठी वेगळे महत्व आहे.

मिलिया डुबियाची लागवड

चिंचेप्रमाणेच मिलिया डुबिया झाडांचीही माहिती कर्नाटकातील रेल्वेप्रवासात मिळाली.
त्याचाही अभ्यास व अर्थकारण तपासून लागवड केली आहेत. त्याची सुमारे एक हजार झाडे आहेत. मुख्यतः बुडापासून कापून लाकूड म्हणून विक्री होते. प्लायवूड, काडेपेटी, चहाची खोकी, वह्यांच्या बायंडिंगसाठी लागणाऱ्या पुठ्ठ्याची निर्मिती या झाडापासून होते. या झाडाला शक्यतो कीड लागत नाही. जनावरेही कात नाहीत. लाकडापासून दरवाजे व खिडक्याही बनविल्या जाऊ शकतात.

विक्री व्यवस्था

फंड सांगतात की लागवडीनंतर सात वर्षांनी मिलिया डुबिया खऱ्या अर्थाने व्यावसायिक
उत्पादन देण्यास समर्थ होतो. त्याचा ३१ इंचांपर्यंत घेर झाल्यानंतर व्यापारी कापणीसाठी येतात. लागवड करून चार वर्षे झाली आहेत. प्रत्यक्ष विक्रीसाठी अजून तीन वर्षे थांबावे लागणार आहे. थेट बाजारपेठेत विक्री करता येते. मात्र वाहतूक व अन्य खर्चाचा विचार करता ते आवाक्यात असेलच असे नाही. आमच्या गावात एकाने व्यापाऱ्याला विक्री केल्याचे उदाहरण फंड देतात. त्यांनी खासगी कंपनीसोबत विक्रीचा करार केला आहे. पण त्यांच्याशी व्यवहाराचे बंधन नाही. प्रति झाड एक टन लाकूड मिळू शकते. त्यानुसार प्रति झाडाची किंमत सात ते दहा हजार रुपयांच्या आसपास होऊ शकते असा अंदाज आहे.

वनशेती जपली

आपल्या दहा एकरांत फंड यांनी जवळपास सर्वच वनशेती केली आहे. निलगिरीची ५० तर सागवानाची पाचशेपर्यंत झाडे त्यांच्याकडे आहेत. शिवाय नारळ, जांभूळ आहेत. चिंच व मिलिया डुबिया ही दीर्घकालीन पिके आहेत. त्यांचा देखभाल खर्च फार काही वाढणार नाही, उलट नफा मात्र वाढत जाऊ शकतो. सुरुवातीच्या काळात कोंबडीखत, सेंद्रिय तसेच काही रासायनिक खते द्यावी लागली. पत्नी सौ. हेमलता यांची शेतीत मदत होते. मुलगा इंद्र आणि मुलगी संजना ‘बीटेक’ पदवीचे शिक्षण घेत आहेत.

संपर्क ः विजयकुमार फंड, ९७६७७१६२२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com