World Egg Day 2023 : निरोगी आरोग्यासाठी अंडी फायदेशीर...

International World Egg Day 2023 : अंडी सूक्ष्म पोषक द्रव्ये आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी अंड्याचा वापर करता येतो.
International Egg Day
International Egg DayAgrowon
Published on
Updated on

डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. अविनाश कदम

आज जागतिक अंडी दिन

Benefits of Consuming Eggs : अंडी सूक्ष्म पोषक द्रव्ये आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी अंड्याचा वापर करता येतो. आजारातून बऱ्या झालेल्या व अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया तसेच वयात येणारी मुले, मुली यांच्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा नियमित वापर केल्यास फायदेशीर ठरते.

या वर्षीच्या जागतिक अंडी दिनाचे घोषवाक्य आहे ‘निरोगी भविष्यासाठी अंडी’. अंड्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. प्राणिजन्य प्रथिनांमध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि ज्यामध्ये उत्तम प्रतीची मानवाच्या आहारात आवश्यक असलेली सर्व अमिनो आम्ले भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणारा स्रोत म्हणजे अंडी.

तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात प्रति व्यक्ती किमान १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळतात.

अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रथिने असतात. अंड्यांच्या प्रथिनांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की फॉस्विटिन, ओहोफेरिन आणि ओव्हलब्युमिन असतात. ही प्रथिने स्कॅव्हेंजिंग फ्री रॅडिकलला बांधून लिपिड ऑक्सिडेशन रोखू शकतात. अंडी अँटीऑक्सिडंटचा संभाव्य नैसर्गिक स्रोत म्हणून वापरली जाऊ शकतात, जी अन्न किंवा सौंदर्यप्रसाधने उद्योगात पुढे वापरता येतात.

अंड्यातील प्रथिने पचनास सुलभ असल्याने ती पूर्णपणे शरीरात शोषली जातात. आपले शरीर या प्रथिनांचा पूर्णपणे वापर करू शकते. शरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः बनवून शकणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ल अंड्यामध्ये आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने अत्युच्च दर्जाची असतात. इतर कोणत्याही प्रथिनयुक्त अन्नाचा दर्जा ठरविण्यासाठी अंड्यातील प्रथिने मानक म्हणून वापरली जातात.


अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये मुबलक असणारे अल्बमिन नावाचे प्रथिन पेशींची निर्मिती आणि वाढीसाठी गरजेचे असते. अंड्यातील प्रथिने पचनास हलकी असतात. स्नायूंचे बळ वाढवण्यासाठी अंड्यातील प्रथिने आवश्यक असतात.

अंड्याच्या पांढऱ्या भागात रिबॉफ्लाविन म्हणजेच जीवनसत्त्व ब २ भरपूर प्रमाणात आढळून येते. आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये, पेशींच्या निर्मितीमध्ये आणि शरीरामध्ये घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये हे जीवनसत्त्व महत्त्वाचे असते.

International Egg Day
Egg Diet : रोज अंडी खा, निरोगी राहा

अंड्यातील आरोग्यदायी घटक ः
अंड्यातील पिवळ्या बलकाबाबत अनेक गैरसमज आहेत. जसे की, बलकाचे सेवन हृदयासाठी वाईट असते, बलकामुळे ॲलर्जी येऊ शकते, कोलेस्ट्रॉल वाढू शकते इत्यादी. हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.

१) पिवळ्या बलकामधून भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वे मिळतात. अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रथिनांचा साठा वगळल्यास अन्य सर्व पोषकद्रव्ये पिवळ्या बलकामध्ये असतात.

२) अंड्यातील जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्‍यक असतात. बलकामध्ये समाविष्ट असलेली जीवनसत्त्वे अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करतात.

३) बलकामध्ये असलेले लोह शरीरात पूर्णतः वापरले जाते. बलकातील कोलीन द्रव्य मेंदूच्या वाढीमध्ये मदत करते. त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारते.

४) आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी बलकाची मदत होते. अंड्यामध्ये असणारे अ जीवनसत्त्व आणि कॅरोटेनोइड पिगमेंट दृष्टीसाठी उपयुक्त ठरते.

(ॲग्रो विशेष)

International Egg Day
International Peanut Day 2023 : स्वयंपाकात रोज शेंगदाणे वापरणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य

५) ड जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम खनिज हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत किंवा ठिसूळ होतात.

६) पिवळ्या बलकामध्ये आढळणारे लुटीन आणि जीयाझेनथीन नावाची कॅरोटेनोईड पिगमेंट डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

७) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्त्व-अ, जीवनसत्त्व ब-१२ आणि सेलेनियम फायदेशीर आहे. अंड्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला उत्तेजन देतात.

८) अंडे ओमेगा ३ फॅटी आम्लाचा प्रमुख स्रोत आहे. हे आम्ल मेंदूचे कार्य आणि दृष्टी राखण्यास मदत करते. मासे न खाणाऱ्या लोकांसाठी अंडी ओमेगा-३ फॅटी आम्लाचा मुख्य स्रोत आहे.

९) अंड्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. तेलकट त्वचेपासून कोरड्या त्वचेपर्यंत सर्व प्रकारच्या त्वचेवर अंड्याचा चांगला परिणाम दिसून येतो. अंड्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. अंड्यामधील फॅटी अॅसिडमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचेतील सैलपणा कमी होतो. म्हणून अंड्याला एंटी एजिंगसाठी वापरले जाते.

१०) अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

११) अंड्यांमध्ये सेलेनियम, तसेच जीवनसत्त्वे अ, ब आणि के असतात. अंड्यांमध्ये अमिनो आम्ल आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात जे रुग्णांना विषाणूचा सामना करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यास मदत करते.

(ॲनिमल केअर)

अंड्यातील घटक ः
१) आहारात पालेभाज्या, दूध यांच्या वापराबरोबरीने अंडे आवश्यक आहे.

२) एका अंड्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची ६.३ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामध्ये आपल्या शरीरास अत्यावश्यक असणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ले उपलब्ध होतात.

३) अंड्यामध्ये ५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ०.६ ग्रॅम पिष्टमय पदार्थ, १० प्रकारची जीवनसत्वे, ११ प्रकारची खनिजे उपलब्ध होतात. तसेच एका अंड्यामधून ७५ ते ८० कॅलरी ऊर्जा प्राप्त होते.

१) एक संकरित कोंबडी वर्षाला ३२० ते ३३० अंडी देते.

२) अंडी देणारी कोंबडी दररोज सरासरी ११० ग्रॅम खाद्य खाते.

३) एक अंडे तयार होण्यासाठी २४ ते २६ तास लागतात.

४) आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही भारतातील सर्वांत जास्त अंडी उत्पादक राज्ये आहेत तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे.

५) साधारणतः १९५०-५१ मध्ये प्रति व्यक्ती पाच अंड्यांची उपलब्धता होती, जी २०२१-२२ मध्ये ९५ पर्यंत वाढली आहे.

६) जागतिक स्तरावर अंडी उत्पादनात चीन प्रथम क्रमांक, अमेरिका द्वितीय क्रमांक आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
----------------------------------------
संपर्क ः डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२
(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com