Fusarium Fungus Smuggling: हानिकारक, विषारी बुरशीची अमेरिकेत तस्करी
Detroit News: पिकांमध्ये गंभीर रोगांचा प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या व मानवी आरोग्यालाही बाधा पोहोचविणाऱ्या विषारी बुरशीची चीनहून अमेरिकेत तस्करी केल्याप्रकरणी दोन चिनी संशोधक विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (एफबीआय- फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अटक केली आहे. युवा संशोधिका जियान युनक्विंग (वय ३३) आणि तिचा मित्र झुनयोंग लियू (वय ३४) अशी या दोघांची नावे आहेत.
दरम्यान, अमेरिकेची कृषी अर्थव्यवस्था व मानवी आरोग्याला धोका उत्पन्न करणाऱ्या कोणत्याही जैविक धोक्यापासून अमेरिकी जनतेचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ‘एफबीआय’ने म्हटले आहे.
अमेरिकेच्या ‘एफबीआय’ विभागाच्या डेट्रॉईट शाखेने जिआन व तिचा मित्र लियू या दोघांना अटक केली आहे. दाखल झालेल्या फौजदारी तक्रारीनुसार कट रचणे, अमेरिकेत धोकादायक घटकांची तस्करी करणे, दिशाभूल वा असत्य विधाने करणे आणि व्हिसा संबंधी फसवणूक करणे असे आरोप अमेरिकेतील वकील (ॲटर्नी) जिरोम गॉर्गन या दोघांवर ठेवले आहेत. फ्युझारियम ग्रॅमिनिअरम या प्रजातीच्या हानिकारक बुरशीची चीनवरून अमेरिकेत तस्करी केल्याचा आरोप जियान आणि लियू यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
संबंधित बुरशी गहू, बार्ली, मका व भात आदी पिकांमध्ये ‘हेड ब्लाइट’ या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे दरवर्षी पिकांचे जगभरात अब्जावधी डॉलर्स एवढ्या प्रचंड प्रमाणात नुकसान होते. ही बुरशी विषारी असल्याने तिच्या विषारी घटकांच्या संपर्कात आल्याने मानव व जनावरांमध्ये उलटी होणे, यकृताला हानी पोहोचणे व पुनरुत्पादनात बिघाड निर्माण होणे अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
दहशतवादी अस्त्रासारखा वापर
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, जियान या विद्यार्थिनीला संबंधित फ्युजारियम या रोगकारक बुरशीच्या संशोधन कार्यासाठी चीन सरकारकडून निधी देऊ करण्यात आला आहे. जियान एका चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. लियू हा विद्यार्थी देखील चीनमधील विद्यापीठात याच फ्युजारियम बुरशीवर संशोधन करीत असून तो जियानचा मित्र आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला आपला तस्करीशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. परंतु सखोल चौकशीअंती चीनहून डेट्रॉइट विमानतळामार्गे जिआन संशोधन करीत असलेल्या मिशिगन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेपर्यंत ही बुरशी पोहोचविल्याचे त्याने कबूल केले.
ॲटर्नी गॉर्गन या संदर्भात म्हणाले, की या चिनी विद्यार्थ्यांनी केलेल्या दुष्कृत्यात त्या देशातील कम्युनिस्ट पक्षाच्या निष्ठावंत सदस्याचा देखील समावेश आहे. अत्यंत गंभीर असे हे प्रकरण आहे. ही तस्करी म्हणजे कृषी संबंधित प्रभावी दहशतवादी शस्त्राचा वापर होऊन अमेरिकेच्या सार्वजनिक सुरक्षेलाच धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपल्या कार्याला पुढील रूप देण्याच्या दृष्टीने मिशिगन विद्यापीठाची प्रयोगशाळा व त्यातील सुविधांचा वापर या विद्यार्थ्यांना करायचा होता हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध
अमेरिकेच्या सीमा संरक्षण कृती कार्यालय तसेच एफबीआय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही घटना वेळीच उघडकीस येण्यास यश आले आहे. अमेरिकेच्या ‘कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन’चे संचालक मार्टी सी. रेबॉन या संदर्भात म्हणाले, की देशाची कृषी अर्थव्यवस्था व मानवा आरोग्याला हानी पोचवू शकणाऱ्या कोणत्याही जैविक धोक्यांपासून अमेरिकी जनतेला संरक्षण देण्यात अमेरिकेच्या सर्व संरक्षण विभागांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
ज्यावेळी एखाद्या प्रमुख विद्यापीठातील संशोधक देशाच्या सुरक्षेला जैविक धोका उत्पन्न होईल अशा कृत्यात सहभागी असतो त्यावेळी मिशिगन राज्यच नव्हे तर संपूर्ण अमेरिकी जनतेचेच संरक्षण करण्यासाठी अमेरिकी तपास यंत्रणा कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.