
Climate Resilient Farming : गेल्या काही वर्षांमध्ये वातावरण बदलाचे फटके शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. कधी पाऊस अधिक पडतो, तर कधी तो रुसून बसतो. पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याच्या कमतरतेचा ताण, तर अतिपावसाच्या स्थितीमध्ये शेतामध्ये पाणी साचण्यामुळे होणारा ताण पिकांवर विपरीत परिणाम करतो. पीक कोणतेही असो, त्याच्या तग धरण्यासाठी कमी पावसाच्या स्थितीमध्ये जमिनीतील ओलावा टिकवण्याची आवश्यकता असते.
तर अतिपावसाच्या स्थितीमध्ये पाण्याचे योग्य पद्धतीने निचरा करण्याची किंवा पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनाची गरज असते. बहुतांश शेतकरी याबाबत तितके जागरूक नसल्याने किंवा त्यासाठीचे तंत्रज्ञान अपुरे असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा स्थितीमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते.
या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील संशोधक गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांनी एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (RIFS) अंतर्गत विस्तार कार्यक्रमामध्ये रुंद वरंबा सरी (BBF) तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रात्यक्षिकांचे आयोजन शेतकऱ्यांच्या शेतावर केले होते. गतवर्षी राबवलेल्या या कार्यक्रमांतून अनेक यशकथा निर्माण झाल्या.
...असे आहे बीबीएफ आधारित सुधारित तंत्रज्ञान
मध्यम काळ्या जमिनीची निवड करावी.
एक नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
रायझोबियम, ट्रायकोडर्मा आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांचे मिश्रण असलेले जैविक द्रावणाची (पीडीकेव्ही बायोकॉन्सर्सिया) यांची सोयाबीन बियाण्यांवर प्रक्रिया करावी.
बीबीएफ यंत्राच्या साह्याने मूग, उडीद, ज्वारी, मका, भुईमूग, कपाशी अशा तासामधील अंतर ४५ सेंमी असलेल्या सर्व पिकांची पेरणी करणे शक्य आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी ४५ × १० सें.मी. अंतरावर ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राद्वारे करता येते.
पेरणी करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन संशोधित पीडीकेव्ही - अंबा (एएमएस-१००-३९), पीडीकेव्ही - सुवर्ण (सोया एएमएस-एमबी ५-१८), पीडीकेव्ही - यलो गोल्ड (एएमएस-१००१) या वाणांचा वापर करावा.
विशिष्ट कोनात असलेल्या बीज प्लेटच्या साह्याने बियाण्यांची पेरणी केली जाते. त्याच वेळी बियांच्या थोड्या अधिक खोलीवर खतेही देता येतात.
त्याच वेळी रिजच्या साह्याने रुंद वरंबा व सरी निर्माण होते.
बीबीएफ तंत्राचे फायदे
जास्त पाऊस असल्यास : सरींमधून अतिरिक्त पाणी वाहून जाते, त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो.
कमी पाऊस असल्यास : जल संधारणामुळे मुळांजवळ आवश्यक तितका ओलावा साठवला जातो. त्यामुळे पीक दुष्काळ स्थिती, पावसाचा दीर्घ कालीन खंडामध्येही तग धरते.
उत्पादनवाढ : गेल्या काही वर्षातील प्रात्यक्षिकांमध्ये बीबीएफ तंत्रज्ञांनाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन एकरी ३ ते ४ क्विंटल ने वाढल्याचे दिसून आले आहे.
आळंदा गावातील यशोगाथा
अकोल्यापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आळंदा (ता. बार्शीटाकळी) या गावामधील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाअंतर्गत रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या मूलस्थानी जलसंधारनामुळे कमी पावसाच्या वेळी किंवा पावसाच्या दीर्घकालीन खंडाच्या काळात ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
त्याचा फायदा पिकांना होतो. या तंत्रज्ञानात तयार केलेल्या सरीमुळे अतिरिक्त पावसाच्या स्थितीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. पाणी साचून राहत नसल्यामुळे पिके पाण्यात राहण्यामुळे होणारे नुकसान टाळता येते. या तंत्रज्ञानामुळे पावसाच्या लहरीपणाच्या स्थितीमध्येही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळवणे शक्य होत आहे. वर मात करण्यास मदत होऊन सोयाबीन उत्पादनवाढीसह विविध फायदे मिळाले आहेत.
बीबीएफ तंत्रज्ञानाने मिळू लागले शाश्वत उत्पादन
आळंदा (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील प्रगतशील शेतकरी सागर गणपत म्हैसने हे गेल्या दोन वर्षांपासून बीबीएफ (रुंद सरी वरंबा पद्धत) तंत्राचा अवलंब करत आहेत. त्यात मिळत असलेल्या पिकाच्या शाश्वत उत्पादनवाढीमुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. बीबीएफ तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीचा आपला अनुभव सांगताना सागर म्हैसने म्हणाले की, मी पूर्वी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पीक घेत होतो.
मात्र दोन वर्षांपूर्वी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला माती परीक्षणाचे महत्त्व समजून दिले. त्यामुळे माती परीक्षण करून घेतल्यानंतर त्यावर आधारीत खतांचे योग्य प्रकारे नियोजन करू लागलो. याशिवाय त्यांनी मला व आमच्या गावातील काही शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्राचे प्रात्यक्षिक घेण्यास तयार केले. ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राद्वारे एकाच वेळी पेरणी, खते देणे आणि सरी वरंबा तयार करणे अशी कामे करता येतात. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते.
वरंब्याची रुंदी ६.५ ते ७ फूट असून सरीची खोली ९ इंच आणि रुंदी १ फूट आहे. या तंत्रामुळे मागील खरीप हंगामात जास्त पाऊस होऊनही जादाचे पाणी रुंद सऱ्यामधूनल सहजतेने वाहून केले. शेतात पाणी साचून राहिलेल्या अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत माझ्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली.
याशिवाय, वरंब्यावर चार ते पाच काकऱ्या असल्याने मुळांपाशी बऱ्यापैकी ओलावा टिकून राहिला. कमी पावसाच्या वेळीही पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे त्यांना एकरी ९.५ ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा तीन ते चार क्विंटलने उत्पादनामध्ये वाढ मिळाली.
सागर म्हैसने यांच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर होता. त्यामुळे त्यांना विद्यापीठाकडून बीबीएफ यंत्र पुरविण्यात आले. मागील खरिपात त्यांनी त्या बीबीएफ यंत्राद्वारे स्वतःच्या १४ एकर जमिनीत सोयाबीनची पेरणी केली. अन्य शेतकऱ्यांनाही भाडेतत्त्वावर पेरणी करून देत असल्यामुळे त्यातूनही काही प्रमाणात उत्पन्न मिळू लागले आहे. पावसाच्या अनियमित स्थितीमध्येही बऱ्यापैकी शाश्वत उत्पादन मिळत असल्याने ते गावपरिसरात या तंत्राचे प्रसारक बनले आहेत.
प्रकल्पांच्या विस्तार कार्यक्रमामुळे आळंदा गावातील अनेक शेतकरी रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत. या तंत्रज्ञानामध्ये जमिनीचे मूलस्थानी जलसंधारण, सुधारित वाणांचा वापर, जैविक बीज प्रक्रिया आणि यांत्रिकीकरण या बाबी साध्य होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासोबतच खर्चात बऱ्यापैकी बचत साधत आहे.
तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी प्रयत्न
एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (RIFS) अंतर्गत आळंदा गावाप्रमाणेच विदर्भातील काही गावे निवडून त्यात ‘बीबीएफ’ तंत्राची प्रात्यक्षिके राबविली जात आहेत. प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी (डॉ.अनिता चोरे, डॉ. राजेश पातोडे, डॉ. महीपाल गणवीर, डॉ. अरविंद तुपे, पवन फुकट , रविकिरण माळी, सचिन मोरे) यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे बदलत्या हवामानातही गावातील पीक पद्धती शाश्वत होण्यास मदत झाली आहे.
डॉ. अनिता चोरे (प्रमुख शास्त्रज्ञ), ८९८३६८६३५९
डॉ. राजेश पातोडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ - जल व मृद् संधारण) ९८२२२०४२७२
(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.