
शेतकरी नियोजन भुईमूग
शेतकरी : कृषिभूषण मधुकर घुगे
गाव : केहाळ, ता. जिंतूर, जि. परभणी
क्षेत्र : १५ एकर
माझी केहाळ, हिवरखेडा (ता. जिंतूर, जि. परभणी) शिवारात हलक्या स्वरूपाची ८० एकर जमीन आहे. त्यापैकी ३५ एकर जमीन बारमाही बागायती आहे. भुईमूग हे आमचे पारंपरिक पीक आहे. २००१ पासून मी भुईमूग लागवड करतो. २००४ पासून मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राचा (बीएआरसी) कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या भुईमुगाच्या विविध जातींचे बीजोत्पादन मी घेत आहे.
प्रामुख्याने उशिरा खरिपामध्ये १२ ते १५ एकर आणि उन्हाळी हंगामात २० ते २५ एकरांवर बीजोत्पादन घेतो. मी प्रामुख्याने भाभा अणू संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या टीजी ३७ ए, टीजी ५१, तसेच भाभा अणू संशोधन केंद्र आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या टिएजी २४, टिएजी ७३ आणि भाभा अणू संशोधन केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली टीएलजी ४५ या जातींच्या लागवडीस प्राधान्य देतो.
लागवडीचे तंत्र
पूर्वी पेरणी योग्य पावसानंतर खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात भुईमूग लागवड करत असे. परंतु या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे टिक्का रोगाचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे उत्पादन घटते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लागवड करुन पाहिली. परंतु पोषक वातावरण नसल्यामुळे उत्पादन कमी मिळाल्याचा अनुभव आहे.
त्यामुळे मागील चार वर्षांपासून मी लेट खरीप म्हणजेच १५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत लागवड करतो. २००६ पर्यंत खरिपात मूग, उडदाचे उत्पादन घेऊन त्यानंतर भुईमुगाची लागवड करत होतो.
परंतु त्यानंतरच्या काळात मोसमी पावसाच्या वेळेत बदल झाल्यामुळे मुगाची पेरणी वेळेवर होत नाही. त्यामुळे भुईमूग लागवडीसाठी जमीन मोकळी ठेवतो. १५ ते २२ ऑगस्ट या कालावधीत टोकण करुन लागवड केली जाते. त्यामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.अधिक उत्पादन मिळते, असा माझा अनुभव आहे.
यंदा मी बारा एकरांवर टीएजी ७३, टिएजी २४, टिएलजी ४५ या जातींची बीजोत्पादनासाठी लागवड करणार आहे. उन्हाळी मशागत करुन एकरी आठ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळले आहे. लेंडी खतासाठी मेंढ्या बसविल्या. मोकळ्या जमिनीवर पावसानंतर जून-जुलै तण वाढते. वाफसा स्थितीत असताना वखराव्दारे पाळी घालून तण नियंत्रण करून घेतो.
ऑगस्टमध्ये जमिनीत ओलावा नसेल तर तुषार संचाद्वारे एका जागी दोन तास याप्रमाणे जमीन ओलावावी लागते.जमीन वाफसा स्थितीत आल्यावर एकरी १०० किलो जिप्सम मिसळून पुन्हा मोकळ्या मातीचा थर भिजविण्यासाठी रात्री दोन तास तुषार संचाने पाणी देतो. सकाळी तिफणीने (दोन ओळींतील अंतर २५ सेंमी) पेरणी करताना माती परिक्षण अहवालानुसार एकरी २५ किलो पोटॅश, २०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १०० किलो १०ः २६ः २६ यासोबत गंधक, जस्त, मॅग्नेशिअम, बोरॉन आदी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाते.
पेरणीच्या वेळी तिफणीने विशिष्ट अंतरावर पडणाऱ्या काकरीमध्ये (रेषा) टोकण करून लागवड केली जाते. लागवडीपूर्वी बुरशीनाशक तसेच जिवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया केली जाते. दोन ओळींतील अंतर २५ सेंमी तर दोन झाडांतील अंतर १० ते १२ सेंटिमीटर असते. एका दिवसात २० मजूर दीड एकरावर टोकण करतात.
टोकण पद्धतीने लागवड करताना थोडा खर्च जास्त येतो. परंतु यामुळे एकरी झाडांची संख्या १ लाख ६० हजार ते १ लाख ७० हजारपर्यंत राखली जाते. परिणामी, उत्पादनात वाढ होते. लागवडीनंतर गरज असेल तर लगेच तुषार संचाने दिड ते दोन तास पाणी दिले जाते. संपूर्ण उगवणीनंतर जमिनीच्या मगदुरानुसार हलका ताण दिला जातो. परिणामी सुरवातीच्या काळातील कायिक वाढ कमी होते.
कीड नियंत्रणासाठी भुईमूग पिकाभोवती सापळा पीक म्हणून चवळी लागवड करतो. आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तरच शिफारशीत कीडनाशकाची फवारणी केली जाते. वाढीच्या टप्प्यात पिकाची स्थिती लक्षात घेऊन जस्त, लोह, बोरॉन, मॅग्नेशिअम, गंधक ही सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच विविध ग्रेडच्या विद्राव्य खतांच्या दोन ते तीन वेळा फवारण्यांचे नियोजन असते.
पिकाच्या वाढीसाठी जमीन नेहमी वाफसा स्थितीत असणे महत्त्वाचे आहे. पहिली आंतरमशागत हात कोळप्याद्वारे केली जाते. कारण या काळात बैल कोळपे चालवल्यास रोपांना धक्का लागू शकतो. लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी आऱ्या सुटत असताना दोन ओळींमध्ये एकरी १५० किलो जिप्सम दिले जाते.
त्यानंतर तिफणीला तागाचे कापड गुंडाळून दोन ओळींतून फिरवल्याने जिप्सम जमिनीत मिसळते. आऱ्या जमिनीत चांगल्या प्रकारे घुसतात. जिप्समचा योग्य वापर केल्याने फोल शेंगाचे प्रमाण कमी राहते. चांगले उत्पादन मिळते. मला लेट खरीप हंगामात एकरी २० ते २२ क्विंटल वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळते.
- मधुकर घुगे ९७६४९२८८१३
(शब्दांकन ः माणिक रासवे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.