
डॉ. एस. एस. मुंढे, ए. ए. भोंडवे, डॉ. एस. जी. झाल्टे
Soil Fertility: गेल्या काही वर्षामध्ये शेतामध्ये आवश्यक तितक्या प्रमाणात शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा वापर केला जात नाही. त्यामागे अनेक कारणे असली तरी प्रमुख कारण हे कमी झालेले पशुधन आहे. त्याच प्रमाणे तुकडेकरणामुळे आकाराने कमी होत चाललेले क्षेत्रही आहे. त्यातच पिकाच्या अधिक उत्पादकतेसाठी प्रामुख्याने रासायनिक खतांवरील अवलंबित्व वाढले आहे.
तणांचे, रोग किडींच्या नियंत्रणासाठीही रासायनिक घटकांच्या फवारण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. त्यामुळे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजिवांची संख्या वेगाने कमी होत आहे. मृदेची सुपीकता व उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीची खते ही अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात.
हिरवळीची पिके म्हणजे काय?
पिकाच्या हंगामापूर्वी हिरवळीची खत पिके पेरली जातात. ती फुलोऱ्यात आल्यानंतर नांगरून मातीत गाडली जातात. गिरीपुष्पासारखी काही झाडे बांधावर लावून, त्यांचे सेंद्रिय पदार्थ उदा. फांद्या, पाने इ. शेतजमिनीत गाडली जातात. त्यामुळे मृदेला सेंद्रिय पदार्थ, नत्र व अन्य पोषक घटक मिळतात.
त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते. नत्र, स्फुरद, कॅल्शिअम, लोह यासारख्या अनेक पोषक घटकांइतकेच सेंद्रिय कर्ब वाढीसाठी हिरवळीची पिके अधिक उपयुक्त ठरतात. त्यांची लागवड शेतामध्ये मिश्रपीक, आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणूनही करता येते. त्यातून आपल्याला जमिनीचा पोत, सुपीकता टिकवणे शक्य होते.
हिरवळीच्या खतांचे प्रकार
शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीचे खत : ज्या शेतात हिरवळीचे खत वापरायचे आहे, त्याच ठिकाणी सलग व एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून हिरवळीच्या पिकांची पेरणी केली जाते. वाढ झाल्यावर पीक फुलोऱ्यात येण्याआधी नांगराच्या साहाय्याने ते जमिनीत गाडले जाते. उदा. ताग, धैंचा, अंबाडी, बोरू चवळी, मूग, गवार, मटकी, वाटाणा, व उडीद इ.
हिरव्या कोवळ्या पानाचे हिरवळीचे खत : पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतींची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात टाकल्या जातात. शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लागवड करून त्याचा पाला किंवा फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणी वेळी मातीत मिसळल्या जातात. उदा. शेवरी, गिरीपुष्प, सुबाभूळ, करंज, टाकळा, हादगा इ.
हिरवळीच्या खतांसाठी उपयोगी पिके
ताग : हे उत्तम हिरवळीचे पीक आहे. यात नत्राचे प्रमाण ०.४६ % इतके असते. मॉन्सूनच्या पावसावर येणारे हे पीक झपाट्याने वाढते. ६ ते ८ आठवड्यांमध्ये ते एक ते दोन मीटर उंच वाढते. गाडल्यानंतरही मातीत ओलावा भरपूर असल्यास ताग हे पीक लवकर कुजते. हे पीक आपण उन्हाळी किंवा पावसाळी हंगामात घेऊ शकतो. ताग लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. सरासरी उत्पादन १९ टन प्रती हेक्टरी मिळते. ते जमिनीत गाडल्यानंतर हेक्टरी ७० ते ८० किलो नत्र मिळू शकतो.
द्विदलवर्गीय इतर पिके : चवळी, कुळीथ, जंगली इंडिगो आणि तूर या सारख्या द्विदलवर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी असतात. त्यातील सूक्ष्मजिवाणू वातावरणातील मुक्त नत्र जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात. जमिनीत नत्र स्थिरीकरण चांगले होते. चवळी लागवडीसाठी हलकी ते मध्यम काळी जमीन निवडावी. पेरणीसाठी हेक्टरी ३५ किलो बियाणे वापरावे. चवळी हे उन्हाळी व पावसाळी हंगामात घेतले जाते. सरासरी उत्पादन १३ टन प्रतिहेक्टरी मिळते. या पिकातून प्रति हेक्टरी साधारणतः ५० ते ९० किलो नत्र मिळते.
धैंचा : हे द्विदलवर्गीय पीक अनुकूल परिस्थिती नसतानाही उत्तम वाढते. ज्या जमिनी जास्त क्षारयुक्त किंवा ओलावा धरून ठेवतात, अशा जमिनीतही हे पीक जोमाने वाढते. वातावरणातील नत्र जमिनीत साठवते. धैंचामुळे जमिनीची धूप कमी होते. हे पीक खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाते. लागवडीसाठी ४५ किलो बियाणे प्रतिहेक्टरी वापरावे. सरासरी उत्पादन १७ टन प्रतिहेक्टरी मिळते.
गिरीपुष्प : हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तसेच निरनिराळ्या पाऊसमानाच्या प्रदेशात चांगल्याप्रकारे येऊ शकते. ताग व धैंचाच्या तुलनेत या झाडाच्या पानांमध्ये नत्राचे प्रमाण जास्त (म्हणजे २.९ टक्के) असते. हे हिरवळीचे खत एक आठवड्यातच कुजून ते पिकाला उपलब्ध होते. या झाडाचा हिरवा पाला ६ ते ८ टन प्रतिहेक्टरी द्यावा.
हिरवळीच्या खतापासून जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी...
पिकाची निवड : मातीत आर्द्रता, पिकाच्या वाढीसाठी लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊनच शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.
पेरणीची वेळ : पेरणीची योग्य वेळ काय असायला हवी, हे प्रत्येक प्रदेशाप्रमाणे बदलत असते. परंतु मृगाचा पाऊस पडल्यावर पेरणी करणे योग्य मानले जाते. बिया उगवणीचे प्रमाण वाढविण्यासाठी मातीमध्ये पुरेशी आर्द्रता असणे आवश्यक.
जमिनीत गाडण्याची योग्य वेळ : सर्वसाधारणपणे पीक फुलात आल्यावर ती गाडावीत. त्यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.
गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणीचा कालावधी : मातीत गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती
वेळ लागतो, यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करावे. हलक्या मातीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर २ ते ७ दिवसांनी मुख्य पिकाची पेरणी करता येते.
पाण्याचा निचरा कमी असलेल्या मातीमध्ये ही खतपिके गाडल्यावर ७ ते १२ दिवसांनी पेरणी करावी.
हिरवळीच्या पिकांची निवड
पीक शेंगवर्गीय (द्विदल) असावे.
पीक हलक्या किंवा मध्यम जमिनीत वाढण्यायोग्य असावे.
पिकास पाण्याची आवश्यकता कमी असावी.
वनस्पतींमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असावे. म्हणजे गाडल्यानंतर त्याच्या अवशेषांचे लवकर विघटन होईल.
हिरवळीचे पीक एक ते दीड महिन्यात फुलोऱ्यात येणारे असावे. म्हणजे पीक गाडून कुजल्यानंतर पुढील पीक घेता येईल.
नत्र स्थिर करण्याची क्षमता जास्त असणे आवश्यक आहे.
हिरवळीचे खत हिरवेगार, पालेदार असावे. म्हणजे त्यापासून भरपूर हरितद्रव्य मिळेल.
पिकांचे खोड कोवळे व लुसलुशीत असावे.
हिरवळीच्या खताची कार्य शक्ती
सर्वसाधारणपणे १ टन हिरवळीचे खत शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले खत २.५ ते ३ टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र १० किलो युरियाच्या बरोबर असते. २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करावयाचा झाल्यास जवळजवळ ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टर वापरणे आवश्यक ठरते
हिरवळीच्या खतांमुळे होणारे फायदे
नत्राचे स्रोत : हिरवळीच्या खतांमुळे जमिनीत नत्र स्थिरावतो. शेंगवर्गीय पिके हवेतून नत्र शोषून जमिनीत देतात.
मृदेतील सेंद्रिय पदार्थ वाढवणे : हिरवळीचे पीक मातीमध्ये नांगरल्यावर कुजते आणि मृदेला सेंद्रिय पदार्थ मिळतो. यामुळे मृदेत सूक्ष्मजिवांची वाढ होते व सुपीकता वाढते.
मृदेचा पोत सुधारतो : हिरवळीच्या खतांमुळे मृदेची रचना भुसभुशीत होते, त्यामुळे पाण्याचा निचरा आणि धारणक्षमता सुधारते.
मृदेतील जैविक क्रियाशीलता वाढते : हिरवळीच्या खतांमुळे जमिनीत जिवाणू व बुरशी यासारख्या सूक्ष्मजिवांची संख्या वाढते, जी पिकाच्या विकासासाठी उपयुक्त असते.
तण नियंत्रण : जलद वाढणाऱ्या हिरवळीच्या पिकांमुळे तण वाढू शकत नाहीत. त्यामुळे तणनाशक वापरण्याची गरज कमी होते.
खर्चात बचत : हिरवळीचे खत हे स्वस्त व सुलभ उपलब्ध पर्याय आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
शाश्वत शेतीस चालना : हिरवळीच्या खताचा वापर जमिनीचा ऱ्हास रोखतो, मृदेची गुणवत्ता टिकवतो, आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमता वाढवतो.
हिरवळीच्या पिकांचा लागवडीचा हंगाम, उत्पन्न व नत्राचे शेकडा प्रमाण
- डॉ. एस. एस. मुंढे, ९७६५११०९७१
(मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, सी. एस. एम. एस. एस. कृषी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.