Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक

Green Manure : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीच्या पिकांचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. हिरवळीची पिके शेतात घेऊन ती जमिनीत गाडल्यास मातीचा पोत आणि सुपीकता वाढवण्यास मदत होते. तसेच खतांवरील खर्चात बऱ्यापैकी बचत करणे शक्य होते.
Green Manure
Green ManureAgrowon
Published on
Updated on

डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम

कुठल्याही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे असते. जमीन सुपीक असल्यास पिके उत्तम वाढून उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेती फायदेशीर होण्याची शक्यता वाढते. पिढ्यानपिढ्या एकाच जमिनीमध्ये एक सारखी पिके घेत राहिल्यास मातीची सुपीकता कमी होत जाते. ती टिकवून ठेवणे आणि वाढवणे फार महत्त्वाचे ठरते. कोणत्याही पिकांच्या खतांची शिफारशीमध्ये प्राधान्याने शेणखत आणि कंपोष्ट खतांची मात्रा दिलेली असते.

तिची पूर्तता केल्यास भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. मात्र शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शेणखतांची उपलब्धता कमी होत असून, हंगामी पिकांसाठी शेणखत विकत घेणेही परवडत नाही.

अशा स्थितीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीच्या पिकांचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. अशी पिके शेतात घेऊन ती योग्य अवस्थेमध्ये जमिनीत गाडल्यास मातीचा पोत आणि सुपीकता वाढवण्यास मदत होते. हिरवळीच्या खतांचे नियोजन करून सेंद्रिय खतांवरील खर्चात बऱ्यापैकी बचत करणे शक्य आहे.

Green Manure
Green Manuring Update : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची खते

हिरवळीच्या खतांचे पीक शेतामध्ये वाढवून ते फुलोऱ्यात असताना नांगराच्या मदतीने जमिनीत गाडले जाते. त्याच प्रमाणे काही झाडे बांधावर किंवा पडीक जमिनीत वाढवून त्यांची पाने व कोवळ्या फांद्या जमिनीत गाडल्या जातात. उदा. शेवरी, गिरिपुष्प, सुबाभूळ इ. ही पिके जनावरांच्या चाऱ्यासाठीही उपयुक्त ठरतात. हिरवळीची पिके जमिनीत गाडल्यानंतर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्या वाढलेल्या सेंद्रिय कार्बनवर जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होते.

त्यांची संख्या वाढल्याने ती पिकांना अन्नद्रव्य शोषण्यासाठी मदत करतात. त्याच प्रमाणे हिरवळीची पिके जमिनीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य शोषून घेतात. ती जमिनीच्या वरच्या थरात गाडल्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण करण्यास मदत होते. ही पिके घेतल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप कमी होती.

पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. हिरवळीच्या खतांमुळे भात, ऊस, गहू व कापूस या पिकांचे उत्पादन साधारणतः १२ ते २० टक्क्यांपर्यंत वाढते. ज्या भागात पाऊस भरपूर आहे किंवा पाण्याची उपलब्धता असलेल्या भागामध्ये स्थानिक हवामान व जमिनीचा विचार करून चांगली वाढणारी हिरवळीची पिके घ्यावी.

Green Manure
Green Manure Crop : शेतासाठी धैंचा आहे संजीवनी ; मातीचे आरोग्य सुधारेल

हिरवळीच्या खतांचे प्रकार

जागेवरील हिरवळीची खते : या प्रकारात हिरवळीचे खते शेतात पिकवून ती फुलोऱ्यात आल्यावर पूर्णपणे जागीच गाडली जातात.

उदा. ताग, धैंचा, चवळी इ

हिरवळीचे पाने व फांद्या जमिनीत गाडणे : पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडल्या जाजात. शक्य असलेल्या पडीक जमिनी किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लागवड केली जाते. त्यांचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळल्या जातात. उदा. गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ इ.

महत्त्वाच्या बाबी

  • हिरवळीचे पीक द्विदलवर्गीय असावे. त्यांच्या मुळावर गाठी असाव्यात.

  • पाण्याची गरज कमीतकमी असावी.

  • मुळांची वाढ चांगली असावी.

  • हिरवळीच्या पिकास भरपूर पाला व फांद्या असाव्यात.

  • हिरवळीचे पीक लवकर कुजणारे असावे. त्यात नत्राचे प्रमाण मुबलक असावे.

  • हिरवळीचे पीक रोग व किडीस प्रतिकारक्षम असावे.

हिरवळीच्या खतांचे फायदे

  • जमिनीचा पोत सुधारतो.

  • जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात बदल होऊन सुपीकता वाढते.

  • जमिनीच्या प्रकारानुसार योग्य हिरवळीचे पीक गाडल्यास त्याची जलधारण क्षमता व निचरा शक्ती सुधारते.

  • हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते

  • जमिनीतील हवेचे संकलन सुधारते. जमिनीची उत्पादकता वाढते.

  • हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.

  • जमिनीत जिवाणूंची संख्या वाढते, त्यामुळे पिकांना अन्नद्रव्य उपलब्धता वाढते.

- डॉ. विशाल गमे, ९४०३९२९६१७

(कृषी विद्या विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com