
डॉ. समाधान सुरवसे, डॉ.अभिनंदन पाटील, डॉ.अशोक कडलग
Soil Organic Carbon Management: रासायनिक खतांचा दीर्घकालीन असंतुलित वापर केल्याने जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सुपीकता आणि उत्पादन क्षमता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा आहे.
वनस्पतीमध्ये सर्वसाधारणपणे ८० टक्के पाणी आहे आणि उरलेल्या २० टक्के घटकांना आपण शुष्क पदार्थ म्हणतो. शुष्क भागाचे पृथक्करण केले असता त्यातील ९६. ४ टक्के प्रमाण हवा आणि वायूमार्फत मिळणाऱ्या अन्नघटकांचे आहे.
त्यामध्ये ४५ टक्के कर्ब, ४५ टक्के प्राणवायू आणि ६.४ टक्के हायड्रोजन प्रमाण असते. जमिनीमधून मिळणाऱ्या नत्र, स्फुरद, पालाश आणि उर्वरित अन्नद्रव्यांचे प्रमाण ३. ६ टक्के आहे. यामध्ये केवळ नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण २.७ टक्के आहे. वनस्पतीमध्ये पीक पोषण अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, तरी पण आपण त्याला खूप जास्त महत्त्व देतो,
मात्र ९६. ४ टक्के शुष्क पदार्थ तयार करण्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक कर्ब असून याकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. हिरवळीचे खत, शेणखत, कंपोस्ट, जैविक पदार्थ यांचा योग्य वापर करून मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवता येतो. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, उत्पादन वाढते. पर्यावरण सुरक्षित राहते.
हिरवळीच्या पिकांचा वापर
धैंचा, ताग, उडीद, मूग, गवार ५० टक्के फुलोऱ्यावर आल्यावर नांगरून जमिनीत गाडून टाकतात. यामुळे माती सेंद्रियदृष्ट्या समृद्ध होते.
गिरीपुष्प, झाडांची वाळलेली पाने, पिकांचा काडीकचरा, शेंगावर्गीय पिकांचे अवशेष जसे की, पाने, फांद्या इत्यादी आपल्या शेतात नेऊन जमिनीत मिसळतात.
मुळांवर गाठी असलेली डाळवर्गीय आणि गाठी नसलेली अशी दोन्ही प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरतात. मुळावर गाठी असलेल्या पिकाद्वारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात. मुळावर गाठी नसलेल्या पिकापासून फक्त सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात.
हिरवळीच्या पिकांची पेरणी योग्य वेळेत करावी. कारण त्याचा थेट परिणाम सुपीकता आणि पुढील मुख्य पिकाच्या उत्पादनावर होतो. पेरणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी (फुलोरा अवस्थेमध्ये) ही पिके जमीन नांगरून गाडून टाकतात.
हिरवळीच्या खतामध्ये फॉस्फरस वापरणे फायदेशीर ठरते. फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांच्या वाढीस आणि ऊर्जेच्या संचयाला मदत करतो. हिरवळीचे खत मुख्यतः नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, पण त्यात फॉस्फरस कमी असतो. त्यामुळे जमिनीमध्ये संतुलित पोषणासाठी फॉस्फरस देणे फायदेशीर ठरते. हिरवळीच्या खताची पेरणी करताना किंवा पेरणीनंतर लगेच फॉस्फरस खत सरासरी ५० ते ६० किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळून द्यावे, त्यामुळे मुळांची वाढ सुधारून सेंद्रिय द्रव्यांचे विघटन लवकर होते. हिरवळीच्या खतामुळे निर्माण होणारा ह्युमस अधिक परिणामकारक असल्यामुळे जमिनीचा पोत व जलधारण क्षमता सुधारते.
हिरवळीचे पीक कुजण्याची क्रिया
पीक ४५ ते ६० दिवसांचे झाल्यानंतर भरपूर नायट्रोजन, साखरेचे संयुग आणि पाणी असते. त्यामुळे ते ट्रॅक्टर किंवा कुळवाने जमिनीत गाडल्यानंतर त्याच्यावर जमिनीतील जिवाणू, बुरशी कार्य करतात. साधारणतः १५ ते २५ दिवसांमध्ये पीक कुजून जाते.
वातावरणातील ओलावा, उष्णता आणि जमिनीतील सूक्ष्मजिवांची संख्या यावर कुजण्याची क्रिया अवलंबून असते. साधारणपणे २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान, पिकाची कोवळी अवस्था आणि ओलावा असल्यास कुजण्याची क्रिया जलद होते.
हिरवळीच्या खतामध्ये कार्बन: नत्र प्रमाण हे १६:१ असल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. जमिनीतील सूक्ष्मजीव हिरवळीच्या पिकातील कार्बन व नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन करतात. त्यामुळे सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने वेगाने विघटीत होतात. कार्बन डायऑक्साईड आणि उष्णता निर्माण होते. सूक्ष्मजीव सेल्यूलोज, लिग्निन, प्रथिनांचे विघटन करतात. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम हळूहळू मोकळे होतात. पूर्ण विघटनानंतर ह्युमस तयार होतो. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमीन अधिक सुपीक होते.
पीक जमिनीत गाडण्यास १५ ते २० दिवसांचा उशीर झाल्यास त्यामधील तंतुमय पदार्थ कठीण होतात. त्यामधील नत्राचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सूक्ष्मजिवांना हे खत विघटन करण्यास कठीण जाते, कुजण्यास विलंब लागतो. उशिरा गाडल्यामुळे त्यामधील पॉलिथिनॉल रसायनाचे प्रमाण वाढते, त्यामुळे जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
फायदे
ताग, धैंचा, गवार ही पिके नायट्रोजन स्थिरीकरण करून जमिनीत नायट्रोजनचा पुरवठा करतात.
सेंद्रिय पदार्थाची मात्रा वाढते, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
समस्यायुक्त जमिनीचा सामू कमी होतो, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, सेंद्रिय कर्बाची वृद्धी होते.
खतामुळे माती बारीक आणि सच्छिद्र बनते, त्यामुळे जल धारणशक्ती वाढते.
सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीतील जैविक कार्बनचे प्रमाण वाढते, त्यामुळे माती सजीव राहते.
वाढीच्या अवस्थेत आणि कुजण्याच्या प्रक्रियेत फेनॉल्स, फ्लॅव्होनॉइड्स, टेरपिनॉइड्स आणि सेंद्रिय आम्ल अशी रसायने जमिनीत सोडली जातात, त्यामुळे तणांच्या उगवणीवर परिणाम होऊन नैसर्गिक नियंत्रण होते.
ताग, धैंचा सूत्रकृमी आणि इतर मातीतील हानिकारक किडींना आटोक्यात ठेवतात.
पिकांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे धूप होत नाही.
कोणतेही रासायनिक घटक न वापरता सेंद्रिय मार्गाने जमिनीची सुपीकता वाढते, त्यामुळे सेंद्रिय शेतीस हिरवळीचे खत योग्य नैसर्गिक पर्याय आहे.
रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो, कारण हिरवळीच्या खतामुळे नैसर्गिक नायट्रोजन मिळतो.
उसामध्ये आंतरपीक
उसामध्ये हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर आणि शाश्वत शेतीची पद्धत आहे. यामुळे उसाच्यावाढीस पूरक पर्यावरण तयार होते. जमिनीची गुणवत्ता टिकून राहते.
ऊस लागवडीनंतर १० ते १५ दिवसांच्या आत हिरवळीचे पीक पेरावे. दोन ओळींत मधोमध हिरवळीच्या पिकाचे बी पेरावे. योग्य अंतर ठेवून, उगवण होईपर्यंत हलकी मशागत करावी. फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना गाडावे. हे करताना उसाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
आंतरपीक घेण्याचे फायदे
फायदा स्पष्टीकरण
नायट्रोजनचा नैसर्गिक पुरवठा डाळवर्गीय हिरवळीची पिके (धैंचा,ताग,गवार) जमिनीत नायट्रोजन स्थिर करतात, जे उसाच्या गरजेस पूरक ठरते.
जमिनीची धूप, वाऱ्यापासून संरक्षण आंतरपिकामुळे जमिनीचा पृष्ठभाग झाकलेला राहतो, त्यामुळे धूप कमी होते.
तण नियंत्रण तणांची वाढ कमी होते.
सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते जमिनीतील सेंद्रिय घटक वाढल्याने लाभदायक सूक्ष्मजिवांची संख्या वाढते.
मातीचा पोत आणि पाणी धारण क्षमता सुधारते पाने, मुळे आणि सेंद्रिय घटकांमुळे जमीन भुसभुशीत होते.
- डॉ.समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९
(वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु., पुणे )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.