Solapur News : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, अनवली, पुळूज तसेच मोहोळ तालुक्यातील आढेगाव भागातील द्राक्षासह खरबूज, कलिंगडावर बोगस कीटकनाशक फवारल्यामुळे मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे या भागातील सुमारे ५० एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पावसासह विविध समस्येने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात या नव्या आपत्तीची भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच सकाळी धुके, संध्याकाळी थंडी अशा वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानेही मोठे नुकसान केले आहे.
धुक्यासह थंडीच्या वातावरणामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षासह खरबूज, कलिंगडावर एका नामांकित कंपनीच्या कीटकनाशकाची फवारणी केली.
पण त्याचा रोगनियंत्रणावर प्रभाव दिसून येण्याऐवजी थेट द्राक्ष बागा आणि खरबुजाचे नुकसान झाले. एकाचवेळी या भागात हा प्रकार झाल्याने बहुधा एकाच बॅचच्या पॅकिंगचे कीटकनाशक या सर्वांकडून फवारणी झाल्याचे दिसते.
त्यामुळेच पंढरपुरातील कासेगावसह मोहोळ तालुक्यातील आढेगाव भागातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अक्षरशः जळून गेल्या आहेत. तसेच खरबूज, कलिंगडही जळून गेल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
प्रामुख्याने अनवली येथील पोपट शिवदास घोडके, समाधान अर्जुन घोडके, पांडुरंग शिवाजी कदम, धनाजी जनार्दन देशमुख, कासेगाव येथील वसंत दामू शिंदे, सदाशिव बाबा गवळी, अजिंक्य तानाजी देशमुख, अक्षय तानाजी देशमुख, नेहाल नेताजी देशमुख, संकेत सयाजी देशमुख, मोहोळ तालुक्यातील राजाराम बारबोले (रा. आढेगाव) यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच द्राक्ष बागायतदार संघाचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, प्रणव परिचारक यांनी नुकसानग्रस्त बागांना भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.