Chana Varieties : यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त हरभरा वाण

Chana Crop : दिवसेंदिवस शेतीकामांसाठी मजुरांची कमतरता वाढते आहे. त्यामुळे पीक काढणीसाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते.
Chana Crop
Chana CropAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. आनंद सोळंके, ऐश्‍वर्या राठोड

Chana Harvesting : दिवसेंदिवस शेतीकामांसाठी मजुरांची कमतरता वाढते आहे. त्यामुळे पीक काढणीसाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी हरभऱ्याचे उंच वाढणारे ‘फुले विक्रम आणि पीडीकेव्ही कनक’ हे वाण विकसित केलेले आहेत.

हरभरा पिकापासून अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये योग्य जमिनीची निवड, पूर्वमशागत, अधिक उत्पादनक्षम आणि कीड-रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर, बीजप्रक्रिया, जिवाणू संवर्धकाचा वापर, वेळेवर पेरणी, पेरणीचे योग्य अंतर, तणनियंत्रण, सिंचन व्यवस्थापन आणि पीक संरक्षण आदी बाबींचा समावेश होतो.

हरभरा पिकाच्या अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांचा लागवडीसाठी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी हरभरा पिकाचे विविध वाण प्रसारित केलेले आहेत. दिवसेंदिवस शेतीकामांसाठी मजुरांची कमतरता वाढते आहे. त्यामुळे पीक काढणीसाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. विद्यापीठाद्वारे यांत्रिक पद्धतीने काढणी करता येईल असे उंच वाढणारे ‘फुले विक्रम आणि पीडीकेव्ही कनक’ हे हरभरा वाण विकसित केले आहेत.

लागवड तंत्र ः
जमीन ः

- लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन निवडावी. हलकी, चोपण किंवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन टाळावी.

पूर्वमशागत ः
- खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. त्यानंतर जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.

Chana Crop
Chana Varieties : हरभरा लागवडीच्या सुधारित पद्धती

बीजप्रक्रिया ः
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.

पेरणी ः
- यांत्रिक पद्धतीने काढणी करण्याकरिता हरभरा पिकाच्या फुले विक्रम आणि पी.डी.के.व्ही. कनक या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे.
- उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण करावी.
- लहान आकाराच्या बियाणे असल्यास हेक्टरी ६५ ते ७० किलो, मध्यम आकाराचे बियाणे असल्यास १०० किलो आणि टपोरे दाण्याचे बियाणे असल्यास हेक्टरी १२० किलो बियाणे वापरावे. सर्वसाधारणपणे जातिपरत्वे, बियाणाच्या आकारानुसार हेक्टरी ७० ते १०० किलो बियाणे वापरावे.
- कम्बाइन हार्वेस्टरद्वारे काढणी करण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत, तर बागायती उशिरात उशिरा १० डिसेंबरपर्यंत पेरणी करावी.
- ओलिताखाली ४५ बाय १० सेंमी अंतरावर पेरणी करावी. त्यासाठी हेक्टरी ५० किलो बियाणे वापरावे.

खत, सिंचन व्यवस्थापन ः
- पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे.

Chana Crop
Safflower Varieties : करडईचे प्रमुख वाण अन् त्यांची वैशिष्ट्ये

सुधारित वाण ः
१) फुले विक्रम ः

- महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे २०१६ मध्ये प्रसारित.
- कम्बाइन हार्वेस्टरने काढणीस उपयुक्त.
- कोरडवाहू, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी उपयुक्त.

- पिकाची उंची ५५ ते ६० सेंमी असून, घाटे जमिनीपासून एक फुटांवर लागतात. उंच असल्याने यांत्रिक पद्धती (कम्बाइन हार्वेस्टर) काढणी करता येते. पिकाचे कोणतेही नुकसान न होता व्यवस्थित काढणी करता येते. 
- दाण्यांचा आकार मध्यम.
- मर रोग प्रतिकारक्षम.
- परिपक्वता कालावधी ः १०५ ते ११० दिवस.
- संपूर्ण महाराष्ट्रात पेरणीसाठी शिफारस. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यात या लागवडीची शिफारस.
- उशिरात उशिरा (१० डिसेंबरपर्यंत) लागवड केल्यास, उत्पादनात फरक पडत नाही. 
- यांत्रिक पद्धतीने काढता येत असल्याने पीक काढणीवरील खर्चात बचत होते.
- जिरायती भागामध्ये प्रति हेक्टरी १६.३७ क्विंटल, बागायतीमध्ये २२.२५ क्विंटल आणि उशिरा पेरणीमध्ये २१.१२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

२) पी.डी.के.व्ही. कनक ः
- प्रसारण वर्ष २०२१.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याद्वारे विकसित.
- महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
- जिरायती, बागायती पेरणीस योग्य, तसेच ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस.
- दाण्याचा आकार मध्यम.
- कम्बाइन हार्वेस्टरने काढणीस उपयुक्त.

- लवकर व एकाच वेळी परिपक्व होतो.
- परिपक्वता कालावधी ः १०८ ते ११० दिवस.
- जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंच वाढणारा, तसेच जमिनीपासून एक ते दोन फुटांवर घाटे लागतात. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त आहे.
- मध्यम टपोरे दाणे, १०० दाण्याचे वजन २१.७३ ग्रॅम.
- घाटे अळी आणि मर रोगास प्रतिकारक.
- हेक्टरी सरासरी उत्पादन ः २२ ते २५ क्विंटल.
---------
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com