जितेंद्र दुर्गे
हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण पीक आहे. हे पीक कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेता येते. या पिकाच्या अडचणींवर आधारित योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास नुकसानीची पातळी किमान राखता येते.
कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या हरभरा पिकातील मुख्य समस्या व अडचणी पुढील प्रमाणे आहेत. या अडचणींचा विचार पेरणीपूर्वीपासून करून त्यावरील उपाययोजना वेळीच अवलंबल्यास भविष्यातील नुकसान कमी होते.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कमी उगवण
कोरडवाहू अथवा बागायती लागवडीमध्ये हरभऱ्याची उगवण कमी होते. परिणामी, झाडांची संख्या कमी राहिल्यामुळे मोठे नुकसान संभवते. कोरडवाहू परिस्थितीत ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना बियाणे कमी जास्त खोलीवर पेरले जाते. बियाणे उथळ पडल्यास वरच्या थरातील कमी ओलीमुळे अंकुरणात अडचणी येतात. अर्धवट अंकुरण प्रक्रिया होऊन कमी उगवणीचा धोका संभवते. त्यामुळे पेरणीची खोली योग्य म्हणजेच ६ ते ८ सें.मी. राखावी.
ओलिताची व्यवस्था असल्यास, स्प्रिंकलरच्या साह्याने संपूर्ण शेत ओलावून घ्यावे. योग्य प्रकारे वाफसा आल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे अथवा बैलजोडी चलित पेरणीयंत्राने पेरणी करावी. बहुतांश वेळा शेत तयार केल्यानंतर शेतकरी कोरड्यात हरभऱ्याची पेरणी करतात. नंतर स्प्रिंकलरच्या माध्यमातून ओलित करतात.
अशा वेळी कमी अथवा जास्त पाणी दिले गेल्यास दोन्ही परिस्थितीत बियाण्याला बुरशी चढते व कमी उगवणीचा धोका संभवतो. त्यामुळे योग्य व एकसमान उगवणीसाठी आधी ओलित द्यावे. योग्य प्रकारे वाफसा येऊ द्यावा. त्यानंतरच हरभऱ्याची पेरणी करावी. पिकाची पूर्ण उगवण झाल्यानंतर, पीक रोपटे अवस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना हलके ओलित द्यावे.
म्हणजेच तुषार सिंचन संचाद्वारे पाणी देण्याचा कालावधी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त असू नये. याद्वारे जमिनीतील राहिलेले बियाणेसुद्धा उगवून येईल. पिकाला रोपटे अवस्थेच्या सुरुवातीला पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी.
उगवणीच्या वेळी होणारी कतरण
हरभऱ्याचे पीक उगवणीच्या अवस्थेत असताना उडद्या कीड/ भुईकिडा/ काळी म्हैस यांचा प्रादुर्भाव होतो. याला शेतकरी ‘कतरण’ म्हणून संबोधतात. कोरडवाहू हरभरा पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होताना आढळते. याकरिता ज्या शेतामध्ये कतरणची समस्या दर हंगामात आढळत असलेल्या शेतांमध्ये पुढील उपाययोजना कराव्यात.
ओलिताची सोय असल्यास आधी ओलित करावे. त्यानंतर वाफसा आल्यावर हरभऱ्याची पेरणी करावी. आधी केलेल्या ओलितामुळे मातीच्या ढेकळाआड लपलेले कीडे ओल्या थराखाली गाडले जातात. त्यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी राहण्यास मदत होते.पेरणी करताना अथवा शेतात रोटाव्हेटर करण्यापूर्वी दाणेदार क्लोरपायरीफॉस अथवा कारटॅप हायड्रोक्लोराइड ४ ते ५ किलो प्रति एकर यापैकी एकाचा उपलब्धतेनुसार वापर करावा.
हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर उगवणीपूर्वी साधारणत: २ ते ३ दिवस आधी अथवा पीक रोपटे अवस्थेत असतानाची सुरुवातीची अवस्था या काळात नॅपसॅक पंपाने क्लोरपायरिफॉस अथवा क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून जमिनीलगत दाट फवारणी करावी. याद्वारे उगवणीच्या अवस्थेत कोवळ्या कोंबाची कतरण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त शक्य होऊन संभाव्य नुकसान टाळता येते.
- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.