Drought
Droughtagrowon

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळाबाबत सरकार अनभिज्ञ

Maharashtra Drought Condition : राज्य सरकारने नुकताच राज्यातील ४० तालुक्‍यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. त्यापैकी २४ तालुक्‍यांत गंभीर, तर १६ तालुक्‍यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ७६ पैकी ६० तालुक्‍यांत पावसाचे प्रदीर्घ खंड आणि अपेक्षित पाऊसच झाला नाही. सोयाबीन, कापूस पिकाला मोठा फटका बसला असून, खरिपाची स्थिती सर्वश्रुत आहे.

परंतु विविध निकषांच्या अधीन राहून दुष्काळ जाहीर करणाऱ्या शासनाला मराठवाड्यातील केवळ १४ तालुक्‍यांतच गंभीर दुष्काळ दिसला. इतर तालुक्‍यांत मध्यमही दुष्काळ दिसला नाही का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

त्यामुळे नेमकी कोणती कळ दबली नाही याची तपासणी आता मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणा करणार का, हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

राज्य सरकारने नुकताच राज्यातील ४० तालुक्‍यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. त्यापैकी २४ तालुक्‍यांत गंभीर, तर १६ तालुक्‍यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. हा दुष्काळ जाहीर करताना पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार केल्याचे म्हटले आहे. माहितीनुसार यापैकी कोणत्याही दोन कळ दबल्या की मध्यम आणि यापैकी तीन किंवा त्यापेक्षा जास्त कळ दबल्या की गंभीर दुष्काळ जाहीर करायचे असे शासनाचे धोरण आहे.

 Drought
Drought Conditions : मराठवाड्यात १०४ गावे, २५ वाड्यांत पाणी टंचाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव व छत्रपती संभाजीनगर, जालन्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, बीडमधील वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लातूरमधील फक्‍त रेणापूर, धाराशीवमधील वाशी, धाराशीव व लोहारा एवढेच तालुके शासनाच्या निकषात बसले आहेत.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत झपाट्याने टॅंकरची संख्या वाढते आहे. भूजलाची पातळी वाढली नाही, नदी नाल्यांना चार दोन अपवाद वगळता पुरच आला नाही. पाणीसाठ्यांची स्थिती बिकट आहे. ३६ लघू मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. जायकवाडीसारखा सर्वांत मोठा प्रकल्प अजूनही तहानलेला आहे. त्याला थोड सक्षम करण्यासाठी त्या प्रकल्पाच्या वरच्या भागातील प्रकल्पातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

प्रकल्पात पाणी नाही, जमिनीत ओल नाही त्याचा थेट परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला आहे. हे कुठे गृहीत धरल गेले की नाही हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. शासनाने त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून शोध लावून निकषाच्या अधीन राहून आणखी एक कळ दाबत दुष्काळ जाहीर केला असेलही. परंतु प्रत्यक्ष स्थिती व दुष्काळाच्या निकषासाठी गृहीत धरलेली स्थिती याचा ताळमेळ मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणा व शासन तपासून पाहणार का हा प्रश्‍न आहे.

 Drought
Maharashtra Drought : सरकारी दुष्काळ

दरम्यान, मराठवाड्यातील २५ ते ५० टक्के दरम्यान पाऊस झालेल्या मंडळांमध्ये बीड मधील ३, धाराशिवमधील २, नांदेड, परभणी, लातूरमधील प्रत्येकी एका मंडळाचा समावेश आहे. ५० ते ७५ टक्के दरम्यान पाऊस झालेल्या १६५ मंडळांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १२, जालना २४, बीड ३१, लातूर ३२, धाराशिव २४, नांदेड ४, परभणी ३५ व हिंगोलीतील तीन मंडळांचा समावेश आहे.

तसेच ७५ ते १०० टक्के दरम्यान पाऊस झालेल्या १८६ मंडळांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४७, जालन्यातील १७, बीड २२, लातूर २२, धाराशिव १६, नांदेड २७, परभणी १६, हिंगोली १९ मंडळांचा समावेश आहे. तर १०० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेल्या ११० मंडळांमध्ये छत्रपती संभाजी नगरमधील केवळ २५, जालना ८, बीड ७, लातूर ५, नांदेड ५७, हिंगोली जिल्ह्यातील फक्त ८ मंडळांचा समावेश आहे.

६० तालुक्‍यांत अपेक्षित पाऊस नाही

मराठवाड्यातील एकूण ७६ पैकी ६० तालुक्‍यांत यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अपेक्षित पाऊसच झाला नाही. एवढेच नाही, तर जवळपास २३ तालुक्‍यांत ७५ टक्‍के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाला. लातूर कृषी विभागातील ५ जिल्ह्यांतील २९२ मंडळांपैकी १८१ मंडळांत पावसाचे प्रदीर्घ खंड अनुभवले गेले.

ज्यामध्ये ११० मंडळांत १५ ते २१ दिवस आणि ७१ मंडळांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचे खंड राहिले. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या ७५.६९ टक्‍केच पाऊस झाला. जालना व बीड जिल्ह्यांत पावसाची सरासरी अनुक्रमे ७३.४३ व ७१.२२ टक्‍केच राहिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८२.५१ टक्‍के पाऊस झाला होता.

१६५ मंडळांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

मराठवाड्यातील एकूण ४६९ मंडळांमध्ये एक जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत ८ मंडळांत २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला. तर १६५ मंडळांत ५० ते ७५ टक्के व १८६ मंडळांत ७५ ते १०० दरम्यान पाऊस झाला. केवळ ११० मंडळांत सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला.

विहिरीचं पाणी वाढलंच नाही यंदा. ५ ते ७ फूटचं पाणी आहे. डिसेंबरपर्यंत कसंबसं पुरंल. पेरलेलं अजून उगवलं नाही. म्हणावी तशी ओल नाही. कोरडवाहू २ ते ५ क्‍विंटल एकर सोयाबीन पिकलं. तालुका घटक कसा गृहीत धरला देव जाणे. इथं मंडळात पावसात प्रचंड तफावत आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर करताना तालुका गृहीत धरूच नये.
- शंकर गुळभिले, दिपेवडगाव, ता. केज, जि. बीड
विहिरी अखेरच्या घटका मोजताहेत. काहीतर कोरड्या पडल्यात. दोन महिन्यांनी पाणी मिळले की नाही, हा प्रश्‍न आहे. खरीप हातचा गेला. ओल नसल्याने रब्बी पीक नाही. पेरलं ते येईल म्हणून शाश्‍वती नाही. दुष्काळ जाहीर करणाऱ्या सरकारला हे दिसलं नसावं कदाचित.
- संदीप गवळी माळीवाडगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com