Crop Loss Compensation : राज्य सरकारने जुलै ते ऑगस्ट २०२४ मधील चार जिल्ह्यात झालेल्या संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसान मदतीसाठी १६५ कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. यामध्ये नागपूर विभागातील वर्धा आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपिकाचं ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. राज्य सरकार या मदतीचा मंगळवारी (ता.२१) शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी १० कोटी ८४ लाख ९८ हजार रुपयाचे प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवले होते. तर अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळीमुळं झालेल्या नुकसान मदतीसाठी १५४ कोटी ९८ लाख १० हजार रुपयांच्या निधीचे प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्तांनी पाठवले होते. या दोन्ही प्रस्तावाला एक वेळची विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून मंजूर देण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरुन निधी वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार बागायती पिकांच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावरून पावसाळी अधिवेशनात राजकारणही तापलं होतं.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली होती. तर तत्कालीन कृषीमंत्री मुंडे यांनी तातडीने मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी पंचनामे करूनच मदत दिली जाईल, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांची मदत रखडून पडली होती. मंगळवारी मात्र राज्य सरकारने फळ पीक शेतकऱ्यांना दिलासा देत निधीला मंजूरी दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी बाधित?
वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५ हजार ९३३ शेतकरी संत्रावर्गीय फळपीक उत्पादक शेतकरी बाधित झाले. त्यासाठी १० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर जुलै ते ऑगस्ट २०२४ मध्ये अमरावती जिल्ह्यातील ४१ हजार ९११ शेतकरी बाधित झाले. त्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिक १३४ कोटी ६१ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तसेच अकोला जिल्ह्यातील ३ हजार ४३३ शेतकऱ्यांना १० कोटी ९० लाख ६२ हजार रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ४५ लाख ६५ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. एकूण ५५ हजार १२९ शेतकऱ्यांना नुकसान मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मदत निधी मंजूर केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.