Biogas Scheme Gokul Milk : गोकुळ व एनडीडीबी मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून एक योजना राबविण्यात येत आहे. 'गोबरसे समृद्धी' कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामुळे आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. २०२४-२५ मध्ये राबविण्यात येणाऱ्या या योजनेत नवीन चार हजार बायोगॅस मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे बुधवारी (ता.२३) दिली.
गोकुळ अध्यक्ष डोंगळे पुढे म्हणाले की, 'गोबरसे समृद्धी' कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील गोकुळच्या ५ हजार ७४३ दूध उत्पादकांनी अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस प्रकल्प बसविले आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना २० कोटी २५ लाख इतके अनुदान मिळाले आहे. दुसऱ्या टप्प्यात बायोगॅसच्या नवीन मॉडेलमध्ये वाढीव क्षमता व सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सुधारणा केल्या असल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.
यामध्ये दीर्घकाळ चालणारा आधुनिक चार्जिंग लाईटर, शेण कालवण्यासाठी मिक्सिग टूल (मिक्सर), गॅसच्या सुरक्षिततेसाठी जादा सेफ्टी व्हॉल्व्ह व पुनर्वापर करता येणारा फिल्टर या नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. नवीन बायोगॅसचे अनुदान दुसऱ्या टप्प्यात मात्र कमी करण्यात आले असल्याचेही डोंगळे यांनी सांगितले.
२ घनमीटर बायोगॅस युनिटची वरील सुधारणेसह एकूण ४१ हजार २६० इतकी किमत असून, अनुदान वजा जाता ९ हजार ९९९ रुपये दूध उत्पादकांना भरावे लागतात. बायोगॅसचे अंतर १५० फुटांपेक्षा अधिक असल्यास १५०० रुपये बुस्टर पंपासाठी भरावे लागतात.
वर्षाला १५ ते १८ हजारांची बचत
योजनेमुळे वर्षाला १५ ते १८ हजारांची बचत दूध उत्पादक कुटुंबाच्या घरगुती वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या खर्चामध्ये या योजनेमुळे वर्षाला साधारणपणे १५ ते १८ हजार रुपयांची बचत होत आहे. बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी शेतीला सेंद्रिय खत म्हणून वापरली जात असल्यामुळे खतांच्या खर्चामध्ये ५० टक्के बचत होऊन शेतीचे सेंद्रिय उत्पादन वाढण्यास मदत होत असल्याचेही डोंगळे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.