डॉ. प्रवीण बनकर
भाग : ३
Livestock Update :
अज (शेळी) संपदा
शेळीपालन प्रामुख्याने मटणासाठी व्हायचे तर काही शेळ्या दुधासाठी पाळल्या जायच्या. मुंबई म्हणजे तत्कालीन बॉम्बे बेटांमध्ये, सामान्य जातीच्या काही शेळ्या खासगीरीत्या शहरात ठेवल्या जात होत्या (बॉम्बे आयलंड गॅझेटियर्स, १९०९).
कोकणातील कुलाबा जिल्ह्यात (सध्याचा रायगड जिल्हा) शेळ्या कमी संख्येने ठेवल्या जात होत्या. ज्यांना गायी पाळणे शक्य नव्हते, अशा मुस्लिम, मराठा, कुंभार, काथकरी, चांभार आणि महार समाजांतील पशुपालक शेळ्या ठेवायचे.
शेळीचे दूध कधी कधी सूज आलेले यकृत किंवा प्लिहा असलेल्या लहान मुलांना दिले जायचे. निद्रानाशावर उपचार म्हणून ते हातापायांवर देखील चोळण्यात यायचे, अशी नोंद घेण्यात आढळते (कुलाबा जिल्हा गॅझेटियर्स, १८८३).
नाशिकमध्ये, नेमाड आणि स्थानिक अशा दोन प्रकारच्या शेळ्या होत्या. नेमाड शेळ्या काहीशा उंच आणि फुगीर नाक आणि लांब वळणदार शिंगे असलेल्या होत्या तर स्थानिक शेळ्या तुलनेने लहान शिंगे व आकारमानाच्या होत्या. त्यांना देशी शेळ्या देखील म्हणायचे. (नाशिक जिल्हा गॅझेटियर्स, १८८३).
कोल्हापूर जिल्ह्यात कुई किंवा पांढरे आणि खडकी किंवा स्थानिक शेळ्या नोंदविलेल्या आहेत.
पूना (सध्याचा पुणे जिल्हा) येथे खुरी, घोडशेळी, कुई किंवा सुरती आणि सवती शेळ्या आढळल्या असल्याची नोंद सापडते. खुरी शेळ्या म्हणजे कर्नाटकातील छोट्या कानांच्या लहान शेळ्या होत्या, असे वर्णन केले आहे. घोडशेळी आकाराने मोठी होती. कोई किंवा सुरती शेळ्या उत्तम दुधासाठी प्रसिद्ध होत्या आणि मटणाला त्यांना घरी संगोपन केले जात असे. सवती शेळ्या उंच, मोठ्या, कमी दूध देणाऱ्या होत्या आणि त्यांना चरण्यासाठी जंगलात पाठवले जात असे. त्यांचे मांस मऊसर असल्याने त्यांना मटणासाठी पाळले जायचे. (पुणे जिल्हा गॅझेटियर्स, १८८५).
मेष (मेंढ्या) संपदा
हल्लीच्या मुंबईत म्हणजे ब्रिटिशकालीन बॉम्बे बेटांवर, बहुतेक मेंढ्या मारवाड, अहमदाबाद आणि दख्खन भागातून मटणासाठी आयात केल्या जायच्या (बॉम्बे आयलंड गॅझेटियर्स, १९०९).
नाशिक जिल्ह्यात गावरानी आणि हरणी या दोन प्रकारच्या मेंढ्या पाळल्या जात होत्या. हरणी मेंढ्यांना त्यांच्या लहानशा तोंडावरून ओळखले जात असे. धनगर आणि हटकर हे प्रमुख मेंढपाळ होते आणि ते लोकरीचे जाडेभरडे घोंगडे विणणे,खोगीर आणि दोरी बनविण्यासाठी मेंढ्या पाळत (नाशिक जिल्हा गॅझेटियर्स, १८८३).
सातारा जिल्ह्यात १८४९ मध्ये सर बार्टल फ्रेरे (तत्कालीन आयुक्त, सातारा) यांनी खानदेशातील मेंढ्या आणून स्थानिक मेंढ्यांशी संकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संकरित कोकरे नाजूक आणि कमकुवत असल्याने मरतुक अधिक झाली आणि हा प्रयोग फारसा लोकप्रिय झाला नाही.
पूना जिल्ह्यात (सध्याचा पुणे जिल्हा) स्थानिक किंवा देसलू आणि जाडजूड शेपटीच्या दुंबा मेंढ्यांची नोंद झाली. लांब शेपटी असलेल्या मेंढ्यांमध्ये याईपुरी (काळ्या ठिपके असलेले पांढऱ्या आणि लांब शेपटी); काबुली (पांढरा किंवा काळा-पांढरा रंगाच्या आणि जाड शेपटी व बारीक पाय) आणि येल्गा (मिश्र रंगाचे, उंचपुऱ्या, जाड शेपटी) तीन जातींचा समावेश होतो. (पुना जिल्हा गॅझेटियर्स, १८८५).
अमरावती जिल्ह्यात टापरकानी (लांब कान आणि सामान्यतः जेट काळा रंगाचा असतो); बाटकानी (लहान कान आणि काळे-पांढरे मिश्र) आणि फुलकानी (टापरकानी आणि बाटकानी यांच्यातील संकर) अशा तीन प्रकारच्या मेंढ्यांची नोंद केलेली दिसते (अमरावती जिल्हा गॅझेटियर्स, १९११).
चांदा (सध्याचे चंद्रपूर) जिल्ह्यात, सिरोंचा (चांदा जिल्हा गॅझेटियर्स, १९०८) येथे ढोर मुंडी किंवा गोदावरी मेंढ्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
अश्व (घोडा) संपदा
स्थानिक घोडे स्वभावाने गरीब आणि आकाराने लहान असले तरी एकेकाळी खानदेशातील थिलारी घोडे दख्खनमध्ये सर्वोत्तम आणि बलवान मानले जात होते. खानदेशच्या पश्चिमेला राहणाऱ्या भटक्या गुराखी असलेला थिलारी समाजाने विकसित केलेली वाढवलेली घोड्याची लहान पण कणखर जात असल्याची नोंद आहे.(खानदेश जिल्हा गॅझेटियर्स, १८८०).
सातारा जिल्ह्यात माण तालुक्याची खोरी घोड्यांसाठी विशेष प्रसिद्ध होती, मात्र घोडेपालकांना घोड्यांच्या पैदाशीत फारसा रस आढळून आला नव्हता (सातारा जिल्हा गॅझेटियर्स, १८८४).
छत्रपती शाहू महाराजांनी चिंचली, कोल्हापूर येथे झालेल्या घोडे व पशू प्रदर्शनादरम्यान घोड्यांच्या प्रजननाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले होते (अनामिक, १८९४)
श्वान संपदा
कुलाबा (सध्याचा रायगड जिल्हा) जिल्ह्यात कारवान या मीठ विक्रेत्यांकडे पातळ आणि लांब केसांच्या कारवान (चारण) जातीच्या कुत्र्यांची नोंद आढळून येते. (कुलाबा जिल्हा गॅझेटियर्स, १८८३). याव्यतिरिक्त मराठा, मुधोळ, बंजारा, वऱ्हाडी अशा काहीशा पुसट नोंदी विविध जिल्ह्यांच्या गॅझेटियर्समध्ये पाहायला मिळतात. यासाठी, समकालीन साहित्याच्या नोंदी पडताळून पाहणे गरजेचे आहे.
ब्रिटिशकालीन संदर्भांचे निष्कर्ष
ब्रिटिशकालीन उपरोक्त समीक्षेवरून एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पशुधन संपदेची आणि जैविक विविधतेची आपल्याला कल्पना येईल. कित्येक पशुसंपदा आपल्याला आजही दृष्टिपथात पडतात. भौगोलिक प्रदेशाच्या आधारे (उदा. वऱ्हाडी, माळवी, गोकाकी गुरे); बाह्यरूपाने (उदा. बहाळा, घोडशेळी); पशुपालक समुदाय (उदा. लमाणी, गोंडी) यांचा प्रभाव पशुधन संपदेवर दिसून येतो. पशुधन संगोपनाच्या पारंपरिक पद्धती आणि राज्याबाहेरील पशुधन (उदा. गिर गायी, मुऱ्हा/पंजाब म्हशी) आयात करण्याच्या पद्धती याबाबत माहिती उपयुक्त ठरते. १९व्या शतकातील पशुपालकांचे पारंपरिक स्थलांतर मार्ग त्या त्या पशुधनाचा प्रसार आणि स्थानिक पशुधनासह होणारा संकर सुचवतात.
गॅझेटियर्स हे शासकीय अभिलेखे इंग्रजांनी प्रशासकीय गरजेपोटी आणि स्थानिक भाषा शिकत किंवा दुभाषकांच्या साह्याने नोंदविले असल्याने अनेकदा स्थानिक बोलीभाषेतील नामावली आणि प्रत्यक्षात संबोधले जाणारे नाव यांच्यात थोडाबहुत फरक जाणवतो. उदा. सोर्टी म्हणजे सुरती; वऱ्हाडीऐवजी बेरारी किंवा येऱ्हाडी; चारण कुत्रे म्हणजे कारवान श्वान असू शकतात. अभ्यास केलेल्या नोंदींच्या वैधतेची पुष्टी करणारे काही पशुधन अजूनही अस्तित्वात असल्याचे आढळते. म्हणून, अल्पज्ञात पशुधनाचा शोध घेताना बोलीभाषेतील फरकाचा, पशुपालक समाजाचा आणि त्यायोगे ऐतिहासिक संदर्भांचा गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे.
डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९
(सहायक प्राध्यापक, पशुआनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प.संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.