Cotton Fertilizers : कपाशीला द्या संतुलित खते

Cotton Farming : राज्यात सर्वसाधारणपणे ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. कपाशी वाणांची लागवड केली जाते. कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर, रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे अपरिहार्य आहे.
Cotton Farming
Cotton Farming Agrowon

Cotton Fertilizers Management : राज्यात सर्वसाधारणपणे ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. कपाशी वाणांची लागवड केली जाते. कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर, रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशिअम आणि गंधक ही दुय्यम तर लोह, जस्त, मँगेनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते.

राज्यातील खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रासाठी तसेच विदर्भ व मराठवाडा विभागातील कापूस उत्पादकांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास

उत्पादन वाढीसह जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.

कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सेंमी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पाणथळ जमिनीत कपाशीची लागवड करणे टाळावे.

अन्नद्रव्यांची उपलब्धता व जमिनीचा सामू यांचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यंत असावा. कपाशीच्या झाडांची मुळे ७० ते ९० दिवसांमध्ये जमिनीत साधारण ६० ते ९० सेंमीपर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली होण्यासाठी एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. शेतातील आधीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा व पीक अवशेष गोळा करून शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

सेंद्रिय खते, जिवाणू खते, हिरवळीची खते आणि रासायनिक खतांचा योग्य पीक अवस्थेत एकत्रित वापर करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खते

शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जलधारणाशक्ती वाढते, हवा  खेळती राहून मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांत सकारात्मक बदल होण्यास मदत होते.

शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ५ टन (१० ते १२ गाड्या) किंवा गांडूळ खत २.५ टन प्रमाणे द्यावे. बागायती लागवडीसाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत १० टन (२० ते २५ गाड्या) किंवा ५ टन गांडूळखत मिसळावे. खतांची उपलब्धता कमी असल्यास लागवडी वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकून मातीत चांगले मिसळावे.

Cotton Farming
Fertilizer From Cotton : कापसाचा सूक्ष्म कचरा मिळवून देणार पौष्टिक खत

जिवाणू संवर्धक

हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीलम या जिवाणू संवधर्काची प्रति किलो बियाणास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरून ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. त्यामुळे नत्र व स्फुरदयुक्त खतांच्या मात्रेमध्ये साधारणपणे २५ ते ३० टक्के बचत होते.

रासायनिक खते

बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते. त्यामुळे रासायनिक खतांचा प्रमाणशीर वापर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्राकरिता शिफारशीत खत मात्रा

अ) कोरडवाहू बी. टी. कापूस शिफारशीत खत मात्रा ः १००:५०:५० (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टर

पेरणीवेळी २० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ४३ किलो

पेरणीवेळी संपूर्ण स्फुरदाची मात्रा एस.एस.पी. द्वारे = हेक्टरी ३१३ किलो

पेरणीवेळी संपूर्ण पालाशची मात्रा एम.ओ.पी.द्वारे = हेक्टरी ८४ किलो

पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ८७ किलो

पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ८७ किलो

ब) बागायती बी.टी. कापूस शिफारशीत खत मात्रा ः १२५:६५:६५ (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टर

पेरणीवेळी २० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ५४ किलो

पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरदाची मात्रा एस.एस.पी.द्वारे = हेक्टरी ४०६ किलो

पेरणीच्या वेळी संपूर्ण पालाशची मात्रा एम.ओ.पी.द्वारे = हेक्टरी १०९ किलो

पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी १०८ किलो

पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी १०८ किलो

विदर्भ व मराठवाडा विभागाकरिता शिफारशीत खत मात्रा

अ) कोरडवाहू बी.टी. कापूस शिफारशीत खत मात्रा: १२०:६०:६० (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टर

पेरणीच्या वेळी ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी १०४ किलो

पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरदाची मात्रा एस.एस.पी.द्वारे = हेक्टरी ३७५ किलो

पेरणीच्या वेळी संपूर्ण पालाशची मात्रा एम.ओ.पी.द्वारे = हेक्टरी १०० किलो

पेरणीनंतर ३० दिवसांनी ३० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ७८ किलो

पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ३० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ७८ किलो

Cotton Farming
Soil Fertility : जमिनीच्या सुपीकता अन् व्यावसायिक पीक नियोजनातून साधली आर्थिक प्रगती

ब) बागायती बी.टी. कापूस शिफारशीत खत मात्रा ः १५०:७५:७५ (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टर

पेरणीच्या वेळी २० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी ६५ किलो

पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरदाची मात्रा एस.एस.पी.द्वारे = हेक्टरी ४६९ किलो

पेरणीच्या वेळी संपूर्ण पालाशची मात्रा एम.ओ.पी.द्वारे = हेक्टरी १२५ किलो

पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी १३० किलो

पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४० टक्के नत्राची मात्रा युरिया खताद्वारे = हेक्टरी १३० किलो

दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये

नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त मॅग्नेशिअम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची लोह, जस्त, मँगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज असते. माती परीक्षण केल्यानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.

अन्नद्रव्ये (हेक्टर मात्रा)

गंधक - २० किलो

मॅग्नेशिअम सल्फेट- २० किलो

झिंक सल्फेट - २५ किलो

फेरस सल्फेट - २० किलो

बोरॅक्स - ५ किलो

(वरील सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतामध्ये मुरवून पेरणीपूर्वी द्यावीत.)

रासायनिक खतांचा योग्य वापर

खतांची पहिली मात्र लागवडीच्या वेळी द्यावी. नत्रयुक्त खते विभागून द्यावीत.

नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. कारण नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे उत्पादनामध्ये घट येते.

मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून देऊ नयेत.

खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू व बागायती बी.टी. कपाशीसाठी खत व्यवस्थापन :

खते देण्याची वेळ कोरडवाहू बी. टी. कपाशी

(किलो प्रति हेक्टर) बागायती बी. टी. कपाशी

(किलो प्रति हेक्टरी)

नत्र

(युरिया) स्फुरद (एसएसपी) पालाश (एमओपी) नत्र

(युरिया) स्फुरद (एसएसपी) पालाश (एमओपी)

लागवडीवेळी २० (४३) ५०(३१३) ५० (८४) २५ (५४) ६५ (४०६) ६५ (१०९)

३० दिवसांनी ४० (८७) -- -- ५० (१०८) -- --

६० दिवसांनी ४० (८७) -- -- ५० (१०८) -- --

एकूण १०० (२१७) ५० (३१३) ५० (८४) १२५ (२७१) ६५ (४०६) ६५ (१०९)

विदर्भ व मराठवाडा विभागातील कोरडवाहू व बागायती बी. टी. कपाशीसाठी खत व्यवस्थापन

खते देण्याची वेळ कोरडवाहू बी. टी. कपाशी

(किलो प्रति हेक्टर) बागायती बी. टी. कपाशी

(किलो प्रति हेक्टरी)

नत्र

(युरिया) स्फुरद (एसएसपी) पालाश (एमओपी) नत्र

(युरिया स्फुरद (एसएसपी) पालाश (एमओपी)

लागवड ४८ (१०४) ६०(३७५) ६०(१००) ३० (६५) ७५ (४६९) ७५ (१२५)

३० दिवसांनी ३६ (७८) -- -- ६० (१३०) -- --

६० दिवसांनी ३६ (७८) -- -- ६० (१३०) -- --

एकूण १२० २६०) ६० (३७५) ६० (१००) १५० ३२५) ७५ (४६९) ७५ (१२५)

विद्राव्य खतांची फवारणी : (प्रति १० लिटर पाणी)

कपाशी पिकाला पाते लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर साधारणत: ४५ दिवसांनंतर) डीएपी (२ टक्के) २०० ग्रॅम.

बोंडे लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर ७५ दिवसांनी) युरिया (२ टक्के) २०० ग्रॅम खत

याप्रमाणे प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.

कोरडवाहू लागवडीमध्ये पीक वाढीच्या काळात पावसाची उघडीप असल्यास, पोटॅशिअम नायट्रेट

(२ टक्के) २०० ग्रॅम खत प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या आत फवारणी करावी.

फवारणीद्वारे द्यावयाच्या खतांचे वेळापत्रक

खतमात्रा वेळ/अवस्था खतमात्रा

(प्रति १० लिटर पाणी)

युरिया २ टक्के ३० ते ४० दिवस २०० ग्रॅम

डीएपी २ टक्के ६० ते ६५ दिवस २०० ग्रॅम

मॅग्नेशिअम सल्फेट ०.२ टक्के पाते व फुले लागताना २० ग्रॅम

बोरॅान ०.१ टक्का फुले लागताना १० ग्रॅम

पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) २ टक्के ६० व ९० दिवसांनी २०० ग्रॅम

ग्रेड २ सूक्ष्म अन्नद्रव्ये (०.५ टक्का फुले व बोंडे लागताना ५० ग्रॅम

डॉ. आदिनाथ ताकटे (मृदा शास्रज्ञ), ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com