
Sugar crushing season : यंदा उसाअभावी साखर उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे. देशात यंदाच्या गाळप हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत ७७ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असल्याचं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
गेल्यावर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ५३१ कारखान्यांपैकी ५०५ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होता. म्हणजे केवळ २८ कारखान्यांचा हंगाम संपला होता. यंदा मात्र ४५४ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे देशातील यंदाच्या गाळप हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट येण्याचा अंदाज महासंघाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी देखील विविध संस्थांकडून साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
साखरेच्या किमान विक्री किंमतीकडे लक्ष वेधत महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कारखानदारांना शेतकऱ्यांना वेळेत पैसे देणं शक्य होईल, असं सांगितलं. पाटील म्हणाले, "स्थानिक बाजारात साखरेच्या विक्री किंमती समाधानकारक राहतील. त्यामुळे कारखानदार पैसे देऊ शकतील. परंतु साखरेच्या किमान विक्री किंमत आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे या दोन्हीबाबत सरकारने निर्णय घेतल्यास फायदा होईल." असंही पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात ३० कारखान्यांनी गाळप हंगाम आटोपला असून ७४ लाख टन ऊस गाळप करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्राचा सरासरी उतारा ९.२० टक्के आला आहे. तर साखर उत्पादन ६.८१ दशलक्ष टनांवर पोहचलं आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या माहितीनुसार देशतील साखर उत्पादन चालू साखर वर्षात २७ दशलक्ष राहण्याचा अंदाज आहे. देशात ऑक्टोबर ते सप्टेंबर साखर उत्पादन वर्ष समजलं जातं. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.९ दशलक्ष टनांनी साखर उत्पादन घट येण्याचा अंदाज आहे.
२०२४-२५ च्या हंगामात देशात ३१.९ दशलक्ष टन साखरेचं उत्पादन झालं होतं, असंही महासंघाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीला घातलेली निर्बंधामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर आणि एफआरपीनुसार बिल देण्यास कारखाने टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांची कोंडी झाली आहे.
यंदाच्या हंगामात देशात २६.५२ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोशिएशनने व्यक्त केला आहे.तर सहकारी साखर कारखानदारांच्या मालक संघटनेनं २८ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज दिला आहे. तर इस्माने दुसऱ्या साखर उत्पादन अंदाजात उत्पादनात घट वर्तवत २७.२७ दशलक्ष साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.
देशात गाळप हंगामात फेब्रुवारी १५ पर्यंत २१७.५ दशलक्ष टन ऊसाचं गाळप करण्यात आलं आहे. देशात सरासरी साखर उतारा ९.९ टक्के आला. गेल्यावर्षी याच कालावधीत २२७.७ दशलक्ष टन ऊस गाळप झालं होतं. तर साखर उतारा मात्र ९.८७ टक्के होता. भारतातील पांढऱ्या साखरेला श्रीलंका, अफगाणिस्तान, पूर्व आशिया आणि मध्य पूर्व आशियाकडून मागणी आहे. २०२५ च्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात साखर निर्यातीसाठी कारखानदारांनी नियोजन करावं, असं आवाहन पाटील यांनी कारखानदारांना केलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.